‘रोम वॉझ् नॉट  बिल्ट इन अ डे’

0
151

– श्रद्धानंद वळवईकर

इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे – रोम वॉझ नॉट बिल्ट इन अ डे. होय! कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यकता असते ती ठराविक वेळ, मनातील तीव्र इच्छाशक्ती आणि जिगरबाज प्रवृत्तीची. याच्याच जोडीला जग जिंकण्याचा आत्मविश्‍वासही एखाद्या माणसाला कणखर बनवितो. दक्षिण कोरियात नुकत्याच संपन्न झालेल्या १७ व्या ‘इंचिऑन एशियाड’मध्ये भारतीय ऑलिंपिक संघटनेचा (आयओए) चमू सर्वंकष विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने उतरला नव्हता, कारण रोमची निर्मिती एका रात्रीत शक्य नव्हती हे उदाहरण आपल्याला माहित आहेच. अवघ्या रात्रीत विजयी चमत्कार घडवून ‘एशियाड’ मध्ये विजयी तथा पदकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची क्षमता भारतीय क्रीडापटूंतच नव्हे तर इतर प्रतिस्पर्धी राष्ट्रांच्या क्रीडापटूंतही आढळणारी नाही. बालवयातच मुलांवर क्रीडा संस्कृती लादली गेली तर भविष्यात आपणास त्याचे उत्तम परिणाम मिळणे शक्य आहे. उच्च दर्जात्मक पायाभूत क्रीडा सुविधा, प्रतिभावंत क्रीडापटूंना कुशल तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून उत्तम प्रशिक्षण आणि मार्गदर्शन यातूनच क्रीडामैदानी वर्चस्वी कामगिरी करून देशगौरव वृद्धिंगत करू शकणारे दर्जेदार क्रीडापटू सज्ज होऊ शकतात. देशाचे क्रीडाविकासात्मक धोरण जर युवा क्रीडापटूंसाठी सकारात्मक लाभ दर्शविणारे असले, तर त्यातून उज्ज्वल भवितव्याचे क्रीडापटू घडावेत. भारतीय क्रीडा क्षेत्रावरून एकवार नजर फिरविल्यास देशी क्रीडापटूंचा दर्जा विकसनशील आहे, याचा अनुभव येतो. जागतिक क्रीडा क्षेत्रातील क्रीडापटूंत वाढलेली स्पर्धात्मक चुरस, या क्रीडापटूंना लाभत असलेल्या दर्जेदार सोयीसुविधा, कुशल प्रशिक्षण आणि क्रीडा प्रशासनाचे उत्तम सहकार्य यातूनच गेल्या दशकभरात भारतीय क्रीडापटूंचा विजयी प्रभाव जाणवू लागला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘इंचिऑन एशियाड’ स्पर्धांत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या भारतीय चमूने एकूण पदकतक्त्यात आठवे स्थान पटकावताना ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ३६ कांस्य पदकांसह ५७ पदकांची कमाई केली. चार वर्षांपूर्वी भारतीय चमूने ‘गुआंगझौ एशियाड’ मध्ये १४ सुवर्ण, १७ रौप्य आणि ३४ कांस्य पदकांसह एकूण ६५ पदके पटकावली होती. तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास यंदा भारताला ८ पदकांचे नुकसान संभवत असले तरी राष्ट्रीय खेळ हॉकीसह, रोविंग, वुशू, नौकानयन, जलतरण या क्रीडा प्रकारांत पदकीय यश संपादन करून भारतीय क्रीडापटूंनी ऍथलेटिक्स, कबड्डी, नेमबाजी, तीरंदाजी, बॅडमिंटन, टेनिस आदी खेळांच्या पलिकडेही पदकीय मजल गाठण्याची आपली क्षमता दर्शवून दिली आहे.
