रोहित, धवन, विराट ‘ए प्लस’ श्रेणीत

0
112

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी खेळाडूंसोबत आपली नवीन वर्षिक करार यादी काल बुधवारी जाहीर केली. यानुसार ‘ए प्लस’ या नवीन श्रेणीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीक कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार व जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूला बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळणार आहेत.

‘ए’ श्रेणीत महेंद्रसिंह धोनी, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे व वृध्दिमान साहा हे खेळाडू आहेत. त्यांना वर्षाला ५ कोटी रुपये मिळतील. वार्षिक ३ कोटी रुपयांच्या ‘बी’ श्रेणीमध्ये लोकेश राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा व दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. ही श्रेणी प्रणाली ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८पर्यंत लागू असणार आहे. ‘सी’ श्रेणीत असलेल्या केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल आणि जयंत यादव यांना वार्षिक १ कोटी रुपये मिळतील. घरघुती हिंसाचार व विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा पत्नीने आरोप केलेल्या मोहम्मद शमीचा कोणत्याही श्रेणीसाठी विचार करण्यात आलेला नाही. तसेच मागील वार्षिक करारात असलेल्या ऋषभ पंत व युवराज सिंग यांना वगळण्यात आले आहे.

महिलांनाही श्रेणी पद्धत
महिला क्रिकेट खेळाडूंचीही श्रेणीप्रणाली बीसीसीआयने जाहीर केली आहे. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीन श्रेणीमध्ये याचे विभाजन करण्यात आले आहे. ‘ए’ श्रेणीमधील

खेळाडूंना ५० लाख,
‘बी’ श्रेणीमधील खेळाडूंना ३० लाख आणि ‘सी’ श्रेणीमधील खेळाडूंना १० लाखांची वार्षिक रक्कम मिळणार आहे. ‘ए’ श्रेणीमध्ये कर्णधार मिताली राज, झुलन गोस्वामी, स्मृती मंधाना आणि हरमनप्रित कौर यांचा समावेश करण्यात आला आहे.