रेल्वेवर झाड पडून १ ठार; दोघेजण जखमी

0
336

>> वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा दक्षिण गोव्याला तडाखा

सासष्टी, केपे, काणकोण, सांगे या तालुक्यांतील अनेक गावांना काल संध्याकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. याच दरम्यान बाळ्ळी येथे मुंबई – मंगळूर मार्गावरील ट्रेनवर मोठे झाड आदळल्याने एक प्रवासी ठार तर दोघेजण जखमी झाले. मात्र अन्यत्र कोठेही जीवितहानीचे वृत्त नाही.
वादळीवार्‍यामुळे अनेक भागांमध्ये झाडांची बर्‍याच प्रमाणात पडझड झाली. झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाल्याचे तसेच वाहतुकीच्या खोळंब्यासह काही ठिकाणी वीज पुरवठा बंद पडल्याचे वृत्त आहे. उत्तर गोव्यातही म्हापसा, डिचोली येथे पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

रेल्वेवर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू
सायंकाळी सहा वाजता वादळी वार्‍याने बाळ्ळी येथे रेल्वे पुलाजवळ भले मोठे झाड मुंबई-मंगळूर मार्गावरील रेल्वे गाडीवर पडून आतील एक प्रवासी ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. या झाडामुळे रेल्वे मार्ग व बाजूचा बसमार्ग बंद झाला. दरम्यान झाड पडून पांझरखणीत एक घर कोसळले. झाडे मोडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. प्रचंड वादळी वार्‍यासह पाऊस पडला. बाळ्ळी रेल्वे पुलाजवळ झाड कोसळल्याने मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी पोहचले.
सायंकाळी सहा वाजता अचानक आकाशात काळे ढग दाटून आले व जोराचे वारे वाहू लागले. याच वेळी मंगळूरहून मुंबईला जाणारी जलद रेल्वे बाळ्ळी रेल्वे पुलावर पोहचताच, रेल्वे मार्गाजवळ असलेले भले मोठे झाड कोसळले व त्या झाडाच्या फांद्या रेल्वे खिडकीतून आत, तसेच दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशावर जोराने आपटल्या. त्यात एक प्रवाशी खाली पडून ठार झाला. तर दोघे जखमी झाले. जखमीना बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल केले. पण घाबरलेला असल्याने बोलत नाही, असे डॉक्टरानी सांगितले. मृताचे नाव व जखमीची नावे समजू शकले नाहीत.

काणकोण तालुक्यात वादळी पाऊस
काणकोण तालुक्यातील विविध भागात काल संध्याकाळी वादळी वार्‍याने कित्येक घरांवर माड पडून नुकसान झाल्याची माहिती काणकोण अग्नीशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली. वादळी वार्‍याबरोबर काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्या. करमलघाट राष्ट्रीय महामार्गवर बारशे येथे भला मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. काणकोण अग्नी शामक दलाचा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड कापून काढून वाहतूक सुरळीत केली. मास्तीमळ येथे रस्त्यावर काजूचे झाड उन्मळून पडून वाहतूक ठप्प झाली. नगर्से व ओवरे -पाळोळे येथे घरावर माड पडून घराचे नुकसान झाले. देळे येथील अश्विनी शेट यांच्या घरावर काजूचे झाड पडून बरेच नुकसान झाले. पैैंगीण येथील वीज खात्याच्या कार्यालयावर माड कोसळला. त्यामुळे कार्यालयाचे बरेच नुकसान झाले. मोखड येथे राष्ट्रीय महामार्गवर एक झाड उन्मळून पडून वाहतूक ठप्प झाली. तिरवाळ, पैैंगीण येथीलही झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळाली आहे.
खोतीगाव येथे अचानक चक्री वादळ आल्याने कित्येक घरांची कौले उडून गेली. काही ठिकाणी वीजचे खांब मोडून पडल्याचे खोतीगाव येथील शांताराम देसाई यांनी सांगितले.

केपे भागालाही तडाखा
केपे तालुक्यातील गावांमध्ये वादळी वार्‍यासह संध्याकाळी ५.४५ वाजता पाऊस झाला. झाडांच्या पडझडीमुळे वीज पुरवठा बहुतेक भागात बंद झाला. भूमीगत वीजवाहिन्या असलेल्या भागांमध्येच वीज पुरवठा चालू होता.

सांगे तालुक्यात झाडांची पडझड
गडगडाट व वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे काल सांगे, कुचडचे, सावर्डे, केपे भागात ठिकठिकाणी पडझड झाली. वालाकिणी सांगे येथे दोन झाडे, बाराजण सांगे येथे एक झाड व भाटी सांगे येथे काजूचे झाड रस्त्यावर पडले. मोरायले येथेही रस्त्यावर झाड पडले. कापशे येथील रेमिडी फर्नांडिस यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाले. बाळ्ळी येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ झाड पडल्याने वाहतूक खोळंबली.