लाजिरवाणे

0
172

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एल्फिन्स्टन म्हणजेच प्रभादेवी आणि परळ या दोन उपनगरी रेल्वेस्थानकांदरम्यानच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन मोठ्या संख्येने प्रवासी दगावण्याची घटना अत्यंत दुर्देवी तर आहेच, परंतु बुलेट ट्रेनची बात करणार्‍या भारतासाठी अत्यंत लाजिरवाणीही आहे. मुंबईला गर्दी नवीन नाही. रोज लक्षावधी प्रवासी मुंबईच्या या उपनगरी जीवनरेषांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात. कित्येक जण रोज दगावतात देखील, परंतु मुंबई कधी थांबत नाही. या दुर्घटनेनंतरही उद्या त्या पदपुलावर कालच्या दुर्घटनेचा मागमूस उरणार नाही. पुन्हा प्रवाशांचा कल्लोळ सुरू होईल. न थांबणे ही मुंबईची अपरिहार्यता आहे. पण त्याचा अर्थ सरकारी यंत्रणेनेही असंवेदनशील बनून ‘हे असेच चालायचे’ म्हणत सुस्तावणे असा नाही. दुर्दैवाने तो तसा घेतला जातो आणि त्यातूनच अशा दुर्घटना घडतात. कालची दुर्घटना घडली त्याला निमित्त कोणतेही असो, दुर्घटनेला सर्वाधिक जबाबदार आहे ती रेल्वे प्रशासनाची प्रवाशांप्रतीची उदासीनता. जेथून रोज लक्षावधी प्रवासी ये – जा करायचे असा हा पदपूल तोंडाशी अरुंद होता. रोज स्थानकांवर एकाचवेळी रेलगाड्या लागल्या की प्रवाशांची अतोनात गर्दी होऊन पुलावरून पार व्हायला त्यांना दहा दहा मिनिटे थांबावे लागायचे. पण हे सगळे डोळ्यांदेखत दिसत असूनही रेल्वे प्रशासन बेफिकीर राहिले, त्याची ही भीषण परिणती आहे. दोन वर्षांपूर्वी महालेखापालांनी आपल्या अहवालात उपनगरी रेल्वेवरील पदपुलांच्या पुनर्बांधणीचा मुद्दा उपस्थित केला होता, पण कोणी त्याकडे ढुंकून पाहिले नाही. आता काल रेलमंत्री पीयूष गोयल धावले. त्यांनी मृतांच्या परिजनांना दहा लाखांची मदत जाहीर केली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात आणखी भर घातली. पण आता ह्या पैशांचा त्या बिचार्‍या प्रवाशांना उपयोग काय? मुंबईच्या उपनगरी रेलसेवेचे तीन मुख्य भाग आहेत. चर्चगेट ते विरार आणि पुढे डहाणू रोडपर्यंत जाणारा पश्‍चिम रेल्वेचा मार्ग, सीएसटीपासून कल्याणपर्यंत आणि पुढे कसारा आणि खोपोली असे दोन फाटे फुटणारा मध्य रेल्वेचा मार्ग आणि सीएसटीहून एका बाजूने अंधेरी आणि दुसर्‍या बाजूने पनवेल गाठणारी हार्बरलाईन. यात आता ठाणे – वाशी आणि पनवेलपर्यंत जाणार्‍या ट्रान्सहार्बर लाईनची भर पडली आहे. या सर्व उपनगरी मार्गांवरून ऐंशी लाख प्रवासी प्रवास करतात असे सर्वेक्षण मुंबई रेलविकास महामंडळाने केले होते. बारा डब्यांच्या उपनगरी गाडीची क्षमता ११७२ प्रवासी वाहून नेण्याची असते. पण सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकेका रेलगाडीतून सहा हजार प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. मध्यंतरी नव्या आधुनिक रेलगाड्या आणल्या गेल्या, परंतु त्याही अपुर्‍या पडत आहेत. पहाटे चार ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत उपनगरी रेलगाड्या अखंड धावत असतात. जेथे काल दुर्घटना घडली ते एल्फिन्स्टन म्हणजे प्रभादेवी स्थानक पश्‍चिम रेल्वेवर आहे आणि त्याला समांतर परळ स्थानक मध्य रेल्वेवर आहे. परळ स्थानकावरून पश्‍चिमेकडे जाण्यासाठी जो पदपूल लागतो, त्यावर ही भीषण चेंगराचेंगरी झाली. मध्य मुंबईच्या या पश्‍चिम भागात अलीकडे इंडियाबुल्स सारखी मोठमोठी कार्यालयीन संकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. पण पदपूल मात्र जुनाच आहे. मग दुर्घटना घडली त्यात नवल ते काय? पदपुलांच्या अशा स्थितीमुळे प्रवासी धोकादायकरीत्या रूळ पार करतात आणि मृत्युमुखी पडतात. जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१४ च्या उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार रेल्वे अपघातांत देशात ३३,४४५ लोक मृत्युमुखी पडले, त्यातील १९८६८ म्हणजे ५९ टक्के प्रवासी हे रूळ ओलांडताना ठार झाले आणि त्यातील ५२.७४ टक्के बळी मुंबईत गेले. पंधरा टक्के जणांचा मृत्यू रेलगाडीतून पडल्याने ओढवला आणि त्यातले ८२ टक्के बळी हे मुंबईत गेले, ही रेल्वेची अधिकृत आकडेवारी आहे. लोकांना धोकादायकरीत्या रूळ का ओलांडावे लागतात? अर्थातच पादचारी पुलांची कमतरता हे त्याचे मुख्य कारण सरळसरळ दिसते. ज्या एल्फिन्स्टन पुलावर दुर्घटना घडली, तेथे नवा पूल उभारावा असे निवेदन स्थानिक खासदार अरविंद सावंतांनी सुरेश प्रभूंना ते रेलमंत्री असताना दिले होते. त्यांना दिलेल्या उत्तरात प्रभूंनी रेल्वेला निधीची कमतरता असल्याचे रडगाणे गायिले होते. एकीकडे मुंबई – अहमदाबाद दरम्यान जपानच्या मदतीने का होईना, एक लाख दहा हजार कोटी खर्चून बुलेट ट्रेन उभारली जातेय आणि दुसरीकडे आम मुंबईकर मात्र अशा दुर्घटनांत किड्या मुंग्यांगत बळी जातो आहे ही विसंगती विदारक आहे. सर्वसामान्य रेलप्रवाशांना सुरक्षित सेवा जर देता येत नसेल तर बुलेट ट्रेनचे गोडवे गाण्यात काहीही अर्थ नाही याचे भान आपल्याला कधी येणार?