लाचप्रकरणी वाहतूक अधिकारी निलंबित

0
112

पोळे-काणकोण येथील वाहतूक खात्याच्या तपासणी नाक्यावर एका वाहन चालकाकडून कथित लाच स्वीकारताना कॅमेर्‍यात बंदिस्त झालेले वाहतूक अधिकारी नारायण फडते यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी सविस्तर चौकशीचा आदेश वाहतूक खात्याच्या संचालकांनी काल दिला आहे.

एका वृत्तवाहिनीने शुक्रवारी मध्यरात्री पोळे काणकोण येथील वाहतूक खात्याच्या तपासणी नाक्यावर स्टींग ऑपरेशन करून वाहतूक खात्याच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारताना कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त केले. परराज्यातून येणार्‍या वाहन चालकांकडून निर्धारीत शुल्कापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात होते. परंतु, पावतीवर शुल्काची रक्कम कमी नोंद केली जात होती.

यासंबंधी वृत्त प्रसारित झाल्यानंतर वाहतूक खात्यात खळबळ उडाली. वाहतूक खात्याने या प्रकरणी चौकशी सुरुवात केली. वाहतूक अधिकारी नारायण फडते यांनानिलंबित करून या कथित प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश वाहतूक खात्याच्या संचालकांनी दिला.

राज्यात प्रवेश करणार्‍या परराज्यातील वाहनाकडून तपासणी नाक्यावरील वाहतूक अधिकार्‍याकडून लाच स्वीकारली जाते, अशी तक्रार होती. त्यामुळे पोळे – काणकोण येथे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर वाहन चालकांनी सुध्दा वाहतूक खात्याच्या अधिकार्‍याकडून लाच स्वीकारली जाते, अशी माहिती उघड केली. वाहतूक खात्याच्या इतर नाक्यांवर सुध्दा लाच स्वीकारली जात असल्याची तक्रार आहे.