रोहितची पाचव्या स्थानी झेप

0
114

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने पाचवे स्थान मिळविले आहे. पाच सामन्यांत ३६च्या सरासरीने केवळ १८० धावा जमवूनही विराटने आपले पहिले स्थान राखले आहे. कांगारुंविरुद्धच्या मालिकेत सर्वादिक २९६ धावा जमवलेल्या रोहितचे चार स्थानांची झेप घेतली. रोहितच्या खात्यात आता कारकिर्दीतील सर्वाधिक ७९० रेटिंग गुण जमा आहेत. रोहितव्यतिरिक्त भारताचा दुसरा सलामीवीर अजिंक्य रहाणेने चार क्रमांकांची सुधारणा करत २४व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनीदेखील प्रगती साधली आहे. ९ स्थानांनी वर सरकताना फिंच १७व्या तर द्वितीय स्थानावरील वॉर्नरने कोहली व आपल्यातील अंतर २६ गुणांवरून १२ गुणांपर्यंत कमी केले आहे. अन्य खेळाडूंचा विचार केल्यास केदार जाधव (+ ८, ३६वे स्थान), मार्कुस स्टोईनिस (+ ७४, ५४वे स्थान) यांनी फलंदाजांमध्ये सकारात्मक वाटचाल केली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेला मुकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूडला आपले पहिला क्रमांक गमवावा लागला आहे. द. आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहीर पुन्हा पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. मालिका हुकल्यामुळे हेझलवूडला १८ गुण गमवावे लागले आहेत भारताचा डावखुरा गोलंदाज अक्षर पटेल याने तीन क्रमांकांची उडी घेत सातवे स्थान मिळविले आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल (+ २४, ७५वे स्थान) व कुलदीप यादव (+ ९. ८०वे स्थान) यांनी चढत्या क्रमाने आपला प्रवास कायम ठेवला आहे. सांघिक क्रमवारीत भारतीय संघ १२० गुणांसह पहिल्या स्थानी आहे. यानंतर द. आफ्रिका (११९) व ऑस्ट्रेलिया (११४) यांचा क्रम लागतो. केवळ ९५ गुण खात्यात असलेला पाक सहाव्या स्थानी आहे.