‘लकी सेव्हन’ पुन्हा किनारी

0
123

>> वादळी वारे व लाटांमुळे जहाज माघारी

मीरामार किनार्‍यावर रूतून पडलेले ‘लकी ७’ हे जहाज दोन दिवसांपूर्वी किनार्‍यापासून जरा पुढे म्हणजेच २५० ते ३०० मीटर्स समुद्रात ढकलण्यात ते तेथून हलवण्यासाठी आलेल्यांना यश आले होते. मात्र, वादळी वारा व समुद्री लाटांमुळे हे जहाज काल पुन्हा किनार्‍यावर येऊन धडकले. त्यामुळे हे जहाज किनार्‍यापासून २५० ते ३०० मीटरच्या अंतरावर हलवण्यासाठी केलेले कष्ट वाया गेले आहेत.
मिरामार किनार्‍यावर रूतून पडलेले हे जहाज तेथून आग्वाद खाडीत नेण्याचा जहाज मालकाचा विचार होता. त्यासाठीचे प्रयत्न गेल्या बर्‍याच दिवसांपासून सुरू होते. दोन दिवसांपूर्वी जहाज किनार्‍यापासून २५० ते ३०० मीटरपर्यंत समुद्रात हलवण्यात यश आल्याने त्या कामात मग्न असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, वादळी वारा व समुद्री लाटा यामुळे जहाज परत एकदा किनार्‍यावर पूर्वीच्याच ठिकाणी येऊन रूतून बसले. त्यामुळे मदत कार्यातील लोकांमध्ये निराशा पसरली. वादळी वारा व खवळलेला समुद्र अशा वातावरणात जहाज हलवण्याचा प्रयत्न केल्यास दोरखंड तुटण्याचा संभव असतो. त्यामुळे एकूण वातावरणाचा अंदाज घेऊन जहाज हलवण्यासाठीचे काम उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्या जहाज हलवण्यासाठी पोषक असे वातावरण असल्याचे दिसून आल्यास उद्या पुन्हा जहाज हलवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कॅप्टन ऑफ पोटर्‌‌स जेम्स ब्रागांझा यांनी सांगितले.
२७ पर्यंत हलवण्याचा हायकोर्टाचा आदेश
मीरामार किनार्‍यावर रुतलेले हे जहाज २७ सप्टेंबरपर्यंत तेथून हलवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यापूर्वीच हे जहाज ज्या कंपनीचे आहे त्या गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लिमिटेड ह्या कंपनीला दिलेला आहे. आणि सदर कंपनीनेही त्यापूर्वी सदर हलवण्याचे आश्‍वासन न्यायालयाला दिलेले आहे. त्यासंबंधीची पुढील सुनावणीही २७ सप्टेंबर रोजीच होणार आहे.