लढाई दीर्घकाळची

0
183
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदर्शनवरून देशाला दर्शन दिले. येत्या रविवारी पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून खिडक्या दारांत उभे राहून मेणबत्त्या, पणत्या आणि मोबाईलचे फ्लॅश लावा असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या वेळी दारा – खिडक्यांत राहून कोरोनाविरोधात लढणार्‍या डॉक्टर, परिचारिकांसाठी टाळ्या वाजवण्याच्या त्यांच्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे पुन्हा एकवार मोदींनी हे आवाहन केले आहे. मोदींचे हे आवाहन सध्या टिंगलीचा विषय ठरले असले तरी हे आवाहन निव्वळ प्रतिकात्मक आहे हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण देशाने एक झाले पाहिजे हाच या मागचा खरा खरा मथितार्थ आहे. दिवे बंद केले काय, किंवा न बंद केले काय, त्याने कोरोनाला काहीही फरक  पडणार नाही. एकशे तीस कोटी जनतेने एकाच वेळी दिवे प्रज्वलित केले तर निर्माण होणार्‍या उष्णतेने कोरोना पळून जाईल असा एक संदेश काल समाजमाध्यमांवरून फिरत होता, तो उपरोधिक होता हे लक्षात घ्यावे. प्रत्यक्षात असे काही होत नसते. कोरोनाला पळवून लावायचे असेल तर त्यासाठी केवळ एक आणि एकच उपाय आहे तो म्हणजे तूर्त एकमेकांपासून दूर राहणे.
ङ्गसोशल डिस्टन्सिंगफ हाच कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव मंत्र आहे. दुर्दैवाने तो जेवढ्या गांभीर्याने पाळला गेला पाहिजे तेवढ्या गांभीर्याने पाळला जाताना दिसत नाही. लोक अजूनही क्षुल्लक कारणांनी घराबाहेर पडतच आहेत. रोजच्या रोज भाजी आणायला बाहेर पडायची काय जरूरी आहे? एरवी आठवड्यातून एकदाच भाजी बाजारात जाणारे देखील आज रोजच्या रोज भाजी आणण्याच्या मिशाने घराबाहेर पडतात याला काय अर्थ आहे? मासेमारीला सरकारने कालपासून बंदी करून टाकली आहे. त्यामुळे मासे खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचा प्रकार आता थांबेल. बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे चिकनवरही बंदी आली आहे. परंतु म्हणून भाजीची खरेदी रोजच्या रोज केलीच पाहिजे, रोज ताटात भाजी असलीच पाहिजे असे काही आहे का? जे काही घरात उपलब्ध आहे, त्यात जास्तीत जास्त दिवस कसे निभावून नेता येतील याचा विचार जर प्रत्येक घरातून झाला, तरच कोरोनासाठीच्या या 21 दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनचे फलित हाती पडेल. अजूनही जनतेला हे मर्म उमगलेलेच नाही ही दुर्दैवाची बाब आहे. नुसती नामधारी मुखावरणे बांधून घराबाहेर पडणार्‍यांना जगभरामध्ये कोरोना कसा पसरला, पुरेशी काळजी घेतलेली असताना देखील तो कसा पसरू शकतो हे उमगत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर दगडफेक करण्याचा, थुंकण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार काही इंदूरसारख्या शहरांतील काही वस्त्यांत घडला. आपल्याच जिवाच्या काळजीसाठी स्वतःच्या जिवावर उदार होऊन आलेल्यांना एवढी हीन वागणूक देण्यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. तबलिग जमातने केलेल्या पराक्रमाचा फटका सध्या देशाला बसलेलाच आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा आपल्या धर्माविरुद्धचा लढा आहे असे मानून जर कोणी बेटकुळ्या दाखवणार असेल तर अशा महाभागांना या देशात कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्यावे लागेल. डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई झाली हे योग्य झाले. उपचार करणार्‍या महिला डॉक्टर आणि परिचारिकांशी अश्लील वर्तन करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. माणुसकी कोळून प्यालेल्या अशा महाभागांना खरे म्हणजे कोणत्याही उपचारांविना एखाद्या कोठडीत कोरोनाने सडत ठेवणेच योग्य ठरले असते. एखाद्या हुकूमशाही देशात तशीच शिक्षा त्यांच्या वाट्याला आली असती. आपला देश हा एक सुसंस्कृत, लोकशाहीवादी देश आहे. परंतु या लोकशाहीचा फायदा ज्याने त्याने मनमानीपणे उठवावा असा होत नाही. जगात काय परिस्थिती आहे, देश कोणत्या परिस्थितीतून चालला आहे याचे तीळमात्र भान न ठेवणार्‍या असल्या सडक्या मेंदूंना वठणीवर आणले नाही तर ते हजारो निरपराधांच्या जिवाला नाहक धोका निर्माण करू शकतात. ज्या प्रकारे तबलिग जमातने देशभरात कोरोना पसरवला आहे ते पाहिले तर हा एखादा आत्मघातकी हल्ला तर नव्हता ना असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. गेल्या दोन दिवसांत सापडलेले कोरोनाचे तब्बल 645 रुग्ण हे तबलिग जमातच्या निझामुद्दिनमधल्या त्या एका कार्यक्रमाशी संबंधित आहेत हे काय दर्शवते?  मुळात हे विदेशी तबलिगी त्या मेळाव्यानंतर देशभरात का पसरले आहेत? त्यांचे त्यामागचे हेतू काय आहेत? हे असले छुपे कार्य ते किती वर्षे करीत आलेले आहेत? गोव्यामध्ये जे तीन – चार डझन तबलिगी आलेले आहेत, त्यापैकी एकही गोमंतकीय नाही. मग हे महाभाग येथे कशासाठी आलेले होते? काय करत होते? सरकारने याची सखोल चौकशी करावी. हा कोरोनाच्या धोक्यापलीकडचा गंभीर विषय आहे आणि त्याच्या मुळाशी जावेच लागेल.
कोरोनाच्या विरोधातील संपूर्ण संचारबंदीची पूर्ण कार्यवाही अजूनही आपल्याला करता आलेली नाही. त्याची अनेक कारणे आहेत. राज्य सरकारचे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील अपयश आहे, लोकांची क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडण्याची सवय आहे, पोलीस दलाकडून संचारबंदीची जेवढी काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी तेवढी होत नाही हेही एक कारण आहे. शिवाय कोरोनाचे गांभीर्य अजूनही न उमगलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यांचे हे अडाणीपण उर्वरित समाजावर कोरोनाची टांगती तलवार अजून काही काळ टांगती ठेवील. पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने या संपूर्ण संचारबंदीनंतर काय होईल, काय होऊ शकते याची दृश्ये नजरेसमोर ठेवून पुढील काळातही कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे सामाजिक गांभीर्य कायम राहील हे तत्परतेने पाहावे. कोरोना अजून दूर गेलेला नाही. आपल्या अवतीभवतीच आहे याचे भान ठेवावेच लागेल. ही लढाई दीर्घकाळची आहे हे विसरले जाऊ नये!