राहुल गांधींनी कागदाविना बोलावे

0
108

>> पंतप्रधान मोदींचे खुले प्रतिआव्हान

संसदेत बोलण्याची संधी दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टिकाव लागणार नाही, या राहुल गांधी यांच्या आव्हानाला मोदींनी प्रतिआव्हान दिले असून कागदाचा एकही तुकडा न घेता फक्त १५ मिनिटे भाषण करण्याचे खुले आव्हान कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल यांना दिले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार मोहिमेच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. म्हैसूर येथे झालेल्या सभेत त्यांनी विद्यमान सिद्धरामय्या सरकारवरही चौफेर टीका केली. राहुल यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देत मोदी म्हणाले की, राहुल १५ मिनिटे बोलणार हीच मोठी गोष्ट आहे. त्यांनी कागद न घेता १५ मिनिटांचे भाषण करावे. ज्या भाषेत बोलायचे आहे, त्या भाषेत हातात कागद न घेता कर्नाटक सरकारच्या कामगिरीबाबत जनतेसमोर बोलावे. या भाषणावेळी त्यांनी फक्त पाचवेळा विश्‍वेश्‍वरय्यांचे नाव घ्यावे असे आव्हानही त्यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी वंदे मातरम् एका ओळीत संपवा असे म्हटले होते. या वक्तव्याचा समाचारही मोदींनी आपल्या भाषणात घेतला. तुम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ऐकले नाही. किमान आपल्या आईचे तरी एका. तुमच्या आईने देशातील प्रत्येक घरांत वीज पोहोचणार असल्याचे म्हटले होते. २०१४ पर्यंत कॉंग्रेसचे सरकार होते. मग तुम्ही खोटे का बोलत आव्हान, असा सवाल मोदींनी केला.
माजी पंतप्रधान तथा जनता दल (एस)चे नेते देवेगौडा यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक उद्गार काढण्याने मोदी यांनी देवेगौडा एक महान नेते असल्याचे गौरवोद्गार काढत राहुलवर जोरदार टीका करत हीच तुमची संस्कृती आहे का? असा सवाल केला. मतदानपूर्व चाचण्यांमध्ये कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले असून जनता दल (एस)ची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.