लक्ष्य सेनने डानला झुंजविले

0
87

भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन याला दोनवेळच्या ऑलिम्पिक विजेत्या लिन डान याच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने न्यूझीलंड ओपन सुपर ३०० स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमधील सर्वांत अनुभवी खेळाडूंमध्ये गणना होत असलेल्या डान याच्याविरुद्धचा पहिला गेम २१-१५ असा जिंकत लक्ष्यने चांगली सुरुवात केली होती. परंतु, पुढील दोन्ही गेम १५-२१, १२-२१ असे गमवावे लागल्याने त्याच्यावर पराभव ओढवला. पुढील फेरीत डानचा सामना भारताच्याच समीर वर्मा याच्याशी होणार आहे. पाचव्या मानांकित समीरने दुसर्‍या फेरीत हॉंगकॉंगच्या ली चियुक यियू याला २१-१७, २१-१९ असे पराजित केले. बी. साई. प्रणिथ यानेदेखील अंतिम ८ खेळाडूंत स्थान मिळवताना डॅरेन ल्यू याला २१-१८, २१-१७ असे पाणी पाजले. अजय जयराम याचे आव्हान मात्र आटोपले. कोरियाच्या क्वांग ही हियो याने जयरामला २१-१५, २०-२२, २१-६ असे नमविले.

अन्य भारतीयांचे निकाल ः शिवम शर्मा व पूर्विशा राम पराभूत वि. चान पेंग सून व लियू यिंग गोह १६-२१, १४-२१, रोहन कपूर व कुहू गर्ग पराभूत वि. देचापोल पुआवारनुक्रोह व सापसिरी तेअरातानचाय ११-२१, ११-२१, मनू अत्री व सुमिथ रेड्डी वि. वि. पाकिन कुना अनुविट व नाथापेट त्रिंकाजी २१-९, २१-१२, मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम पराभूत वि. डेला डेस्टियेरा हॅरिस व रिझकी अमेलिया प्रदीप्ता १५-२१, ६-२१