राहुलचा राज्याभिषेक

0
115

बुडत्या जहाजासारखा गेली काही वर्षे भरकटत चाललेल्या कॉंग्रेस पक्षाचे कप्तानपद आता राहुल गांधी यांच्याकडेच सुपुर्द करावे असा आग्रह दरबारी मंडळींनी धरला आहे. गेली काही वर्षे राहुल यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ घालण्याची सर्व सज्जता होऊनही निवडणुकांतील सततच्या अपयशामुळे ती घटिका पुढे पुढे चालली होती. परंतु आता एकदाचे होऊन जाऊद्या अशा निर्धाराने मंडळी पुन्हा राहुल यांच्या राज्याभिषेकासाठी सज्ज झाली आहेत. एकीकडे सोनिया गांधी मोदींना ‘शहेनशहा’ म्हणून हिणवत असताना दुसरीकडे आपल्या शहजाद्यांचा राज्याभिषेक करण्यास सरसावणे किंवा कॉंग्रेसमधील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी पक्षाची बंदिस्त व्यवस्था खुली केली पाहिजे असे अर्णव गोस्वामींनी घेतलेल्या मुलाखतीत ठासून सांगणार्‍या राहुलनी स्वतः त्याच वाटेने पुढे सरकणे यात विसंगती दिसत असली, तरी मरणासन्न अवस्थेतील कॉंग्रेसमध्ये नवी ऊर्जा फुंकण्यासाठी काही तरी निमित्त हवे म्हणून हा नेतृत्वबदलाचा घाट घातला गेला आहे. राहुल यांच्या नेतृत्वशैलीबाबत किंवा त्यांच्या कुवतीबाबत आजवर नकारात्मक चित्रच निर्माण होत गेले आहे. व्यक्तित्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही बाबतीत त्यांनी आजवर निराशाच केली. ज्या ज्या वेळी त्यांनी निवडणुकांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली, तेव्हा तेव्हा अपयशच पदरी पडले. जय – पराजय हे कोणत्याही राजकीय पक्षात असतात, त्यामुळे त्या पराभवाकडेही एकवेळ दुर्लक्ष करता आले असते, परंतु राहुल यांची नेतृत्वशैलीही सदैव ‘हिट अँड रन’ स्वरूपाचीच राहिली. त्यात सातत्य दिसले नाही. एखाद्या विषयाचा पाठपुरावा करण्याची चिकाटी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कोणी गांभीर्याने घेतले नाही. राहुल यांच्या नेतृत्वाची ही मर्यादा राहिली आहे. मध्यंतरी ते विजनवासात गेले. त्यानंतर नव्या रूपातील राहुल आता दिसतील अशी दवंडी पिटली गेली होती. लोकसभेतील मोदींवरील ‘फेअर अँड लव्हली’ टीका करणार्‍या भाषणातून एक नवे राहुल गांधी दिसले होते. कुमार केतकरांसारखे सोनियानिष्ठ पत्रकारही आताचे राहुल वेगळे आहेत याची प्रशस्ती देत होते. परंतु पुन्हा जुन्याचीच पुनरावृत्ती घडली. मध्यंतरी अर्णव गोस्वामींना त्यांनी जी पहिलीवहिली औपचारिक मुलाखत दिली, त्यातही पढवलेल्या पोपटासारखी भूमिका राहुल यांनी वठवली. व्यवस्था हा शब्द त्या मुलाखतीत तब्बल ७४ वेळा राहुल यांनी वापरला, तर ‘सशक्तीकरण’ हा शब्द ३३ वेळा! प्रश्न कोणता आणि उत्तर काय याचा ताळमेळही जमलाच नाही. परिणामी राहुल यांनी पुन्हा निराशाच केली. या सगळ्या परिस्थितीत आता काही विशेष बदल झाला असेही दिसत नाही. परंतु आत्मविश्वास गमावून बसलेल्या पक्षामध्ये नवी ऊर्जा, नवी चेतना फुंकण्याची निर्वाणीची वेळ आलेली असल्याने त्यासाठी काही तरी निमित्त हवे आहे. म्हणून राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याचा आग्रह पक्षनेतृत्वा भोवतालच्या कोंडाळ्याने धरला आहे. सोनिया गांधींनी गेली अठरा वर्षे या पक्षाला नेतृत्व दिले. खरे सत्ताकेंद्र बनून अप्रत्यक्षरीत्या सरकारही चालवले. परंतु त्याचबरोबर पक्षात होयबा संस्कृतीच पुढे चालवली. परखडपणे सत्य सांगण्यापेक्षा आपापली पदे सांभाळण्याकडे अशा वातावरणात सर्वांचा कल राहतो. कॉंग्रेसच्या घसरणीचे खरे कारण हे आहे. हे वातावरण राहुल यांच्या आगमनानंतरही बदलण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. बुजुर्गांच्या जागी तरुण तुर्क येतील एवढेच. राहुल यांना नेता बनवणे म्हणजे सतत शून्यावर बाद होणार्‍या खेळडूला कप्तानपद देण्यासारखे आहे असे रामचंद्र गुहांसारखे विचारवंत म्हणतात तेव्हा ती शेलकी टीका मानता येत नाही. कागदावरच्या सैद्धान्तिक गमजा आणि प्रत्यक्ष राजकारणातील खाचाखोचा यामध्ये कमालीचे अंतर असते. ते मोजण्यासाठी लागणारे चातुर्य राहुल यांच्यात आहे का याबाबत साशंकता आहे. सद्यपरिस्थितीकडे पाहता, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खरी लढत मोदींचा भाजपा आणि विविध प्रादेशिक पक्षांचे उभरते शक्तीकेंद्र यांच्यातच होईल असे दिसते आहे. कॉंग्रेस पिछाडीवर फेकला गेला आहे आणि ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ हे प्रधान उद्दिष्ट धरलेल्या आक्रमक भाजपापुढे तग धरण्यासाठी, सत्ताधार्‍यांच्या कमकुवत बिंदूंना अचूक पकडून रान पेटवणार्‍या आक्रमक नेतृत्वाची कॉंग्रेसला गरज आहे. कार्यक्षम संघटनाची, बोलबच्चन प्रवक्त्यांपेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज आहे. आपल्या ‘पप्पू’च्या प्रतिमेतून बाहेर पडून राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाला खरेच सावरू शकतील?