रेईशमागूस सामूहिक बलात्काराची योग्य पोलीस चौकशी नाही

0
89

>> पिळर्ण सिटीझन फोरमचा आरोप

बेताळभाटी येथील समुद्र किनार्‍यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आवाज उठवणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई साळगाव मतदारसंघात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गप्प का? असा प्रश्‍न पिळर्ण सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर यांनी पत्रकार परिषदेत काल उपस्थित केला. या प्रकरणात एका राजकारण्याच्या निकटवर्तीयाचा समावेश असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राजकीय दबावामुळे पोलिसांनी योग्य चौकशी न केल्याचा यावेळी दावा करण्यात आला.

साळगाव मतदारसंघातील रेईश मागूसमधील एका गेस्ट हाउसमध्ये मागील महिन्यात एका पंधरा वर्षीय मुलींवर चार जणांनी बलात्कार केला. याबाबत पर्वरी पोलीस स्टेशनवर तक्रार नोंद झालेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केवळ एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील तिघे मोकाट आहेत, असे बांदोडकर यांनी सांगितले.

पिळर्ण सिटीझन फोरमने या बलात्कार प्रकरणाच्या योग्य चौकशीसाठी राज्यपाल, पोलीस अधीक्षक व इतरांना निवेदन सादर केले होते. परंतु या निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही. या पिडीत मुलीच्या बहिणीने पोलीस महासंचालकांना एक निवेदन सादर करून प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे, असेही बांदोडकर यांनी सांगितले.

बेताळभाटी येथे एका युवतीवरील बलात्कार करणार्‍यांना फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. परंतु, साळगाव मतदारसंघातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी मंत्री सरदेसाई यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मंत्री सरदेसाई यांनी साळगाव मतदारसंघात झालेल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करावी, अशी मागणी बांदोडकर यांनी केली.