मुष्टियुद्धामधील हुकमी विजेंदर सिंग, ऑलिंपियन कुस्तीपटू सुशील कुमार, टेनिसमधील लियांडर पेस, महेश भूपतीसह सोमदेव देववर्मन आदी ‘स्टार’ खेळाडूंची माघार तसेच संभाव्य पदक विजेत्यांसह गणली गेलेली धडाडीची महिला बॅडमिंटन ‘स्टार’ सायना नेहवाल यांच्या अनुपस्थितीचा परिणाम भारताच्या इंचिऑन ‘एशियाड’मधील अंतिम पदकतालिकेत जाणवला. मात्र, हॉकी इंडियाच्या सनसनाटी तथा सुवर्णपदकीय प्रभावाने भारतीय चमूला अधोरेखित केले आहे. ‘लिडिंग फ्रॉम दी फ्रंट’ म्हणजेच आघाडीवर राहून प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणे किंवा त्यांचा सामना करणे या उदाहरणात हॉकी इंडियाचा कप्तान सरदारा सिंगने विजयी जान फुंकली आहे. आघाडीवरून लढण्याची जिद्द पहावी ती पंजाबी सुपुत्रातच. इंचिऑन एशियाडच्या उद्घाटन प्रसंगी ध्वजसंचलनात भारतीय ध्वजधारक कोण असावा? निश्‍चितच ही व्यक्ती अनुभवी हॉकीपटू सरदारा सिंगच होती. शुभारंभीदिनी ध्वजसंचलनात आघाडीवर असलेल्या सरदारा सिंगने अखेरपर्यंत आपला मोर्चा सांभाळताना सुवर्णपदकासह हॉकी इंडियाला विजयी पर्वाच्या सान्निध्यात नेण्याचा पराक्रम केला. एशियाडच्या ३२ वर्षांच्या इतिहासात हॉकी सुवर्णपदकासाठी भारत-पाक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत यंदा प्रथमच चुरस रंगली. तत्पूर्वी, गट लढतीत पाकने भारताला पराभूत करून आपली वर्चस्वी क्षमता दर्शविली होती. अंतिम निर्णायक लढतीत पाकिस्तानी संघाने प्रारंभीच गोल लादून भारताला पिछाडीवर टाकले होते. परंतु, क्रिकेट असो वा हॉकी उभय संघांदरम्यानच्या निर्णायक लढती दरवेळी रंगतदार चुरशीत संपुष्टात आल्याचे इतिहास दर्शवितो आहे. कप्तान सरदारा सिंगच्या कुशल नेतृत्वकौशल्य आणि लढावू बाण्याने अखेर १६ वर्षांच्या दीर्घ कालखंडाअंती हॉकी इंडियाने ‘एशियाड’चा सुवर्णगोल साधला. संघाचा अफलातून गोलरक्षक परट्टू श्रीजेश याची अविस्मरणीय कामगिरी आणि हॉकी इंडियाची सांघिकता यातून हे ऐतिहासिक यश रेखाटले गेले आहे. निव्वळ सुवर्णयशच नव्हे, तर हॉकी इंडियाने या विजेतेपदासह २०१६ सालच्या ब्राझीलमधील रिओ ऑलिंपिक क्रीडामहोत्सवासाठीही थेट पात्रता गाठली आहे, हे विशेष. यंदाच्या ‘एशियाड’मध्ये एखाद्या मुख्य क्रीडा प्रकारात भारतीय संघाने साधलेली ही महान उपलब्धी आहे.
आत्मविश्‍वासाने परिपूर्ण हॉकी इंडियाला आता रिओ ऑलिंपिकपर्यंत आपल्या खेळदर्जात अधिक प्रगती करण्याची संधी प्राप्त होणार आहे. ऑलिंपिक्समध्ये या संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड यांसारख्या संघांशी मुकाबला करावा लागणार असून संघ प्रशिक्षक टेरी वॉल्श आणि संचालक ऑल्टमन्स यांच्या तंत्र कुशलतेची कसोटीच येथे लागणार आहे. १९२८ ते १९८० सालापर्यंतचा हॉकी इंडियाचा वैभवी सुवर्णकाळ पुन्हा साकारण्यासाठी भारत प्रयत्नशील असून ‘एशियाड’च्या सुवर्णपदकाने आता या संघाकडून भविष्यातील अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय महिला हॉकी संघानेही कांस्य पदक पटकावून ‘एशियाड’मध्ये चमक दाखविली आहे.
हॉकी संघांनंतर भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी ‘एशियाड’मधील आपले वर्चस्व कायम राखताना ऐतिहासिक यश संपादन केले. ‘एशियाड’ पूर्वीच भारतात रंगलेल्या प्रो-कबड्डी स्पर्धेचा देशी खेळाडूंना उत्तम लाभ झाल्याचे संकेत या सुवर्णपदकाने दिले आहेत. १९९१ साली बिजिंग आशियाई क्रीडा स्पर्धांत कबड्डी खेळाला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आल्यावर भारतीय पुरुष संघाने अखंडितपणे सलग सातवे ‘एशियाड’ सुवर्णपदक यंदा प्राप्त केले आहे. मात्र, हे विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय पुरुष संघाला यंदा बरीच मेहनत घ्यावी लागली. यावरून भारताचे प्रतिस्पर्धी आणि रौप्यपदक विजेत्या इराण संघाची कबड्डीतील प्रगती लक्षात यावी.
