लक्ष वायनाडकडे

0
146

अमेठीबरोबरच केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. एखाद्या उमेदवाराने एकाहून अधिक ठिकाणांहून निवडणूक लढवणे काही नवीन नाही आणि त्यात गैरही काही नाही. मात्र, अशा प्रकारे एकाहून अधिक ठिकाणांहून निवडणूक लढवणार्‍यांचा आपल्या मतदारसंघातील स्वतःच्या लोकप्रियतेविषयीचा आणि तेथून जिंकण्याविषयीचा आत्मविश्वास डळमळला आहे की काय असा प्रश्न मात्र जनतेला पडत असतो. कोणताही धोका पत्करावा लागू नये म्हणूनच असे पर्यायी मतदारसंघ निवडले जातात असेच जनता मानत असते, परंतु विविध राजकीय पक्षांच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी एकाहून अधिक ठिकाणाहून उभे राहण्यामागे स्वतःच्या विजयाबाबतच्या साशंकतेपेक्षाही त्याहून वेगळी कारणे असू शकतात. राहुल गांधी यांच्या वायनाडमधून उभे राहण्यामागेही अमेठीचा बालेकिल्ला आता स्वतःसाठी असुरक्षित बनल्याच्या भीतीपेक्षा अशी वेगळी कारणे असू शकतात. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दक्षिण भारतामध्ये आपल्या पक्षाचे वारे वाहावे असाही प्रयत्न वायनाडसारखा मतदारसंघ निवडण्यामागे आहे. वायनाडची जागा राहुल यांच्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक निवडली गेली आहे. वास्तविक त्यांच्यासाठी दक्षिणेतील शिवगंगासारख्या अन्य जागांचा विचार झाला होता असा गौप्यस्फोट पी. चिदंबरम यांनी केला आहे. परंतु केरळमधील वायनाड निवडले गेले त्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. त्यामध्ये पहिले आहे ते म्हणजे वायनाडचे भौगोलिक स्थान. हा निसर्गरम्य मतदारसंघ जरी केरळमध्ये येत असला तरी केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडू ह्या तीन राज्यांच्या सीमा येथे एकत्र येतात. दक्षिण भारतामध्ये कॉंग्रेसची लाट निर्माण करण्यासाठी दक्षिणेतील मतदारसंघ निवडण्याची परंपरा अगदी इंदिरा गांधींपासून आहे. त्या तेव्हाच्या आंध्र प्रदेशातील मेडकमध्येही उभे राहिल्या होत्या. आता हा मेडक तेलंगणात आहे. सोनिया गांधींनी देखील कर्नाटकातील बेळ्ळारीची निवड केली होती आणि त्यांना हादरा देण्यासाठी सुषमा स्वराज देखील बेळ्ळारीत डेरेदाखल होऊन अल्पावधीत कन्नड शिकून त्यांच्या विरोधात निवडणुकीला उभ्या ठाकल्या होत्या. सुषमा तेव्हा पराभूत झाल्या तरी त्यांच्या संघर्षवृत्तीने त्यांनी देशवासीयांची मने तेव्हा जिंकली होती. कॉंग्रेसच्या पूर्वसुरींनी उत्तरेतून लढत असताना दक्षिणेतूनही निवडणुका लढविल्या असल्यामुळे आता राहुल यांनी वायनाडसारखा केरळमधील मतदारसंघ निवडणे यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. वायनाड हा त्यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित मतदारसंघ जरी म्हणता येत नसला, तरी त्यांच्या उमेदवारीमुळे तेथे कॉंग्रेसच्या विजयाच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. अल्पसंख्यकांची मोठी मतपेढी तेथे आहे, त्याचाही विचार कॉंग्रेस नेतृत्वाने केला असावा. परंतु राहुल वायनाडमध्ये उभे आहेत, तेथे त्यांच्या विरोधात भाजपा नाही, तर प्रमुख प्रतिस्पर्धी डावे पक्ष आहेत आणि ही खरी ग्यानबाची मेख आहे. वायनाडमध्ये भाजपाचा उमेदवारच नाही. असे असतानाही राहुल यांनी वायनाड निवडावे यावर त्यामुळे टीका झाली. भाजपाने राहुल यांच्यावर पळपुटेपणाचा आरोप केला. केरळमध्ये डाव्यांविरुद्ध राहुल यांनी उभे राहणे डाव्यांना देखील मुळीच रुचलेले नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी तर अत्यंत प्रखरपणे राहुल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. कॉंग्रेस आणि भाजप हे एकाच माळेचे मणी आहेत आणि डाव्यांनी देऊ केलेल्या तिसर्‍या पर्यायाला सुरुंग लावण्यासाठीच राहुल वायनाडमध्ये उतरले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. राहुल यांच्या या निर्णयातून जनतेमध्ये चुकीचा संदेश दिला गेला आहे असे ते नुकतेच म्हणाले. कॉंग्रेसप्रणित यूडीएफने राहुल यांना वायनाडमध्ये उभे करून राज्यातील बहुतेक जागा जिंंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु तो हाणून पाडण्यासाठी डाव्या लोकशाही आघाडीने आणि उजव्या विचारांच्या भारत धर्म जनसेनेने कंबर कसली आहे. राहुल यांची वाट किती काटेरी आहे ते वायनाडमधील उमेदवारांच्या नावांवरूनच दिसून येते. ‘राहुल गांधी केके’, ‘राघुल गांधी’ असे विलक्षण नामसाधर्म्य असलेले उमेदवार मतदारांची दिशाभूल करण्यासाठी तेथे राहुल यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. यातील राहुल गांधी केके यांचे वडील कुंजुमन हे एक रिक्षाचालक होते आणि कॉंग्रेसचे कडवे समर्थक होते. त्यानी आपल्या दोन्ही मुलांची नावे राजीव आणि राहुल अशी ठेवली होती. परंतु त्यांचे राहुल आता खर्‍या राहुल गांधींच्या विरोधात ‘राहुल गांधी केके’ या आपल्या नावानिशी अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. कोईंबतूरच्या एका कॉंग्रेससमर्थकाचा पुत्र राघुल गांधीही या निवडणुकीत नामसाधर्म्यासह उतरला आहे. सामान्य मतदारांची फसगत करणार्‍या या उमेदवारांमुळे वायनाडची चुरस आणखी वाढली आहे! राहुल गांधींसाठी वायनाडची लढत व्यक्तिशः प्रतिष्ठेची तर आहेच, परंतु कॉंग्रेस किमान दक्षिण भारतामध्ये जम बसवण्याची जी धडपड करीत आहे, तिचे भवितव्यही हा निकाल सांगणार आहे!