लक्षद्विपची जलसफर

0
180

पणजीहून सकाळी निघून मंगळूरमार्गे रेल्वेने आम्ही रात्री १० वाजता कोचिनला पोहोचलो. तेथे नौदल अधिकार्‍यांनी आमचे स्वागत केल्यानंतर तेथील वेलिंग्टन या भव्य आस्थापनात आम्ही नेव्हीच्या पाहुणचाराचा सुखद अनुभव घेतला.
दुसर्‍या दिवशी ११ वाजता आयएनएस ‘कृष्णा’वरून आमच्या लक्षद्विप जलसफरीला प्रारंभ झाला. त्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पाच वाजता राजधानी ‘आंध्रोत’ येथे पोहोचलो. तेथील पारदर्शक सागरकिनार्‍यांच्या तळाशी पांढरीशुभ्र समुद्रफुले पाहून निसर्गाच्या एका अनोख्या आनंददायी आविष्काराचा अविस्मरणीय अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आंध्रोतील महत्त्वाची स्थळे पाहून बोटीवर परतलो. दुसर्‍या दिवशी ११ वाजेपर्यंत जेवढ्या निसर्गरम्य स्थळांचे दर्शन घेणे शक्य होते ते घेऊन, डेकवरून आपल्या देशाच्या मोहमयी निसर्गरम्य सागराच्या सान्निध्यातील बेटांचे दर्शन घेतले. त्यांत ‘बंगारम’ हे बेट बरेच मोठे होते. त्याचा विकास करून विमानतळाचा प्रकल्प सरकारच्या विचाराधीन असल्याचे कळले. पंचेचाळीस वर्षाचे लक्षद्विप हे असे होते. पण आज ते एक आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र म्हणून गाजले आहे.
त्यावेळची आमची लक्षद्विपची जलयात्रा म्हणजे भारतीय नौदलाचे एक बौद्धिकच होते.
‘विक्रांत’वरची दुसरी भेट
यासंदर्भात आयएनएस ‘विक्रांत’वरची पत्रकारांची दुसरी भेटही संस्मरणीय होती. १९६५ च्या भारत-पाक युद्धात या नौकेने फार मोठा पराक्रम केला होता. कराची बंदरावर सागरी हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते. त्या पराक्रमाच्या रम्य आणि चित्तथरारक सत्यकथा आम्हाला या दुसर्‍या भेटीत या पराक्रमात भाग घेतलेल्या अधिकार्‍यांनी ऐकवल्या होत्या. विक्रांतचे युद्धानंतरचे ते विजयी-पराक्रमी रूप आम्हाला फार आश्‍वासक भासले. आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी समर्पित भावनेने पार पाडणार्‍या त्या असामान्य शक्तीला अभिवादन करून आम्ही परतलो.
या प्रसंगानंतर अरेबियन समुद्र व हिंदी महासागरात नौदलातील युद्धनौका, पाणबुड्या आणि इतर नौकांच्या सागरी कवायती बघण्याचा योगही आला होता. तेव्हाही आम्हाला देशाभिमान वाटण्यासारख्या नौदलाच्या असामान्य कर्तृत्वाची खात्री पटली होती.
गोवा शीपयार्ड
गोव्यातील नौदलाच्या आस्थापनांशिवाय आणखी एक महत्त्वाचे आस्थापन म्हणजे वास्कोतील गोवा शिपयार्ड. नौदलासाठी जहाज बांधणीच्या कार्यात गुंतलेल्या गोवा शिपयार्डचे मॅनेजर पराडकर आणि त्यांच्या आस्थापनाचे कार्य उल्लेखनीय आहे.
भारताचा पूर्व-पश्‍चिम सागरी किनारा सुमारे साडेचार हजार किलोमीटरचा असून या सागरी हद्दीवर रात्रंदिवस पहारा ठेवून देशरक्षणाची फार मोठी कामगिरी नौदल करीत असते. म्हणून नौदलाला युद्धनौका बांधून देण्याची अतिमहत्त्वाची आणि कौशल्याची कामगिरी गोवा शिपयार्डकडे संरक्षण मंत्रालयाने सोपविली आहे. मुंबईतील माझगाव डॉकनंतर गोवा शिपयार्ड या जहाज बांधणीच्या कामात हातभार लावीत आहे. प्रसिद्धी अधिकारी या नात्याने त्यांच्या नव्या जहाजांच्या सागरप्रवेश समारंभाला मी पत्रकार बंधूंना घेऊन नियमित जात असे.
रिअर ऍडमिरल मनोहर अवटींबद्दल एक उल्लेख या लेखात आवश्यक वाटतो. गोव्यातून त्यांची पदोन्नती झाल्यानंतर ते वेस्टर्न कमांडचे व्हाईस ऍडमिरल झाले. पश्‍चिम किनार्‍याचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याची फार मोठी उल्लेखनीय जबाबदारी त्यांनी पार पाडली. ते एक असामान्य दर्यासारंग होते. सेवानिवृत्तीनंतरही ते कार्यमग्न असत. पर्यावरणाचे संरक्षण यात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. इतरही अनेक सेवाभावी समाजकार्यात ते मग्न असत. त्यांच्या सहवासातील माझे क्षण अविस्मरणीय आहेत.
नौदल आणि अलौकिक कर्तृत्वाच्या नाविक अधिकार्‍यांशी झालेली जवळीक माझ्या जनसंपर्क कार्यातील एक मोठी ठेव आहे. त्यांच्याकडून माझे बरेच ज्ञानप्रबोधन झाले. मी कधीच विसरू शकत नाही.