रॉयल चॅलेंजर्स काठावर पास !

0
120

>> कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी निसटता पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आंद्रे रसेल व नितीश राणा यांचा कडवा प्रतिकार मोडून काढत काल शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ३५वा सामना ईडन गार्डन स्टेडियमवर खेळविण्यात आला. बंगलोरने विजयासाठी ठेवलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने ५ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात बंगलोरप्रमाणेच खराब झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर आरसीबीकडून खेळणार्‍या डेल स्टेन याने ख्रिस लिन व शुभमन गिल यांचे महत्त्वाचे बळी घेतले तर सैनीने नारायणला बाद करत केकेआरची ३ बाद ३३ अशी स्थिती केली. धावा जमवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या रॉबिन उथप्पाला बाद करत स्टोईनिसने केकेआरला चौथा धक्का दिला. उथप्पाने २० चेंडू खेळून केवळ ९ धावा केल्या. ११.५ षटकांत ४ बाद ७९ अशी टुकार स्थिती असताना आरसीबीचा विशाल विजय दृष्टिपथात दिसत होता. परंतु, राणा व रसेल या जोडीने बंगलोरच्या गोलंदाजांची पिसे काढली. राणाने ४६ चेंडूंत नाबाद ८५ तर रसेलने २५ चेंडूंत ६५ धावा चोपल्या. आरसीबीच्या गोलंदाजी फळीत असलेल्या खोलीचा अभाव ओळखून त्यांनी आपले डाव खेळले. चहलच्या तीन षटकांत या दोघांनी ४५ धावा वसूल करत त्याची गोलंदाजी बंद करण्यास भाग पाडले. अनुभवी डेल स्टेन यालासुद्धा रसेल समोर असताना योग्य टप्पा व दिशा राखणे जमले नाही. शेवटच्या षटकात २४ धावांची आवश्यकता असताना मोईन अलीने केवळ १३ धावा देत संघाला विजयी केले.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. पार्थिव पटेल व विराट कोहली या नेहमीच्या जोडीने बंगलोरच्या डावाची सुरुवात केली. धावा जमवण्यासाठी या जोडीला संघर्ष करावा लागला. यातच मोठा फटका खेळण्याच्या नादात पार्थिव पटेल सीमारेषेवर नितीश राणाकरवी झेलबाद झाला. दोन-तीन प्रयत्नांनंतर राणाने हा झेल टिपला. तिसर्‍या स्थानावर बढती मिळालेल्या अक्षदीप नाथ याला संधीचे सोने करता आले नाही. एक षटकार ठोकून त्याने कोहलीची वाहवा मिळविली. परंतु, १५ चेंडू खर्च करून केवळ १३ धावा जमवताना त्याने तंबूची वाट धरली. यावेळी बंगलोरचा संघ ८.५ षटकांत २ बाद ५९ असा चाचपडत होता. पहिल्या दहा षटकांनंतर बंगलोरची २ बाद ७० अशी स्थिती झाली होती. मोईन अली व विराट कोहली या जोडीने सामन्याची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. या द्वयीने केवळ ४३ चेंडूंत ९० धावांची भागदारी रचली. मोईन अलीने कुलदीप यादवची गोलंदाजी टार्गेट केली. डावातील १६व्या षटकात अलीने तीन षटकार व २ चौकार लगावत २७ धावांची लयलूट केली. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अली बाद झाला. पहिल्या ४६ धावांसाठी ३६ चेंडू खेळल्यानंतर कोहलीने आपल्या पुढील २२ चेंडूंत ५४ धावांची बरसात केली. शेवटच्या पाच षटकांत बंगलोरने ९१ धावा जमवल्या.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः पार्थिव पटेल झे. राणा गो. नारायण ११, विराट कोहली झे. गिल गो. गर्नी १०० (५८ चेंडू, ९ चौकार, १ षटकार), अक्षदीप नाथ झे. उथप्पा गो. रसेल १३, मोईन अली झे. कृष्णा गो. कुलदीप ६६ (२८ चेंडू, ५ चौकार, ६ षटकार), मार्कुस स्टोईनिस नाबाद १७ (८ चेंडू, २ चौकार, १ षटकार), अवांतर ६, एकूण २० षटकांत ४ बाद २१३
गोलंदाजी ः हॅरी गर्नी ४-०-४२-१, सुनील नारायण ४-०-३२-१, प्रसिध्द कृष्णा ४-०-५२-०, आंद्रे रसेल ३-०-१७-१, कुलदीप यादव ४-०-५९-१, पीयुष चावला १-०-१०-०
कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन झे. कोहली गो. स्टेन १, सुनील नारायण झे. पटेल गो. सैनी १८, शुभमन गिल झे. कोहली गो. स्टेन ९, रॉबिन उथप्पा झे. नेगी गो. स्टोईनिस ९, नितीश राणा नाबाद ८५ (४६ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार), आंद्रे रसेल धावबाद ६५ (२५ चेंडू, २ चौकार, ९ षटकार), दिनेश कार्तिक नाबाद ०, अवांतर १६, एकूण २० षटकांत ५ बाद २०३
गोलंदाजी ः डेल स्टेन ४-०-४०-२, नवदीप सैनी ४-०-३१-१, मोहम्मद सिराज ४-०-३८-०, मार्कुस स्टोईनिस ४-०-३२-१, युजवेंद्र चहल ३-०-४५-०, मोईन अली १-०-१३-०

विराटचे पाचवे आयपीएल शतक
विराट कोहलीने आयपीएलच्या १२व्या मोसमातील आपल्या पहिल्या एकूण पाचव्या शतकी खेळीची नोंद केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराटने ५८ चेंडूत १०० धावा पटकावल्या. या कामगिरीसह आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन (प्रत्येकी ४), एबी डीव्हिलियर्स (३) यांना काल मागे टाकले. या यादीत ख्रिस गेल हा विराटच्या पुढे आहे. गेलच्या नावावर ६ शतके जमा आहेत. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचे हे पाचवे शतक ठरले. मायकल क्लिंगर (६ शतके) या बाबतीत प्रथम स्थानावर आहे.