रोमिंग फ्री… प्रायोजन नि प्रयोजन

0
102

भ्रमिष्ट

 

हल्ली ही प्रायोजनाची कल्पना खूप चांगली रुजलीय आपल्याकडे. म्हणजे स्पॉन्सरशिपची! पूर्वी काही प्रतिष्ठित लोकांची मंडळं (क्लब्ज) मोठा गाजावाजा करून एखादी वस्ती किंवा गाव दत्तक घ्यायचे. एकदा का फोटोसेशन झाले की तिकडे ढुंकूनही पाहायची नाहीत ही उच्चभ्रू प्रसिद्धीलोलुप मंडळी. जणू दत्तक घेऊन (ऍडॅप्शन) अनाथ (ऑर्फन) करून टाकायची त्या लोकांना. पण हे प्रायोजक मात्र नुसती जाहिरात करत नाहीत तर त्या-त्या भागाची चांगली काळजी घेतात

आज फिरायला जाऊ नको का?… अशा विचारात असताना रामभाऊंची हाक ऐकू आली. ते आले होते त्या शहरात नव्यानंच बांधलेल्या स्टेडियमवर फिरायला जाण्यासाठी. पावसामुळे होणारी चिकचिक म्हणजे सर्वत्र पसरलेला चिखल हे त्या शहराचं वैशिष्ट्य होतं. म्हणून गरजेशिवाय बाहेर पडणं टाळणंच शहाणपणाचं होतं. पण स्टेडियमवरचा फिरण्याचा मार्ग वरून छत असलेला होता. एवढे बोलवायला आले आहेत तर जाऊया म्हणून निघालो.
रामभाऊ एक उमदं व्यक्तिमत्त्व. शहराच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असामी (व्यक्ती). त्यांचा सहवास सत्संगाचा अनुभव देणारा असायचा. त्यांच्या चालण्या-बोलण्यातून, वागण्या-जगण्यातून सर्व वयोगटांच्या मंडळींवर विविध प्रकारचे विधायक संस्कार होत असत. आम्ही मंडळी गेले काही दिवस त्यांच्यासोबत काव्यशास्त्रविनोदाच्या मैफिली सजवत होतो.
आज त्यांच्याशी एकट्यानं गप्पा मारता येतील या स्वार्थी विचारानं निघालो. प्रथम गाडीनं स्टेडियमपर्यंत, नंतर चालण्याचा कार्यक्रम असं ठरलं होतं. त्यामुळे मुख्य म्हणजे सर्वदूर पसरलेली चिकचिक चुकणार होती.
सकाळची वेळ असल्यानं असंख्य ताजीतवानी माणसं सर्व प्रकारच्या वाहनातून प्रवास करताना दिसत होती. सर्वांत विनोदी दिसत होते सायकलस्वार. त्या शहरात सायकल- चालवणार्‍यांची संख्या लक्षात येण्यासारखी होती. साधारणतः फुटभर (हँडलच्या रुंदीएवढी) जागा मिळाली की यांनी मुसंडी मारलीच म्हणून समजावी. स्वतःला व इतरांनाही त्रास देण्याची ही कसली जीवनशैली?
विचारचक्र गरगरू लागलं. एवढ्यात आम्ही पोचलोही स्टेडियमवर. गोलाकार भव्य रचना पाहून उगीचच आठवण झाली- रोमन सम्राटांची. आनखशिख – संपूर्ण शरीरभर चिलखत – कवचं घालून एकमेकाशी तलवारीनं लढून दुसर्‍याला मारून जिंकणारे योद्धे – ग्लॅडिएटर्स! पण त्यांचं द्वंद्वयुद्ध हे शत्रुत्वातून किवा एखादी पैज वा पुरस्कार जिंकण्यासाठी नसायचं. तर विकृत वृत्तीच्या सम्राटाशी माणूस लढतो कसा – त्याहिपेक्षा जखमी होऊन मरतो कसा – मरताना तडफडतो कसा हे पाहण्याच्या इच्छेसाठी हे द्वंद्व असायचं. असो.
स्टेडियम तसं विविधोपयोगी (मल्टिपर्पज) होतं. अनेक खेळांचे महत्त्वाचे सामने तिथं खेळले जाण्याची व्यवस्था होती. विशेषतः दिवसा-रात्री होणार्‍या सामन्यांसाठी रात्री प्रकाश व्यवस्था करणारे ते उंच-उंच फलकावर असलेले प्रतिसूर्यच असे शक्तिशाली दिवे स्टेडियमच्या बाहेरच्या बाजूला गोलाकार तळघरासारख्या (बेसमेंट) जागेत अक्षरशः सर्व प्रकारची दुकानं होती. ती एक प्रकारची जत्राच होती. सर्व प्रकारची खूप ऊर्जा ओसंडत होती सार्‍या दिशांनी.