पाचवेळच्या विश्‍वविजेत्या भारतीय पुरुष संघाला २७-२५ अशा निसटत्या फरकाने हा ‘एशियाड’ विजय संपादन करता आला. कप्तान राकेश कुमारसह जसवीर सिंग, अनुप कुमार, मनजीत चिल्लर, नवनीत गौतम, गुरप्रीत सिंग आणि अजय ठाकूर यांच्या सांघिक प्रयत्नामुळे भारताला इराणविरुद्धच्या अंतिम फेरीत जोरदार संघर्षानंतर सुवर्णपदकाला गवसणी घालता आली. कबड्डीतील देशाचे युवा भविष्य सुब्रह्मण्यम राजगुरु, सुरजीत कुमार आणि नितीन मदाने यांनी बदली खेळाडूंच्या स्वरूपात मैदानात उतरून निर्णायक क्षणी केलेली प्रेक्षणीय खेळी भारतीय विजय साकारून गेली. या देशी प्रकारातून भारतीय महिला संघानेही आपल्या प्रतिष्ठेनुरुप उत्तम डावपेचात्मक कौशल्य पणाला लावत सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले. या संघाचे हे दुसरे आशियाई सुवर्णपदक आहे.
मुष्टियुद्ध खेळप्रकारात गेल्या दशकभरापासून भारतीय स्पर्धक पदकीय यश प्राप्त करत आलेले आहेत. मात्र, इंचिऑनमधील अप्रामाणिक पंचगिरीचा फटका भारतीय मुष्टियोध्यांना यंदा बसला. उपांत्य फेरीत महिला वर्गातून भारताच्या लैशराम सरिता देवीला यजमान दक्षिण कोरियाच्या जिना पार्कविरुद्धच्या लढतीत अनपेक्षितरित्या पराभूत घोषित करण्यात आले. पूर्ण लढतीत एल. सरिता देवीचे वर्चस्व अनुभवलेल्या प्रेक्षकांनाही रेफ्रींच्या या पक्षपाती निर्णयाने अचंबित केले. या मैदानी अन्यायाने एल. सरिता देवीला स्वत:ला सावरता आले नाही आणि तिला रडूच कोसळले. पदक वितरण सोहळ्यावेळी तिने आपले कांस्य पदक प्रतिस्पर्धी पार्क हिच्या गळ्यात टाकून स्वत:चा अखिलाडूपणा स्पष्टपणे दर्शविला. मात्र, एशियाड प्रशासन आणि बॉक्सिंग इंडिया यांच्याकडून तिच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळताच तिने या प्रकरणावर बिनशर्त पडदा टाकण्याची विनंती करून अधिकारी वर्गाची माफी मागितली.
मुष्टियुद्धामधील पक्षपाती पंचगिरीचा फटका मोंगोलियाचा मुष्टियोद्धा तुग्स्‌सॉगृ न्यामबायरलाही सहन करावा लागला. त्याला यजमान दक्षिण कोरियाच्या सॅन्ग मिऑन्गविरूद्धच्या लढतीत वर्चस्व राखूनही रेफ्रींच्या आदेशानुसार गाशा गुंडाळावा लागला. महिलांच्या ३००० मी. स्टीपलचेस प्रकारात बहरीनची धावपटू रूथ जेबेट धावताना अपात्र ठरली असताना तिच्यावर कारवाई न करता तिला विजयी घोषित करण्यात आले. याचा फटका रौप्य आणि कांस्यपदक प्राप्त केलेल्या भारतीय महिला धावपटूंना बसला. अन्यथा भारताचे आणखी एक सुवर्णपदक निश्‍चित वाढले असते. अशा प्रकारे पक्षपाती आणि निकृष्ट पंचगिरीने यंदाच्या एशियाडने क्रीडापटूंच्या मानसिकतेचा जणू अंतच पाहिला.
