रोमिंग फ्री… हे विश्‍वचि…!

0
119

 

‘मागच्या बाजूला एका माणसाचं चित्र होतं. ते मी तुकडे जोडून जुळवलं. दुसर्‍या बाजूचं जगाचं चित्र आपोआप जोडलं गेलं ना?’ .. खरंच, माणूस जोडला की जग जोडलं जातंच ना? हे ज्यावेळी माणसाच्या जीवनात उतरेल तेव्हाच ज्ञानोबांची अनुभूती आपली अनुभूती बनेल. ‘… हे विश्‍वचि माझे घर’. हो ना?

आपला गोवा आधीच सुंदर. त्यातही ग्रामीण भाग तर हिरवाईनं नटलेला. त्या भागातून मुसाफिरी करताना एक विचार नेहमी मनात डोकावतो. ‘भारताच्या नकाशावर एवढासा टिचभर दिसणारा गोवा जर एवढा मोठा आहे तर एकूणच आपला देश किंवा जग किती विस्तीर्ण असेल!
त्या दिवशी हिरवी जमीन नि निळं आकाश यांच्या मांडवातून फिरताना हा अनुभव अधिक प्रकर्षानं आला. कारण आत्ता रेती दिसू लागेल .. आत्ता किनारा दिसेल .. आत्ता फेसाळणारा समुद्र दिसेल असं वाटत असताना जमीन काही संपत नव्हती. आकाश संपण्याचा प्रश्‍नच नव्हता. एका प्रशस्त माळरानातल्या एका मोठ्या पाषाणावर जरा विसावलो.
रंगीबेरंगी पक्षी आकाशात नक्षी काढत होती. ही नक्षी गाणारी होती म्हणून रात्रीच्या नक्षत्रांच्या नक्षीपेक्षा सरस होती. किती नवेनवे पक्षी हजारों किलोमीटर्सचं अंतर ‘उड्डाणून’ गोव्यात येतात. पक्षी डोळ्यांनी नव्हे तर पंखांनी विस्तारलेल्या क्षितीजाकडे नि पसरलेल्या भूमीकडे पाहतात याचा साक्षात्कार अशाच भ्रमंतीत पूर्वी झाला होता. एक खंड्या (किंगफिशर) पक्षी खूप विशाल अशा शेताच्या मध्यभागी असलेल्या उंच काठीवर बसला होता. त्याला पाहून मनात विचार आला, ‘एखाद्या ठिपक्यासारख्या दिसणार्‍या या जिवाला हे शेत केवढं असीम अमर्याद दिसत असेल!’ पण हा विचार मनात झळकून जातो न जातो तोच तो खंड्या आकाशात उडाला नि काही क्षणात ते अपार अवकाश पंखांच्या कवेत घेत दृष्टीआडही झाला. तेव्हा आतून जाणवलं की प्रत्येकाचं ‘बघण्याचं’ इंद्रिय (साइट) जरी डोळे असलं तरी ‘पाहण्याचं’ इंद्रिय (व्हिजन) वेगळं असतं. असो.
जमीनीवर पडलेली एक बांबूची काठी घेऊन ती फिरवत मजेत जात होतो. सर्व बाजूंनी आकाश स्पर्श करत होतं. उगीचच विचार मनात आला, ‘दिवसाचं आकाश गद्य असतं, जरी तेजस्वी असलं तरी. पण रात्रीचं आकाश असतं पद्य, नव्हे काव्य! अंधारलेल्या अवकाशात चंद्र-तारे-नक्षत्रं यांच्या रचनेत कधी साधी कविता असते तर कधी गूढ महाकाव्य!
सहज आठवण आली कॉलेजमध्ये अभ्यासासाठी असलेल्या एका इंग्रजी कादंबरीची. थॉमस हार्डी या लेखकाची अमर साहित्यकृती- ‘टू ऑन् अ टॉवर’- ‘मनोर्‍यावरची ती दोघं’! मनोरा आहे अवकाशाच्या वेधासाठी वापरल्या जाणार्‍या छोट्या वेधशाळेचा, (ऑब्झर्वेटरी) त्यावर बसवलेल्या चांगल्या क्षमतेच्या दुर्बिणीतून नक्षत्रवेध घेणारा अंतराळ वैज्ञानिक (ऍस्ट्रॉनॉमर्) स्विदिन नि त्या वास्तूची मालकीण लेडी कॉन्स्टंटाइन. त्या अनंततेच्या कॅनव्हासवर खुलत – रंगत जाणारी त्या दोघांची प्रेमकथा ही मध्यवर्ती कल्पना होती.
त्यात एक विचार खरंच विचार करण्यासारखा होता. मर्यादा नसलेल्या, सतत विस्तारत जाणार्‍या अवकाशाचं निरीक्षण करणारी व्यक्ती अहंकारी असूच शकत नाही. कारण अनंत अवकाशाच्या नि त्यातील असंख्य तारे-आकाशगंगा-सौरमाला यांच्या पार्श्‍वभूमीवर आपलं जगच जर एखाद्या धूलिकणाइतकं नगण्य, क्षुद्र वाटतं तर मग आपलं राज्य-संपत्ती-घर-नि आपण स्वतः यांची काय किंमत असणार?
