लक्ष्य सेन पुढील फेरीत

0
111

ज्युनियर क्रमवारीत द्वितीय स्थानावर असलेल्य लक्ष्य सेन याने बीडब्ल्यूएफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. दुसर्‍या मानांकित लक्ष्य याने इंडोनेशियाच्या मोहम्मद रेहान दियाझ याचा ३६ मिनिटांत २१-१२, २१-१२ असा पराभव केला. भारताच्या इतर खेळाडूंचे आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. मुलांच्या एकेरीत १३वा मानांकित कार्तिकेय कुलशन कुमार, महिला एकेरीत गायत्री गोपीचंद व मुलांच्या दुहेरीत तिसर्‍या मानांकित कृष्ण प्रसाग गारगा व ध्रुव कपिला यांना पराजित व्हावे लागले. लक्ष्य याचा पुुढील सामना जपानच्या कोडाय नाराओका याच्याशी होणार आहे. ज्युनियर विभागात नाराओका १४व्या स्थानी आहे. भारताचा लक्ष्य या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असून आत्तापर्यंतच्या चारही सामन्यात त्याने एकही ‘गेम’ गमावलेला नाही. १४ वर्षीय गायत्री गोपीचंद हिची स्वप्नवत वाटचाल मात्र खंडित झाली. चीनच्या सहाव्या मानांकित काय यानयान हिने गायत्रीला २१-७, २१-११ असे हरविले. ज्युनियर गटात १०३१व्या स्थानी असलेल्या गायत्रीने यापूर्वीच्या दोन्ही फेर्‍यांत आपल्यापेक्षा सरस खेळाडूंचा पराभव करून सनसनाटी कामगिरी केली होती. परंतु, चीनच्या प्रतिस्पर्ध्यासमोर तिचा अनुभव कमी पडला. मुलांच्या एकेरीत १३व्या मानांकित कार्तिकेयने एका गेमच्या आघाडीनंतर सामना गमावला. पहिला गेम २१-१८ असा जिंकल्यानंतर आयर्लंडच्या न्हात एनगुयेनविरुद्ध त्याने पुढील दोन्ही गेम १५-२१, १३-२१ असे गमावले. तिसर्‍या मानांकित गारगा व कपिला यांचा पराभव धक्कादायक ठरला. ११व्या मानांकित रिनाव रिवाल्डी व येरेमिया इरिच योचे या इंडोनेशियाच्या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांना २१-१७, २१-१७ असे ३३ मिनिटांत हरविले.