‘रेरा’ नोंदणीचा आज अंतिम दिवस

0
111

गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरणाकडे बिल्डर, प्रवर्तक, एजंट यांना पन्नास हजार रुपयांच्या दंडाच्या रक्कमेसह नोंदणीसाठी ३१ मार्च २०१८ हा शेवटचा दिवस आहे. रेराअंतर्गत आत्तापर्यंत केवळ २० एजंट आणि ४२ इमारत प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

प्राधिकरणाने बिल्डर, एजंट यांना नोंदणीसाठी २३ मार्च २०१८ पर्यत मुदत दिली होती. तसेच, पन्नास हजार रुपयांच्या दंडासह नोंदणीसाठी ३१ मार्च २०१८ पर्यत अर्ज अपलोड करण्याची संधी दिली आहे.

रेरा कायद्याखाली सुरू असलेल्या प्रकल्पासाठी नोंदणी अर्ज ऑन लाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. नगरविकास खात्याने पाटो, पणजी येथे ‘रेरा’ खास विभाग सुरू केला आहे. रेरा अर्तंगत बिल्डर, एजंट, प्रवर्तकाच्या नोंदणीसाठी ऑन लाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रेराच्या अधिकार्‍याकडून ऑनलाईन पद्धतीने मिळणार्‍या अर्जाची तपासणी करून नोंदणीसाठी पुढील प्रक्रिया केली जात आहे. रियल इस्टेट प्रकल्पाच्या नोंदणीसाठी आत्तापर्यंत दीडशेच्यावर अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेराच्या अधिकार्‍याकडून संबंधिताकडून प्राप्त अर्जाची छाननी केली जाते. संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जात आहेत. अपूर्ण अर्जांना मान्यता दिली जात नाही. रेराखाली आत्तापर्यंत २० एजंटांनी नोंदणी करून घेण्यात आली आहे. तसेच ४२ प्रकल्पांची नोंदणी करून घेण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या रिअल इस्टेट ऍक्ट २०१६ (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) या कायद्याच्या कार्यवाहीची जानेवारी २०१७ पासून सर्व राज्यांकडून केली जात आहे. नगरविकास खात्याने रेरा कायद्याच्या कार्यवाहीसाठी गोवा रिअल इस्टेट नियम २०१७ तयार केला आहे. मुळात राज्य सरकारने ‘रेरा’ कायद्याची अंमलबजावणी सात महिन्यांनी उशिरा सुरू केली आहे. ‘रेरा’ कायद्याचे अंतिम नियम २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचित केले.

‘रेरा’ अंमलबजावणी एप्रिलपासून शक्य
राज्यात रेरा कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिलपासून होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, प्रकल्पाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने एप्रिलपासून रेराची अंमलबजावणीबाबत अनिश्‍चितता व्यक्त केली जात आहे. प्राधिकरणाकडे अपुरी माहिती सादर केलेल्या अर्जदारांकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. रेरा कायद्याखाली नोंदणी न करणार्‍याविरोधात कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री फ्रान्सीस डिसोझा यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.