अखेर फिरण्याच्या मार्गावर पोचलो. असा जॉगिंग ट्रॅक दुसरीकडे पाह्यला नव्हता. अनवाणी चालावंसं वाटावं इतका स्वच्छ व लुसलुशीत. पाहिलं तर अनेक लोक तसे चालतही होते. कृत्रिम हिरवळ असावी तसा काहिसा प्रकार होता. खूपच श्रीमंत दिसणार्‍या त्या मार्गाबद्दल काही विचारणार तोच रामराव उद्गारले, ‘या मार्गावरून चालताना संपूर्ण स्टेडियमच्या भिंतीवर लिहिलेल्या या प्रायोजकांच्या पाट्या वाचा.’ खरंच सर्व प्रकारच्या व्यापार्‍यांच्या – उद्योगपतींच्या उत्पादनांच्या जाहिराती होत्या तिथं. अतिशय आकर्षक नयनरम्य अशा त्या रंगीबेरंगी विज्ञापनांकडे पाहूनच बरं वाटत होतं. त्या चालण्याच्या मार्गाच्या प्रत्येक ५० मीटरचं प्रायोजकत्व एकेका उत्पादनाच्या निर्मात्यानं घेतलं होतं. नुसतं प्रायोजकत्व नव्हतं तर कल्पक पालकत्वही होतं. त्या पन्नास मीटर अंतराच्या दोन्ही बाजूंस आकर्षक रंगांची – आकारांची शोभेची झाडं (झुडपंसुद्धा) होती. काही ठिकाणी कारंजी होती. हलकंसं वाद्यसंगीत होतं. ती योजना आवडली. चालताना पायाशी बासरी-जलतरंग-संतुर-सतार-तबला-ढोलकी-झांजा अशी सर्व प्रकारची वाद्यं वाजत होती. फार छान वाटत होता तो परिसर नि चालण्याचा मार्ग. त्यामुळे व्यायाम होत होता पण त्याचे कष्ट जाणवत नव्हते. भूक लागल्यावर नि रुचकर पदार्थ ताटात असल्यावर कसं थोडं जास्तच खाल्लं जातं तसं तिथं जरा जास्तच चाललं जात होतं. तेही मस्तमजेत!
चालणारी काही मंडळी हलक्या आवाजात कुजबुजत होती. घामाघूम झालेली, आपल्याच धुंदीत लयबद्ध पावलं टाकत जगाशी त्यावेळी कोणताही संबंध नसल्यासारखी काही फिरस्ती मंडळी चालत होती.
शेवटी रामराव उत्साहानं बोलायला लागले. त्यांचा स्वर जरा वरचाच होता पण आजूबाजूला चालणार्‍या चारचौघांनी रोखून बघितल्यावर त्यांनी आवाजाचा व्हॉल्यूम कमी करून बोलणं चालू ठेवलं. ‘हल्ली ही प्रायोजनाची कल्पना खूप चांगली रुजलीय आपल्याकडे. म्हणजे स्पॉन्सरशिपची! पूर्वी काही प्रतिष्ठित लोकांची मंडळं (क्लब्ज) मोठा गाजावाजा करून एखादी वस्ती किंवा गाव दत्तक घ्यायचे. एकदा का फोटोसेशन झाले की तिकडे ढुंकूनही पाहायची नाहीत ही उच्चभ्रू प्रसिद्धीलोलुप मंडळी. जणू दत्तक घेऊन (ऍडॅप्शन) अनाथ (ऑर्फन) करून टाकायची त्या लोकांना. पण हे प्रायोजक मात्र नुसती जाहिरात करत नाहीत तर त्या-त्या भागाची चांगली काळजी घेतात. इतरांपेक्षा आपली जाहिरात अधिक सुंदर – सुखद कशी होईल याची खबरदारी घेताना सुंदर कल्पना, उपक्रमही राबवतात. थोडंसं थांबून रामरावांनी माझी प्रतिक्रिया अजमावली. मी लक्ष देऊन त्यांना ऐकतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी पुढे सुरू केलं – ‘आपल्यावेळी आयोजन-नियोजन-संयोजन असायचं. आता प्रायोजन असतं. त्यामुळे अनेक स्पर्धा होऊ शकतात. अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. अनेक कार्यक्रम – मैफिली (कॉन्सर्टस्) घडून येतात. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कलाकारही पाहायला – ऐकायला मिळतात. फक्त एकच खंत आहे या आयोजन (ऑर्गनायझेशन, नियोजन (प्लॅनिंग), संयोजन (कोऑर्डिनेशन) आणि प्रयोजन (स्पॉन्सरशिप)च्या आजच्या काळात एक गोष्ट हरवलीय- ‘प्रयोजन’. जीवनाचं प्रयोजन. (पर्पज ऑफ लाईफ!)’
रामरावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. तो बरंच काही सांगून गेला. खरंच!