रोमिंग फ्री…… मृत्योर्मा अमृतं गमय!

0
111

 

– भ्रमिष्ट

मृत्यू हे खरंच जन्माचं जीवनाचं ध्रुवसत्य आहे. मृत्यू बनतो आनंद सोहळा… आनंदोत्सव… आनंदयात्रा! या संदर्भात म्हटला जाणारा ‘मृत्युंजय मंत्र’ हा मरणार्‍या व्यक्तीसाठी नसून तो म्हणणार्‍या जिवंत (पण मरत असलेल्या) व्यक्तीसाठी असतो… ‘जीवन ‘सुगंधिं पुष्टिवर्धनम्’ असं हवं इतरांचं पोषण करणारं… कीर्तीचा सुगंध असलेलं हवं…

 

रेल्वे स्टेशन.. त्यावरचे लांबच लांब फलाट.. अनेक पायर्‍यांचे जिने.. शेजारील क्रमानं चढत वा उतरत जाणारे रँप या नेहमीच्या फिरण्याच्या जागा. सर्व दिशांनी सतत धावपळ करणारे प्रवासी.. अनेकांच्या मागे पाळीव कुत्र्यांप्रमाणे पट्‌ट्याला धरून ओढल्या जाणार्‍या त्यांच्या सामानाच्या लहान-मोठ्या बॅगा.. चित्रविचित्र आवाजात पण विशिष्ट शैलीत आपल्या मालाची जाहिरात करणारे विक्रेते.. दोन्ही दिशांनी येणार्‍या-थांबणार्‍या-धावणार्‍या गाड्या (लोहराण्या) अन् सर्वांवर आकाशवाणी व्हावी तशा वारंवार विविध भाषेत होणार्‍या घोषणा (की उद्घोषणा?) .. हा माहौल आता परिचयाचा झाला होता. याच्याकडे डोळे उघडे ठेवून पण कान बंद ठेवून; कान उघडे, डोळे बंद करून; दोन्ही डोळे-कान उघडे ठेवून किंवा बंद करून अशा सर्व पद्धतीनं निरीक्षण करण्यातही फार नाविन्य राहिलं नव्हतं. तसा हा प्रयोग कुठंही करून पाहण्यासारखा आहे.
… म्हणून त्या दिवशी जरा दुसर्‍या मार्गानं चालत रेल्वेस्टेशनकडे जायचं ठरवलं. शहरातले ते गर्दीचे, रुंद रस्ते ओलांडणं हे केवढं दिव्य झालंय याचा अनुभव ज्याचा त्यानं घेतला पाहिजे. आपल्या गोव्यात अशा शहरातही वाहतुकीचे सिग्नल्स अभावानंच का आढळतात हे एक उघडं गुपित आहे. जवळजवळ एकही सिग्नल्स नसलेले अनेक मार्ग आहेत. जिथे आहेत ते कधी चालू असतात अन् कधी नसतात हे त्या दिव्यांनाच किंवा देवाला ठाऊक! गंमत म्हणजे अशा परिस्थितीत कायद्याचे रक्षक म्हणून जे वाहतूक नियंत्रक असतात तेव्हा वाहनांची व वाहतुकीची कोंडी हमखास होते. एरवी गाड्यांचे चालक नि हो.. चालिकासुद्धा एकमेकांच्या मनातले विचार समजावून घेऊन टेलिपथी केल्यासारखे परस्पर सोयीनं आपापली वाहनं चालवतात. रहदारी अशावेळी त्या मानानं सुरळीत चालू राहते. हेही एक कोडंच नाही का? असो.
रेल्वेच्या ओव्हरब्रिजच्या अलीकडे पाय थबकले. डाव्या बाजूला खाली रांगोळीचे ठिपके किंवा मिठागरातील मिठाचे जागोजागी जमवलेले ढीग असावेत अशी सुंदर एका ओळीत बांधलेली थडगी दिसली. हो ती थडगीच होती कारण शेजारी छोटं चर्च होतं. ख्रिस्ती बांधवांची ती दफनभूमी होती. पण त्या थडग्यांशेजारी उभा क्रॉस दिसला नाही की त्यावर वाहिलेली फुलं दिसली नाहीत. म्हणजे आपल्या पोटात कोणत्यातरी व्यक्तीचे अवशेष घेऊन ती छोटी छोटी समाधिस्थळं उभी होती की कुणीतरी आपल्या कुशीत चिरविश्रांतीसाठी येण्याच्या प्रतीक्षेत ती होती. थांबून एवढं निरखून काय पाहतोय हे पाहण्यासाठी एक असाच फिरायला निघालेला वृद्ध अंकल थांबला व मला म्हणाला, ‘ब्युटिफूल सिमिटरी .. डिझाइन्ड बाय चार्ल्स कोरिआ!’ मी काही विचारण्यापूर्वीच तो अंकल आपल्या तालात तोल सावरत पुढे निघूनही गेला. हातात काठी (नव्हे केन), हाफ पँट, चालण्याचे बूट-मोजे, डोक्याला टोपी असा सारा आदर्श ‘फिरस्त्यां’चा जामानिमा अंकलकडे होता. मित्रांचा लवाजमा नव्हता. का कुणास ठाऊक पण त्या पाठमोर्‍या.. अंधुक होत जाणार्‍या आकृतीला, नव्हे अंकलला, मनोमन नमस्कार केला. मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात त्याची ती लयबद्ध चाल, देहयष्टीची सरलता नि बोलण्यातली तटस्थ सहजता त्याला माझा ‘हिरो’ बनवून गेली. माझ्या मनातला विचार जणू वाचल्यासारखा माझ्याकडे एक तिरपा कटाक्ष आपल्या सोनेरी फ्रेम असलेल्या देखण्या चष्म्यातून टाकत तो अंकल म्हणून गेला- ‘ब्युटिफुल सेमिटरी! डिझाइन्ड बाय चार्ल्स कोरिआ.’ एखाद्या प्रसन्नशितल सुगंधी झुळकीसारखा आला नि स्पर्श करून झोतासारखा निघूनही गेला. नकळत स्पष्ट उद्गार बाहेर पडले, ‘गॉड ब्लेस हिम! मे ही लिव्ह लॉंग!’ … या शब्दांनी माझा मीच दचकलो… सिमिटरीसमोर एका अनामिकानं केलेली एका अनाम आत्म्यासाठी प्रार्थना! त्याचवेळी शेजारच्या चॅपलमधली मधुरगंभीर घंटा वाजली. सायंप्रार्थनेसाठी असावी… क्षणभर डोळे मिटले. का कुणास ठाऊक ते दवभिजले झाले होते.
मनाविरुद्ध पावलं ओढत पुढे निघालो. विचार अर्थातच होते मृत्यूचे.. जीवनाचे.. मृत्युपंथाचे! याविषयीचं मानवाचं पराधीनत्व गदिमांच्या शब्दात एक अगतिक सत्य सांगून गेलेलं…
‘वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा…
मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा…’
पावलं कोणत्या दिशेनं किंवा वाटेनं पडत होती याला आता महत्त्वच उरलं नव्हतं.
इंग्रजीतल्या दोन कविता जुन्या मैत्रिणींसारख्या अचानक आठवल्या… मृत्यूची संहारक शक्ती नि सर्वांकडे पाहण्याची समदृष्टी सांगणारी- ‘डेथ द लेव्हलर’… कुसुमाग्रजांची ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’ किंवा ‘एक दिन ऐसा आयेगा.. मैं रौंदूँगी तोहे’ अशी तिला आज तुडवणार्‍या ‘वेड्या’ कुंभाराला (म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानी, अहंकारी माणसाला) असं निर्वाणीचं सांगणारा संतांची ‘माटी (माती)’ … मृत्यू हे खरंच जन्माचं जीवनाचं ध्रुवसत्य आहे.
मृत्यू बनतो आनंद सोहळा… आनंदोत्सव… आनंदयात्रा! या संदर्भात म्हटला जाणारा ‘मृत्युंजय मंत्र’ हा मरणार्‍या व्यक्तीसाठी नसून तो म्हणणार्‍या जिवंत (पण मरत असलेल्या) व्यक्तीसाठी असतो… ‘जीवन ‘सुगंधिं पुष्टिवर्धनम्’ असं हवं- इतरांचं पोषण करणारं.. कीर्तीचा सुगंध असलेलं हवं- हा संदेश देतानाच मन सर्व बंधनातून सुटत मुक्तीचा ध्यास घेणारं हवं- हेही हा मंत्र सांगतो.
… उदासलेल्या मनानं पुन्हा उभारी घेतली होती. मागे गाड्यांची शिट्टी (की भोंगा) वाजत होती पण समोर अस्ताला जाणारं सोनेरी तांबूस सूर्यबिंब! कसे कुणास ठाऊक.. हात जोडले.. मस्तक नमवलं.. मौन प्रार्थना केली… ‘तमसो मा ज्योतिर्गमय.. मृत्योर्मा अमृतं गमय|’…