रोमिंग फ्री… अनुभव सच्चिदानंदाचा…

0
104

भ्रमिष्ट

बाहेरच्या व्यक्ती, निसर्ग, प्रसंग पाहताना मनात तेजस्वी चित्र, प्रकाशित प्रतिमा का नाही बघत? त्या सकारात्मक विचार-भावनांचं प्रक्षेपण जर बाहेरच्या कशावरही केलं तरी सगळं सत्य-शिव-सुंदरच दिसणार आहे- एक ज्ञानप्रकाशाचा – कर्मऊर्जेचा – भावानंदाचा अनुभव सतत येत राहील. सतत दर्शन होत राहील सत्-चित्-आनंदाचं… त्या सच्चिदानंद परमेश्‍वराचं.’ करून पाहायला काय हरकत आहे?

त्या गावातल्या तिठ्यानं म्हणजे एकत्र आलेल्या तीन रस्त्यांनी का कुणास ठाऊक पण मला गाडीतून उतरण्यापूर्वी आकर्षित केलं. रस्त्यांचीही काही गंमतच असते.
प्रत्येक रस्त्याला, मग तो महामार्ग असो किंवा गल्ली किंवा पायवाट, दोन दिशा असतातच. आपण दोन तोंडं म्हणू या. समोर जाताना पाठीमागची विरुद्ध दिशेनं जाणारी बाजू असतेच. दोन रस्ते एकमेकाला छेदून आडवे गेले की चौरस्ता तयार होतो (क्रॉसरोड्‌स). इथं दोनाच्या चार दिशा होतात. आता वाटसरू अधिक गोंधळून जातो. कारण निश्चित जायचं कोणत्या दिशेनं हा निर्णय आता अधिक कठीण होतो.
या संदर्भात एक मार्मिक गोष्ट सांगितली जाते. असाच एक चौराहा. जिथं निरनिराळ्या दिशांनी येणारे नि निरनिराळ्या दिशांना जाणारे चार रस्ते एकत्र मिळाले होते. या रस्त्यांच्या संगमबिंदूवर एक वटवृक्ष होता त्याला पार बांधला होता. त्याच्यावर बसून एक साधू ध्यानसाधना करायचा. अनेक लोक यायचे-थांबायचे-जायचे. एकदा एक पथिक आला अन् तिथं पोचल्यावर गोंधळून गेला. कारण तिथं फलक काही लावले नव्हते. गावांची नावं, दिशा नि अंतर दाखवणारे.
त्या साधूला निश्चित माहीत असेल म्हणून त्यानं विश्‍वासानं विचारलं, ‘नमस्कार, साधुमहाराज, मला जायचंय रामपूरला. सूर्यास्तापूर्वी पोचलं पाहिजे दिवसाउजेडी. कृपया इथून रामपूरला कसं जायचं, कोणत्या दिशेनं, किती अंतरावर आहे रामपूर? पोचायला किती वेळ लागेल?’
पण साधुमहाराज ढिम्म. डोळेही उघडले नाहीत. तोंड उघडून बोलणं तर सोडाच. तीनचार वेळा विचारूनही साधू काही बोलत नाही हे पाहून तो उठला. मोठ्यानं देवाचं नाव घेतलं ‘जय श्रीराम!’ अन् निघाला एका रस्त्यानं. काही वेलानं पाठीमागून हाक आली, साधुमहाराजांची. ‘ए बेटा, मागे फिर तुला उजव्या हातानं जावं लागेल. रामपूर इथून जवळच आहे. तुला पंधरा मिनिटं पुरेत. सूर्यास्ताला अजून अर्धा तास तरी आहे.’
तो मुसाफिर मागे वळला. साधूच्या जवळ येऊन काहीशा रागानंच म्हणाला, ‘हे आधी का नाही सांगितलंत? पंधरा मिनिटं तुम्हाला विचारण्यात वाया गेली ना? एव्हाना मी पोचलोही असतो.’ साधू हसून शांतपणे म्हणाला, ‘बेटा त्याचं असं आहे, रोज शंभरेक माणसं येतात ‘कसं जायचं?’ विचारायला. पण अनेकांना जायचंच नसतं कुठंही. नुसत्या रिकाम्या चौकशा करायच्या असतात. या सर्वांशी बोलत बसलो तर माझी साधनाच होणार नाही. तू उठून चालू लागेपर्यंत थांबलो. खात्री पटली की तुला खरंच जायचंय रामपूरला. पण किती वेळात पोचशील हे सांगण्यासाठी मला तुझा चालण्याचा वेग माहीत होणं आवश्यक होतं. म्हणून तुला थोडं चालू दिलं. खात्री पटल्यावर आता तुला सांगितलं’, असं म्हणून साधूबाबांनी पुन्हा डोळे मिटले नि त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली.
