राहुल गांधींचा वायनाडमधून अर्ज

0
120

मोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करत सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. राहुल व प्रियांका यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पाठीराख्यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती.

कॉंग्रेस अध्यक्षपदी आल्यापासून राहुल गांधी यांनी आक्रमक राजकारण सुरू केले आहे. मोदी सरकारवर ते सातत्याने हल्ले चढवत आहेत. त्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी राहुल यांनी यावेळी परंपरागत अमेठी मतदारसंघाबरोबरच वायनाडमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काल सकाळीच ते बहीण प्रियांका वाड्रा यांच्यासोबत हेलिकॉप्टरने केरळमध्ये पोहोचले. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोड शो करत कालपेटा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज भरला.

राहुल गांधी १५ कोटींचे मालक

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर एकूण १४.८५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी आपल्या मालमत्तेची माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता ही ५ कोटी ८० लाख रुपये असून, स्थावर मालमत्तेची किंमत ७ कोटी ९३ लाख रुपये असल्याचे घोषित करण्यात आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील प्राप्तिकर १ कोटी ११ लाख असल्याचे म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्याकडून ५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले असून जंगम मालमत्तेत ५ कोटी १९ लाख रुपये शेअर्स आणि बॉण्ड स्वरूपात गुंतवले आहेत. पीपीएफ आणि भारतीय टपाल खात्यामधील बचत ३९ लाख ८९ हजार असून, २ लाख ९१ हजार रुपयांचे दागिने आहेत. म्युचुअल फंडातील गुंतवणूक ८१ लाख २८ हजार आहे. नवी दिल्लीमधील मेहरुली येथे बहीण प्रियंका वॉड्रा आणि राहुल गांधी यांची संयुक्त शेतजमीन असून, त्याची किंमत २.३४ कोटी आहे. गुरुग्राम येथे ८ कोटी ७५ लाख रुपये किमतीची व्यावसायिक इमारत असल्याचे म्हटले आहे.