रोमिंग फ्री… हम दो, हमारे …?

0
114

भ्रमिष्ट

घराला कुलूप पाहून म्हणालो, ‘कुणीच नाही घरात? कुलुप दिसतंय’. यावर चष्म्याच्या भिंगामधून डोळे मिचकावत म्हणाले, ‘आहे की, एक मांजर. झोपली असेल सोफ्यावर.’
‘म्हणजे?’ या माझ्या प्रश्‍नार्थक उद्गारावर हसून म्हणाले, ‘मुलं आहेत परदेशात. ही होती बरोबर सावलीसारखी. आता मी एकटाच राहतो. भुतासारखा.’

बरेच दिवसांनी त्या शहरात पुन्हा जाणं झालं. अनेक गृहनिर्माण वसाहती (हाऊसिंग कॉलनीज) असलेला भाग. बरीच कुटुंबं मध्यमवर्गीय, आर्थिक सुस्थितीतली. काही वर्षांपूर्वी जीवनाच्या उमेदीत स्वतःची घरकुलं बांधून राहायला आलेली. बर्‍याच कुटुंबांचं चित्र ‘हम दो, हमारे दो’ असंच. सर्वांनी रस घेऊन संसार केलेले अन् काळाच्या ओघात ‘हमारे दो’ इकडे तिकडे चोहीकडे उडून गेलेले. उरलेले ‘हम दो’ एकमेकांच्या आधारानं समाधानात जगण्याचा प्रयत्न करणार. या ‘हम दो’मधील एकजण पुढे गेलाय अशी काही कुटुंबांची परिस्थिती. एकट्याचं कुटुंब तरी कसलं म्हणा!
पूर्वी चैतन्यानं सळसळणार्‍या या वसाहती आज काहीशा उदास झालेल्या, थकलेल्या दिसतात. अशाच एका वसाहतीत मुक्काम होता. सर्व इमारतींच्या बाजूंनी जाणारा, त्यांना विळखा घालणारा सिमेंटचा रस्ता हा साहजिकच सर्वांचा फिरण्याचा मार्ग बनला होता. काही वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांची वनराई झालेली. त्यामुळे हवा बर्‍यापैकी शुद्ध. वातावरण थंड नि परिसर स्वच्छ. सर्वत्र निरनिराळ्या झाडांची पानं पसरलेली. अजून पाचोळा न झालेली.
फिरायला जाताना एक गोष्ट जाणवली की प्रत्येकाच्या बंगल्याभोवतीच्या जागेत काही समान जातीची झाडं असली तरी बरीच अगदी असामान्य (युनिक) वाटावीत अशीही होती. आर्थिक सधनतेमुळे देशविदेशातील कितीतरी शोभेची झुडपं तशीच रंगीबेरंगी फुलझाडंही होती. एक प्रकारचा मंद सुगंध सगळीकडे दरवळत असायचा. फार प्रसन्न वाटायचं.
एक दिवस असंच फिरत असताना एक आजोबा भेटले. म्हणजे तसे ते रोज दिसायचे. पण त्या दिवशी नेहमीच्या हसण्यान हात दाखवण्याऐवजी आपणहून म्हणाले, ‘कुणाकडे आलायत? नवेच दिसता म्हणून विचारलं झालं.’ त्यांचं ते दात नसलेलं हसू चेहर्‍यावरील सुरकुत्यांच्या जाळ्यातून झिरपत माझ्यापर्यंत पोचलं तेव्हा खूप स्निग्धस्नेहाळ झालं होतं.
आरंभीचं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर गप्पांचा मार्ग (ट्रॅक) बदलला. दीर्घसुस्कारा टाकून आजोबा म्हणाले, ‘शंभरसुद्धा उरले नाहीत हो.’ मला संदर्भच लागला नाही. पण पुढे तेच बोलले, ‘एकूण घरं आहेत साठ. म्हणजे साठ कुटुंबं. काही वर्षांपूर्वी आम्ही ही घरं बांधून एकत्र राहू लागलो. बहुतेक सारे मध्यवयीन होतो. काहींचा स्वतंत्र व्यवसाय असला तरी बाकीचे आम्ही नोकरदारच होतो. त्यातील बरेच एका ठिकाणी काम करणारे. म्हणून एकत्र येऊन ही घरांची वसाहत उभारली. सुरुवातीला अडीचशे जण होतो आम्ही. नंतर शिक्षणासाठी, लग्न होऊन, नोकरीनिमित्तानं तरुण पिढी इकडे तिकडे पांगली. आधी राजाराणीचा संसार. नंतर मुलंबाळं झाल्यावर राजकुमार-राजकन्याही घरोघरी अवतरल्या. आता बहुतेक सारे निघून गेल्यावर मूळचे राजाराणी राहताहेत आपल्याच राज्यात हद्दपार झाल्यासारखे.’ आजोबा आवेशानं अन् आवेगानं बोलत होते. सांजवेळेचे सोनसळे सूर्यकिरण त्यांच्या मुद्रेवर पडून ते एखाद्या तत्त्वज्ञासारखे दिसत होते. बोलतही होते तसेच. पण शेवटी काळही बदलतोय ना वेगानं? पाखरं दहा दिशांनी उडून गेल्यावर घरटी मात्र सुनीसुनी होतात. ‘खूप निराधार वाटतं हो, अनाथ!’ त्यांचे डोळे पाणावले. विषय बदलावा म्हणून काहीतरी बोलणार इतक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. अनेकांची धावपळ सुरू झाली. आजोबा तसेच बसून राहिल्यावर म्हटलं, ‘चला, मी पोचवतो तुम्हाला घरी. जवळच असेल ना?’ लडखडत उठले खरे, पण त्यांच्यानं चालवेना. पायातली शक्तीच गेली होती. ‘आपण अगदी हळुहळू जाऊ या.’ जवळ असलेली छत्री उघडून त्यांच्या डोक्यावर धरली. अन् दोघंही निघालो. घराला कुलूप पाहून म्हणालो, ‘कुणीच नाही घरात? कुलुप दिसतंय’. यावर चष्म्याच्या भिंगामधून डोळे मिचकावत म्हणाले, ‘आहे की, एक मांजर. झोपली असेल सोफ्यावर.’
‘म्हणजे?’ या माझ्या प्रश्‍नार्थक उद्गारावर हसून म्हणाले, ‘मुलं आहेत परदेशात. ही होती बरोबर सावलीसारखी. आता मी एकटाच राहतो. भुतासारखा.’
आजोबा पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांना घराचं कुलूप उघडून दिलं नि निघालो. फिरायचं तसंच राहिलं होतं. पावसाची सर कोसळून गेल्यामुळे फिरण्याचा रस्ता अधिक स्वच्छ झाला. झाडं अधिक टवटवीत झाली. लक्ष वेधून घेतलं ते विविध सरपटणार्‍या कीटकांनी – कुणाला शंभर तर कुणाला सहस्त्र पाय. चालताना इतकी सहजसुंदर हालचाल की वाटतं यांना उचलून हातात घ्यावं अन् जवळून न्हाहाळावं. अशा कीटकांना साक्षात दत्तगुरुंनी गुरु केलंय. प्रत्येकाकडून शिकण्यासारखा गुण आहेच. त्या गुणासाठी त्या कीटकाला किंवा सामान्य जीवाला गुरू करायचं. उदा. ऊर्णनाभी नावाचा कोळी आपल्या नाभीतून निघालेल्या स्रावाचा तंतू करून त्याचं जाळं विणून त्यात अडकणार्‍या लहान जीवांवर आपलं जीवन चालवतो. पण एकदाही तो आपण तयार केलेल्या जाळ्यात अडकत नाही. गुंतत नाही. इतर कीटक त्या चिकट जाळ्यात अडकतात पण कोळी नाही. या गुंतून न पडण्याच्या गुणासाठी दत्तात्रेयांनी त्याला गुरू केलं. म्हणजे गुरुत्व सर्व चराचरात भरुनच असतं. आपण नम्र होऊन – लघू होऊन – ते स्विकारलं मात्र पाहिजे. असे विचार त्या कीटकांच्या हालचाली पाहून मनात आले. निसर्गातील जैव-विविधता (बायो डायव्हर्सिटी) आश्चर्य वाटायला लावणारा चमत्कार आहे. त्या विचारात रस्त्याच्या एका टोकाला येऊन पोचलो. वर्तुळाकार रस्त्याला टोक असं नव्हतंच. पण अशा भागात आलो होतो जिथून बाहेरच्या भव्य इमारती दिसत होत्या. रस्त्यापलीकडील इमारतींच्या जाळ्याकडे लक्ष गेलं.
समोर एक चार-पाच मजली इमारत होती. मावळतीच्या सूर्यप्रकाशात काव्यात्म वाटावं असं दृश्य समोर होतं. – इमारतीची गच्ची – त्यावर उभारलेला सिमेंटचा उभा मनोरा. त्यावर पाण्याची प्लास्टिकची भलीमोठी टाकी. तिच्यावरून जाणार्‍या विजेच्या तारा. त्यावर बसलेला एक काळा लांब शेपटीचा पक्षी. शेजारी सिमेंटमध्येच वाढलेल्या वनस्पती, हिरव्यागार. गंमत म्हणजे कावळ्याच्या विष्ठेतून बीज पडून त्यापासून वड-पिंपळ यांसारखे वृक्ष वाढतात. कावळ्याच्या विष्ठेची किळस येणारी व्यक्ती वडापिंपळाला मात्र वळसे (प्रदक्षिणा) घालते. ‘काक विष्ठेचे झाले पिंपळ| तयांसी निंद्य कोण म्हणे॥ असं एका स्तोत्रात म्हटलंच आहे. एवढ्यात त्या तारेवर बसलेल्या पक्षाची साद आजूबाजूच्या गोंगाटातही ऐकू आली नि त्याची लांब शेपटी हालताना दिसली. तो पक्षी चिऊपेक्षा मोठा पण काऊपेक्षा लहान होता. पण त्या सिमेंट-प्लास्टिक-धातूच्या पार्श्‍वभूमीवर झाडाची हालणारी पानं नि पक्ष्याची हालणारी शेपटी खूप जिवंत वाटली. चैतन्यमयी वाटली. खरंच!