रोजगाराचा दबाव

0
114

नोकरभरतीसाठी गोव्याबाहेर जाहिराती देणार्‍या २२ कंपन्यांना सरकारने नोटीस बजावली आहे आणि यापुढे खासगी कंपन्यांत उपलब्ध नोकर्‍यांची माहिती रोजगार विनिमय केंद्राला कळवणे बंधनकारक करण्याचाही सरकारचा विचार आहे. राज्यात सन २०२० पर्यंत पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक येईल आणि त्याद्वारे पाच वर्षांत पन्नास हजार रोजगार निर्माण होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिलेली होती. सरकारला रोजगार पुरवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठीच विद्यमान मजूरमंत्री रोहन खंवटे यांनी ही घोषणा केलेली दिसते. गोव्यामध्ये गोमंतकीयांना रोजगार मिळायला हवा याविषयी काही वाद असण्याचे कारण नाही, परंतु ज्या कंपन्यांनी गोव्याबाहेर रोजगार भरतीसाठी प्रयत्न केले त्यांनी तसे का केले असावे याचाही विचार व्हायला हवा. सिंधुदुर्गासारख्या मागास जिल्ह्यामध्ये स्वस्तात उपलब्ध होणारे मनुष्यबळ हा तर एक भाग झालाच, परंतु ज्या प्रकारचे रोजगार या कंपन्यांकडे उपलब्ध आहेत, ते स्वीकारण्याची गोमंतकीय तरुण – तरुणींची तयारी असते का हा भागही विचार करण्यासारखा आहेच. मुळात ‘गोमंतकीयांना रोजगार’ ही अत्यंत स्थुल कल्पना आहे. कोणीही गोव्यात यावे, येथे काही दिवस राहून कामचलाऊ कोकणी बोलायला शिकावे आणि स्थानिक पत्त्याच्या आधारे नोकरी पटकावावी असे प्रकार सर्रास सुरू आहेत. नोकर्‍याच काय, येथील पारंपरिक रोजगारदेखील गोमंतकीयांच्या हातून असेच हातोहात निसटले आहेत. याला मुख्यत्वे कारणीभूत आहेत ते राजकारणीच. परप्रांतीयांना येथे घुसखोरी करण्यास स्थानिक राजकारण्यांनीच सर्वतोपरी मदत मिळवून दिली आहे. गोव्यामध्ये निर्माण होणारे खासगी क्षेत्रातील रोजगार आणि येथे उपलब्ध मनुष्यबळ यांचा सांधा जुळवणे ही खरे तर नेत्यांची जबाबदारी होती, परंतु गोव्यात उच्च शिक्षण घेणार्‍या तरुण तरुणींना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी मेळ साधणारे रोजगारच येथे उपलब्ध नाहीत आणि जे रोजगार येथे निर्माण होतात, त्यांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळही येथे मिळत नाही अशा प्रकारचा हा विरोधाभास आहे. गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाई रोजगाराच्या शोधार्थ गोव्याबाहेर भटकते आहे आणि येथे निर्माण होणार्‍या रोजगाराच्या भरतीसाठी कंपन्या गोव्याबाहेर धाव घेत आहेत अशी ही विचित्र परिस्थिती आहे. खासगी क्षेत्रातील उपलब्ध रोजगाराची माहिती रोजगार विनिमय केंद्राला म्हणजे पर्यायाने सरकारला कळवण्याची सक्ती करण्याचा जो विचार सरकारने चालवला आहे, तो सवंग लोकप्रियता मिळवणारा जरी असला तरी तो व्यवहार्य नाही. यातून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? मंत्र्या-संत्र्यांना आपल्या वशिल्याच्या तट्टांना सरकारी नोकर्‍यांप्रमाणे आता खासगी नोकर्‍यांमध्येही घुसडायचे आहे काय? सरकारी नोकरभरतीचा अशा वशिल्याच्या तट्टांनी बट्‌ट्याबोळ करून टाकला आहे. वर्षानुवर्षे चाललेली खोगीरभरती आता सरकारसाठी पांढरा हत्ती ठरलेली आहे. खासगी क्षेत्रामध्ये गुणवत्तेला महत्त्व असते आणि ती निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना सरकारने दिलेच पाहिजे. कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने कन्नडिगांना खासगी क्षेत्रात शंभर टक्के रोजगाराची सक्ती करणारा कायदा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, त्यांनाही आयटी आणि बीटी क्षेत्राचा अपवाद करावा लागलाच, कारण त्यासाठीचे आवश्यक मनुष्यबळच त्यांना उपलब्ध झाले नसते. स्थानिकांची रोजगारभरती करण्याच्या अटीवर सरकारकडून उद्योगांनी जर सवलती मिळविलेल्या असतील, तर ती अट पाळणे त्यांना बंधनकारक असेल, परंतु इतर बाबतींत खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधींमध्ये सरकारने हस्तक्षेप करणे योग्य नाही. खासगी क्षेत्रामध्ये कामगारांची पिळवणूक होऊ नये, कायदे कानूनांचे पालन होईल हे पाहणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यापुढे जाऊन त्यांच्या रोजगारभरतीमध्ये लुडबूड करण्यापेक्षा सरकारने सध्या खाणबंदीमुळे खाण कंपन्यांनी सरसकट कामगारांची कपात चालवलेली आहे, त्याकडे लक्ष पुरवणे अधिक आवश्यक आहे. सरकारला स्थानिक युवक युवतींच्या भवितव्याची खरोखर चिंता असेल तर त्यासाठी येथे येणार्‍या उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत. मोपा विमानतळ येत्या अडीच वर्षांत येऊ घातला आहे. त्यासाठी कौशल्य विकासाची घोषणा सरकारने यापूर्वी केली होती. अजूनही तेच वायदे चालले आहेत. स्टार्ट अप धोरण, गुंतवणूक धोरण, स्वयंरोजगार धोरण हे सगळे कागदावर खूप छान दिसते, परंतु जोवर ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि दरवर्षी पदव्या आणि प्रमाणपत्रे घेऊन बाहेर पडणार्‍या शिक्षित तरुणाईला रोजगाराच्या संधी जोवर ते निर्माण करीत नाही, तोवर अशा कागदी घोड्यांना काही अर्थ नसतो. त्यामुळे सरकारची रोजगारनिर्मितीसंदर्भातील कृतीशीलता प्रत्यक्षात दिसली पाहिजे. रोजगार म्हणजे केवळ सरकारी नोकरीतील खोगीरभरती नव्हे. स्वयंरोजगारासंदर्भात मोदी सरकारच्या ज्या अनेक संकल्पना आहेत, त्यांची फलनिष्पत्ती जनतेसमोर आली पाहिजे. केवळ चमकदार घोषणाबाजीतून क्षणभर डोळे दिपतील, परंतु नंतर खाली काय आहे ते दिसल्यावाचून राहणार नाही!