लँझारोटेच्या गोलांमुळे गोव्याची जमशेदपूरवर मात

0
119

स्पेनिश मध्यपटू मॅन्युएल लँझारोटेने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर रंगतदार झालेल्या लढतीत एफसी गोवा संघाने जमशेदपूरचा बलाढ्य बचाव भेदत २ -१ असा विजयासह हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पूर्ण गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली.
गोव्याला मागील तीन सामन्यांत अनुक्रमे पराभव-बरोबरी-पराभव असे अपयश आले होते. त्याआधी गोव्याने सलग तीन विजय मिळविले होते. घरच्या मैदानावरील कामगिरीसह गोव्याने फॉर्म पुन्हा मिळविला. गोव्याने नऊ सामन्यांत पाचवा विजय नोंदविला. एक बरोबरी व तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.

गोव्याने १६ गुणांसह पाचवरून एक क्रमांक प्रगती करीत चौथे स्थान गाठले. एफसी पुणे सिटीप्रमाणेच गोव्याचे १६ गुण झाले आहेत, पण यात पुण्याचा गोलफरक ८ (१८-१०) गोव्याच्या ६ (२२-१६) पेक्षा सरस आहे. बंगळुरु एफसी १८ गुणांसह आघाडीवर आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील चेन्नईन एफसीचे १७ गुण आहेत. पाचव्या क्रमांकावरील मुंबईचे १४ गुण आहेत. त्यामुळे लीगचा निम्मा टप्पा पूर्ण होत असताना चुरस शिगेला पोचली आहे.

जमशेदपूरचे सातवे स्थान कायम राहिले. नऊ सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांचे दहा गुण आहेत.
४२व्या मिनीटाला उजवीकडून ब्रँडन फर्नांडडिसने मॅन्युएल लँझारोटे याच्या साथीत चाल रचत आगेकूच केली. तो नेटजवळ येऊन गोलसाठी प्रयत्न करणार तोच जमशेदपूरच्या आंद्रे बिके याने त्याला पाडले. त्यामुळे गोव्याला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. त्यावर जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने पंचांशी हुज्जत घातली. परिणामी सुब्रतला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. अखेरीस लँझारोटेने पेनाल्टवर मारलेला चेंडू नेटमध्ये गेला, पण तो किक मारण्यापूर्वीच खेळाडूने पेनाल्टी क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे लँझारोटेला पेनाल्टी पुन्हा घ्यावी लागली. तेव्हा त्याच्यावर काहीसे दडपण जाणवत होते, पण त्याने एकाग्रता साधत नेटच्या उजव्या बाजूला वर चेंडू मारत सुब्रतला चकविले.

पूर्वार्धातील धसमुसळ्या चुरशीचे पडसाद उत्तरार्धात सुरवातीपासून उमटले. जमशेदपूरने ५४व्या मिनीटाला बरोबरी साधली. उजवीकडून जेरी माहमिंगथांगा याने आगेकूच केली. त्यावेळी त्याचे सहकारी त्रिंदादे आणि अझुका नेटच्या दिशेने धावत होते, गोव्याची बचाव फळी मात्र तेव्हा गाफील होती. जेरीने नेटच्या दिशेने हवेतून चेंडू मारला. अझुका आणि त्रिंदादे या दोघांनी हेडींगसाठी उडी घेतली. यात अझुकाचा अंदाज चुकला, पण यामुळे गडबडून न जाता त्रिंदादे याने अचूक हेडींग करीत गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकविले.

आघाडी गमावल्यानंतर गोव्याने आपल्या नैसर्गिक शैलीनुसार आक्रमण अधिक तीव्र केले. सुरवातीला लँझारोटे आणि नंतर फेरॅन कोरोमीनास यांचे प्रयत्न हुकले, पण त्यामुळे सुब्रतवर दडपण आले. ६०व्या मिनीटाला लँझारोटेला ब्रँडन फर्नांडीसने सुरेख पास दिला. त्यावेळी जमशेदपूरचा बचावपटू टिरी त्याला रोखू शकला असता, पण लँझारोटेने त्याला बाजूला ढकलत डाव्या पायाने अफलातून फटका मारत नेत्रदीपक गोल केला.