आपली दृष्टी जेवढी विशाल तेवढी व्यक्ती म्हणून आपली किंमत, एकूणच आपला मोठेपणा आपली वृत्ती नम्र आणि अल्प बनते. नुसता भूगोल नि इतिहास अभ्यासून आपल्या या जगाचं महत्त्व नि जगातल्या व्यक्तींचं महात्म्य आपण जाणू लागलो तर आपली फसगतच होईल. भव्यतेचा नि सूक्ष्मतेचा ध्यास घेतलेले वैज्ञानिक, प्रतिभावंत, विचारवंत, कलावंत हेच खर्‍या अर्थानं चांगली माणसं बनू शकतात. त्यांना वैज्ञानिक महत्त्वाकांक्षा नसते. ते स्वतःला अस्सल समाजसुधारक किंवा सेवक मानतात.
या संदर्भात दोन परस्परविरोधी उदाहरणं आढळतात. नेपोलियन, हिटलर यांच्यासारखे जग जिंकण्याची इच्छा असलेले नि त्या दृष्टीनं प्रयत्न करणारे आपल्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीनं अपयशी ठरले नि त्यांच्या जीवनात काहीसे विक्षिप्त बनले. याउलट टॉलस्टॉय, सॉक्रेटीस, इतर संतसत्पुरुष विश्‍वाच्या अनंततेचा विचार करून मानवतेच्या दृष्टीनं महान विभूती ठरले.
अथेन्स(ग्रीसची राजधानी)मधील एका अतिश्रीमंत जमीनदाराला जगाच्या नकाशावर त्याची शेतजमीन दाखवायला सांगून त्याच्या अहंकाराला दूर करणारा सॉक्रेटीस हेच महत्त्वाचं तत्त्व सांगून जातो की विश्‍वाचा – समष्टीचा विचार केला तर आपण लौकीक अर्थानं कितीही मोठे – श्रीमान, सत्ताधारी, ज्ञानी, पराक्रमी असलो तरी प्रत्यक्षात क्षुद्रच आहोत.
एव्हाना आकाश जरा अंधारून आलं होतं. सूर्य दाट ढगामागे लपल्यामुळे लवकर सूर्यास्त झाल्यासारखं वाटत होतं. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत सूर्य ढगामागून काही किरणांचे झोत पसरत होता. वातावरण काहीसं धुंद उदास झालं होतं. मुक्त फिरण्यातला रोमान्स वाढला होता. विशेष म्हणजे अशी उन्मुक्त भटकंती एकट्यानं केली तरच अधिक रोमँटिक बनते. हा अनुभवाचा विषय आहे. फिरणं व निसर्ग यावर प्रेम मात्र हवं.
क्षितिजाकडे पृथ्वीच्या गोलाईचा आभास जास्त प्रत्ययकारी असतो. एक उद्बोधक किस्सा आठवला. शाळेच्या विविध प्रकल्पांच्या प्रदर्शनात (प्रोजेक्ट- एक्झिबिशन) भूगोल विभागात पहिलं पारितोषिक एका पृथ्विगोलाला (ग्लोब) मिळालं. लाकडाच्या गोलावर संपूर्ण पृथ्वी- तिच्यावरील नद्या-सागर, अरण्यं-पर्वत, निरनिराळे प्रदेश अशा तपशीलासह प्रभावी रंगकाम केलं होतं. त्या बक्षिसविजेत्या मुलाचे वडील वकील होते. ते नास्तिक होते. मुलानं त्यांना विचारलं, ‘बाबा हा लाकडी गोल बनवायला जर सुताराची गरज पडली तर प्रत्यक्षात पृथ्वीचा गोल बनवायला कुणाचीच गरज पडली नसेल? अन् त्यालाच देव म्हटलं तर?’… वकील पिताश्री हे ऐकून विचारात पडले. पण याहून विचारप्रवर्तक एक प्रसंग आठवला- वडील वाचन करताहेत. लहान मुलगा व्यत्यय आणतोय. त्याला गुंतवण्यासाठी जवळील वृत्तपत्रातलं जगाचं मोठं चित्र (नकाशा) फाडून ते तुकडे मुलाला नीट जुळवायला सांगतात. त्यांची खात्री असते की आता तासभर तरी पोर गुंतून राहील. पण अवघ्या काही मिनिटात तुकडे जोडून जगाचं एकसंध चित्र वडलांना दाखवलं जातं. ‘हे तुला इतक्या लवकर कसं जमलं?’ या वडलांच्या प्रश्‍नावर मुलाचं साधं शांत उत्तर होतं.. ‘मागच्या बाजूला एका माणसाचं चित्र होतं. ते मी तुकडे जोडून जुळवलं. दुसर्‍या बाजूचं जगाचं चित्र आपोआप जोडलं गेलं ना?’ .. खरंच, माणूस जोडला की जग जोडलं जातंच ना? हे ज्यावेळी माणसाच्या जीवनात उतरेल तेव्हाच ज्ञानोबांची अनुभूती आपली अनुभूती बनेल. ‘… हे विश्‍वचि माझे घर’. हो ना?