‘गोल्डन मॅन’ जितू रायने पन्नास आणि दहा मीटर्स एअर पिस्तुल प्रकारातील आपले वर्चस्व आणि कुशलता कायम राखताना सुवर्णवेध घेतला. भारतीय लष्करी सेवेत असलेल्या या ११ – गुरखा रेजिमेंटच्या नायब सुभेदाराने ५० मीटर्स प्रकारातून सुवर्ण तर दहा मीटर प्रकारातून कांस्यपदक पटकावून संपूर्ण देशाचे लक्ष्य वेधले. पुरुष तीरंदाजीत सांघिक प्रकारात संदीप कुमार, रजत चौहान व अभिषेक वर्मा यांनी अचूक तीर लावताना सुवर्ण लक्ष्य साधले. स्न्वॅश प्रकारात सौरभ घोषाल, हरिंदर पाल सिंग संधू, महेश माणगावकर व कुश कुमार यांनी सांघिक सुवर्णपदक पटकावताना आपल्या चमकदार खेळाचे प्रदर्शन घडविले. कुस्तीमध्ये योगेश्‍वर दत्तने सुशील कुमारची अनुपस्थिती दर्शवू न देता सुवर्णपदक पटकावून आपले बलप्रदर्शन केले. ऍथलेटिक्समध्ये सीमा पुनियाने थाळीफेक प्रकारात, टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा व साकेत मायनेनी जोडीने, एम. सी. मेरी कॉमने महिला मुष्टियुद्धामध्ये तर भारतीय महिला रिले संघाने ४४०० मीटर्स (प्रियांका पनवार, टिंटू लुका, मनदीप कौर, एम. पोवम्मा) प्रकारात आपले विजयी वर्चस्व राखून देशासाठी सुवर्ण पदकीय यश संपादन केले. ऍथलेटिक्समध्ये विकास गौडा (थाळीफेक) व टिंटू लुका (८०० मीटर्स) यांनी रौप्य पदकांची कमाई केली तर मंजू बाला (हतोडा फेक), अन्नू राणा (भालाफेक), खुशबीर कौर (२० की. मी. चालण्याची शर्यत), ललिता बाबर (३००० मी. स्टीपल चेस), इंद्रजित सिंग (गोळा फेक), एम. आर. पुवम्मा (४०० मी.) व ओ. पी. जैशा (१५०० मी.) यांनीही पदकविजेत्यांत स्थान राखून दक्षिण कोरियात भारतीय गौरवगाथा लिहिली. भारताने जलतरण, नौकानयन, बॅडमिंटन, या प्रकारांत प्रत्येकी एक कांस्य पदक तर वूशूमध्ये दोन कांस्यपदकांवर शिक्कामोर्तब करून भविष्यात या प्रकारांत अधिकतर यश प्राप्त करण्याचा निर्धार दाखविला आहे. रोविंगमध्ये ३, मुष्टियुद्ध १ सुवर्ण, १ रौप्य व दोन कांस्यपदके, कुस्तीसह टेनिसमध्ये एक सुवर्ण व एक रौप्यपदकासह तीन कांस्यपदके (प्रत्येकी) २ – स्न्वॅशमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य तर मैदानी ऍथलेटिक्समध्ये एकूण १३ पदकांत दोन सुवर्ण, चार रौप्य व सात कांस्यपदकांची नोंद करून भारतीय चमूने आश्‍वासक प्रगती साधली आहे. २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांत या यशस्वी पदक विजेत्यांकडून देशाला पदकीय वर्चस्वाची अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. अजून वर्ष-दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. ऑलिंपिकसाठी पदकीय सज्जता राखण्याची क्षमता भारतीय क्रीडापटूंना एकवटायची आहे. ऑलिंपिक कौंसिल ऑफ एशियाचे अध्यक्ष शेख अल – सबाह यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या धोरणावर चौफेर टीका केलेली आहे. एशियाडमध्ये टीम इंडियाचा संघ सहभागी व्हावा यासाठी ऑलिंपक कौंसिल ऑफ एशियातर्फे शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. परंतु बीसीसीआयने त्यांच्या या मागणीला दाद न दिल्याने, टीम इंडियाने त्यांची नाराजी ओढविली आहे.
‘एशियाड’ क्रिकेटचा अंतिम सामना श्रीलंका व अफगाणिस्तान या उभय संघात रंगून अखेर श्रीलंकेने बाजी मारत सुवर्णपदक पटकाविले. ‘एशियाड’चा प्रवास २०१८ सालापर्यंत जकार्ता (इंडोनेशिया) पर्यंत पोहोचणार आहे. या स्पर्धांच्या १८ व्या आवृत्तीसाठी जकार्ता शहराला सर्वाधिक पसंती मिळालीय. या स्पर्धांत क्रिकेटचा समावेश असेल हे नक्की, मात्र त्यात भारतीय संघाचा समावेश राहिल्यास सर्वोत्तम. तूर्त, इंचिऑन – दक्षिण कोरियातील १७ व्या एशियाड स्पर्धांचा निरोप घेताना आशियाई क्रीडापटूंनी दिलेल्या पदकीय योगदानाची स्तुती होणे आवश्यक ठरते. कारण, अथक परिश्रम, जिगरबाज प्रयत्न आणि पदकीय संघर्ष यातून ही फलश्रुती साकारली गेली आहे. महिना – दोन महिन्यांतील परिश्रमाचे हे पदक फलित नाही. ही गेल्या कित्येक वर्षांतील क्रीडापटूंच्या मैदानी प्रयत्नांची आणि क्रीडाश्रमाची पदकस्वरूपी पोचपावती आहे. म्हणतात ना… ‘रोम वॉझ् नॉट बिल्ट इन ए डे’, हे तंतोतंत खरे की नाही!
……….