त्या शांतप्रशांत साधूला पाहून त्या वाटसरूनं नमस्कार केला नि योग्य मार्गानं चालू लागला.
आपलं बर्‍याच जणांचं बर्‍याच वेळा असंच होतं. एक तर उगीच चौकशा करत राहतो. जायचं नसतंच म्हणून निर्णय होत नाही. जोपर्यंत निश्चित निर्णय होत नाही तोपर्यंत निश्चय-निर्धार-निग्रह यांना काही अर्थ नसतो. यामुळे अनेक ७ेत्रात चांगले गुरू लाभूनही प्रगती अत्युच्च शिखरापर्यंत होत नाही.
द्रोणाचार्य असतात, नसतात ते एकलव्य-अर्जुन-अभिमन्यू! एखादा द्रोणाचार्य क्रिकेटगुरु रमाकांत आचरेकर एखादाच सचिन किंवा अजिंक्य बनवू शकतो. बाकीचे सामान्यच राहतात.
रस्ते हे गुरुंचं जीवनातलं महत्त्व अधोरेखित करतात. ते सांगतात, ‘चलते रहो| एकला.. अकेला चलो| रास्ते में और मिलेंगे फिर काफिला बन जायेगा| और काफिले मिलेंगे तो मेला बन जायेगा| एक अकेलाही बनाता है मेला| और मेला कभी अकेला नहीं होता’ जीवनाला प्रेरक, मार्गदर्शक संदेश आहे हा.
रस्ते सांगतात ‘चला… चालत रहा. चालतो त्याचं भाग्य त्याच्यासंगे चालतं.’
हे सारे विचार मनातल्या मनात करत चालत चालत त्या तिठ्याकडे पोचलोही. त्यांच्या मिलनस्थानी एक मोठं वर्तुळ होतं. वाहतुकीच्या सोयीसाठी. त्या रहदारीच्या बेटाकडून तीन दिशांना तीन खूप दूर जाणारे मार्ग निघाले होते. एक निघाला होता बेळगावकडे- एक कारवारकडे तर एक मुंबईकडे. या गावांची अंतरं व नावं लिहिलेले फलक सर्व बाजूंनी होते. सारं काही व्यवस्थितच होतं.
सार्‍या रस्त्यांच्या कडेनं व मध्यभागी पांढर्‍या रंगाचे पट्टे होते. मध्ये द्विभाजक (डिव्हायडर) होता. अंधारात दिसावेत म्हणून काही दगडांवर रात्री चमकणारे (फ्ल्यूरोसंट) रंग दिले होते. सारं काही राजशाही होतं. पण वर्तुळाच्या मध्यभागी जे होतं ते अपूर्व, अद्भुत असंच होतं. चोची एकत्र आणून चार दिशांना पिसारे फुलवत थुईथुई नाचणारे मोर जसे दिसावेत तसा झुडपांचा गुच्छ होता – अप्रतिम सुंदर अशी कातरलेली पानं, त्याचा रंग त्या सकाळच्या गाभुळलेल्या (अमूरपिक्या) प्रकाशात चमकत होता. वार्‍यानं हलल्यावर जागच्या जागी मयूरनृत्य पाहिल्याचा अनुभव येत होता.
नाहीतरी आपण बाहेर जे जे पाहतो त्यात आपल्या मनाचं – कल्पना, विचारांचं प्रतिबिंब पडलेलं असतं.
स्वामी विवेकानंद आवडीनं सांगत त्या गोष्टीतली सायंकाळच्या संधी प्रकाशात उभी असलेली मनुष्याकृती. तरुणीला (प्रेयसीला) वाट पाहणारा प्रियकर वाटतो; चोराला थांबलेला पोलीस वाटतो; साधूला दुरून काहीच वाटत नाही, जवळ जाऊन पाहिल्यावर माणसाच्या आकृतीसारखा दिसणारा तो झाडाचा बुंधा दिसतो. शांतपणे त्याला टेकून बसून साधू आपली सायंसाधना सुरू करतो. हे सांगून स्वामीजी म्हणायचे, ‘‘असं जर असतं तर मग बाहेरच्या व्यक्ती, निसर्ग, प्रसंग पाहताना मनात तेजस्वी चित्र, प्रकाशित प्रतिमा का नाही बघत? त्या सकारात्मक विचार-भावनांचं प्रक्षेपण जर बाहेरच्या कशावरही केलं तरी सगळं सत्य-शिव-सुंदरच दिसणार आहे- एक ज्ञानप्रकाशाचा – कर्मऊर्जेचा – भावानंदाचा अनुभव सतत येत राहील. सतत दर्शन होत राहील सत्-चित्-आनंदाचं… त्या सच्चिदानंद परमेश्‍वराचं.’ करून पाहायला काय हरकत आहे?