राहुल पदारूढ

0
104

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर राहुल गांधी यांच्या नावावर काल बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे अर्थातच राहुल यांच्या शिरावर हा पक्षाध्यक्षपदाचा मुकूट चढला असला तरी तो काटेरी आहे. घसरणीला लागलेल्या आपल्या पक्षाला नवी उभारणी देत दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचे जे प्रचंड आव्हान राहुल यांच्यापुढे आज उभे आहे, त्यात त्यांच्याजवळ असलेल्या आणि भासवल्या जात असलेल्या नेतृत्वगुणांचा पुरता कस लागणार आहे. राहुल यांच्यासाठी पहिले आव्हान उंबरठ्यावरच उभे आहे ते आहे गुजरात विधानसभा निवडणुकीचे. ओबीसी, पटिदार आणि दलितांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मायभूमीत त्यांच्या पक्षाला धूळ चारण्याची जी रणनीती राहुल आणि त्यांच्या पक्षाने आखलेली आहे, तिच्या यशापयशावर राहुल यांच्या नेतृत्वाला लोकमान्यता मिळणे अवलंबून असेल. आई सोनिया गांधींच्या पावलावर पाऊल टाकत नेहरू – गांधी घराण्याचा हा सहावा वारस कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदी आलेला आहे, परंतु सोनिया जेव्हा पक्षात आल्या, तेव्हा सत्ता, पक्ष, राजकारण याविषयी त्या पूर्ण अनभिज्ञ होत्या. तरी अल्पावधीत त्यांनी पक्षावर आणि पक्षाच्या सरकारवर अशी काही पकड बसविली की, त्यांचा शब्द अंतिम बनला. राहुल राजकारणात उतरले त्याला आता तेरा वर्षे उलटून गेली आहेत. पक्ष सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि आता अध्यक्ष अशी मजल दरमजल करीत ते आलेले असल्याने पक्ष आणि विद्यमान राजकारणाच्या अंतःप्रवाहांशी ते पूर्णतः परिचित असणे अपेक्षित आहे. गांधी घराण्याचे वारस जरी असले तरी बरीच वर्षे त्यांनी हातातोंडाशी असलेल्या या पदापासून दूर राहणे – कारण काहीही असो – पसंत केलेले असल्याने घराणेशाहीचा मुद्दा आपसूक निकामी झाला आहे. घराण्याची पुण्याई पाठीशी असल्याने त्यांना आव्हान देण्याची कोणाची प्राज्ञा नाही. पक्षाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी राहुल यांच्या चरणी आपल्या निष्ठा काल वाहिल्या, त्यातच सर्व आले. आता या १३२ वर्ष जुन्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी जुन्या – नव्यांना सोबत घेऊन ते पुढे कसे जाणार आहेत त्याकडे देशाचे लक्ष आहे. पक्षाची रणनीतीही बदलण्याचा प्रयास गेल्या काही दिवसांत दिसू लागला आहे. आज राहुल स्वतःला शिवभक्त म्हणवून घेत गुजरातमधील हिंदू धार्मिक जनतेला आपलेसे करू पाहात आहेत. त्यांच्या सोमनाथ दौर्‍यात बिगर हिंदू म्हणून त्यांच्या झालेल्या नोंदीचे जे राजकारण झाले ते त्यांच्या या प्रयत्नांवर घाव घालण्यासाठी. राहुल यांची शिवभक्ती ही देशातील सध्याच्या वातावरणात सेक्युलर धोरणे चालणार नाहीत हे उमगल्याने नव्या वाटा कॉंग्रेस पक्ष शोधू लागल्याची निदर्शक आहे. सोशल मीडियावरील त्यांची विचारपूर्वक चाललेली ‘जीएसटी म्हणजे गब्बरसिंग टॅक्स’ यासारखी चमकदार व चटकदार शेरेबाजी, युवा पिढीमध्ये पक्षाला लोकप्रियता मिळवून देण्याचा चाललेला प्रयत्न, गेल्या काही दिवसांत आदिवासी, असंघटित कामगार, मच्छीमार, व्यावसायिक आदींमध्ये पक्षाने सुरू केलेल्या नव्या शाखा या आणि अशा प्रयत्नांद्वारे कॉंग्रेस पक्ष आपली घसरण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. राहुल यांना येत्या अठरा महिन्यांत अकरा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. २०१९ मध्ये प्रत्यक्ष नरेंद्र मोदींशी लोकसभा निवडणुकीत सामना आहे. आता रणांगणातून एकाएकी गायब होण्याची संधी त्यांना नाही. त्यामुळे यश वा अपयश याचे श्रेय वा अपश्रेय त्यांच्याच पदरी पडणार आहे. हिट अँड रन राजनीती आता चालणार नाही. पक्षाचे फुटते जहाज सांभाळून, त्यामध्ये नवी ऊर्जा पेरून पुढे जावे लागणार आहे. सोनियांनी जेव्हा पक्षाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा कॉंग्रेस पक्षाने आम आदमीभिमुख धोरणे आखून त्या दिशेने योजना राबवल्या आणि भरीव यश कमावले. पुढे मनमोहनसिंग सरकारला त्या यशोशिखरावर राहता आले नाही हा वेगळा भाग. राहुल यांना अशाच काही क्रांतिकारी धोरणांची आखणी करून पक्षाला नवी दिशा द्यावी लागणार आहे. आजच्या संदर्भामध्ये कॉंग्रेसची पुरातन रणनीती चालणारी नाही याचे भान त्यांना एव्हाना आलेले आहे. समाजाच्या तळागाळातील एकगठ्ठा मतांवर सत्ता काबीज करण्याचे दिवस आज राहिलेले नाहीत. तेथे त्या मतांवर डोळा असलेले नवे प्रतिस्पर्धी तयार झालेले आहेत. विरोधकांच्या तिसर्‍या आघाडीने ती मतपेढी केव्हाच काबीज केलेली आहे. केवळ मोदी सरकारची खिल्ली उडवणार्‍या नकारात्मक प्रचारानेही फारसे काही हाती लागणार नाही. एक समर्थ पर्याय म्हणून कॉंग्रेस पक्षाला पुढे करण्यासाठी आणि मोदींचा झंझावात रोखण्यासाठी, पक्षाला नवी दिशा देण्यासाठी जिवाचे रान करावे लागेल. तेवढे गांभीर्य त्यांच्यापाशी आजवरच्या अनुभवातून आले असेल आणि तेवढी मेहनत करण्याची त्यांची तयारी असेल अशी अपेक्षा करूया.