राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती

0
916

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गात संघ प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. मुखर्जी यांची ही भेट देशभरात वादाचा विषय ठरली होती. ते संघाच्या मंचावर काय बोलणार याविषयी तर्कवितर्क व्यक्त होत होते. श्री. मुखर्जी यांच्या त्या ऐतिहासिक भाषणाचा हा मराठी अनुवाद –

सरसंघचालक श्री. मोहन भागवतजी, प्रतिनिधी, स्त्री पुरुषहो,
आज मी येथे आपल्याशी भारताच्या संदर्भात राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती या संकल्पनांविषयीची माझी समज आपल्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे. ह्या तिन्ही संकल्पना एकमेकांत एवढ्या गुंतलेल्या आहेत की, त्यातील एखादीची स्वतंत्रपणे चर्चा करणे कठीण आहे.

सुरवातीला ह्या तीन शब्दांचा शब्दकोशातील अर्थ समजून घेऊ. राष्ट्राची व्याख्या ‘एक संस्कृती, भाषा किंवा इतिहास असलेल्या एका विशिष्ट प्रदेशात राहात असलेला मोठा जनसमूह’ अशी करण्यात आलेली आहे. ‘राष्ट्रवादा’ची व्याख्या ‘एखाद्याच्या स्वतःच्या राष्ट्रासमवेत असलेली ओळख आणि इतर राष्ट्रांचे हित सोडून त्याच्या हितासाठी पाठिंबा’ अशी आहे, तर ‘राष्ट्रभक्ती’ची व्याख्या ‘एखाद्याच्या राष्ट्राप्रतीची भक्ती आणि निःस्सीम पाठिंबा’ अशी करण्यात आलेली आहे.

आपल्या मुळांकडे पाहूया. भारत हा सिल्क आणि स्पाइस रूटस्‌नी जगाशी जोडला गेलेला एक मुक्त समाज होता. व्यापार आणि आक्रमणाच्या ह्या गजबजलेल्या महामार्गांनी संस्कृती, श्रद्धा आणि शोधांची मुक्त आदानप्रदान पाहिली. व्यापारी, विद्वान आणि धर्मगुरूंनी त्यावरून पर्वत आणि वाळवंटे पादाक्रांत केली, सागर पार केले. हिंदू प्रभावानिशी बौद्ध धर्म मध्य आशिया, चीन आणि आग्नेय आशियात पोहोचला. मेगास्थेनेससारख्या प्राचीन प्रवाशांनी ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात, फा हिएन याने ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकात आणि हिएन त्सुंग याने सातव्या शतकात, जेव्हा ते भारतात आले, तेव्हा येथील सुनियोजित वसाहती, उत्तम साधनसुविधा आणि कार्यक्षम प्रशासनाविषयी लिहिले. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, सोमपुरा आणि ओदंतपुरी यांनी मिळून प्राचीन विद्यापीठ व्यवस्था बनलेली होती, जिने जगावर ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून १,८०० वर्षे अधिराज्य केले. जगभरातील विद्वान आणि सर्वोत्तम बुद्धिमंतांसाठी ती लोहचुंबक ठरली. ह्या शिक्षणसंस्थांच्या मोकळ्या वातावरणात कला, साहित्य आणि विद्वत्ता पूर्ण रूपाने विकसित झाली. राज्यकारणावरील अधिकारी लेखन असलेले चाणक्याचे अर्थशास्त्रही याच काळात लिहिले गेले.

युरोपीय राष्ट्र संकल्पना वेस्टफेलियाच्या करारानंतर १६४८ साली अस्तित्वात आली, त्याच्या खूप आधीपासून भारत हे राष्ट्र होते. निश्‍चित भूप्रदेश, एक भाषा, धर्म आणि समान शत्रू – ह्या नमुन्यावर युरोपातील आधुनिक राष्ट्रे जन्मली, परंतु दुसरीकडे भारतीय राष्ट्रवाद हा ‘वैश्विकीकरणा’तून वसुधैव कुटुम्बकमच्या आणि सर्वे भवंतु सुखीनः सर्वे सन्तु निरामयः च्या तत्त्वज्ञानातून अवतीर्ण झाला. आम्ही संपूर्ण जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहतो आणि सर्वांचे सुख आणि आयुरारोग्य यासाठी प्रार्थना करतो.

संगम, सम्मीलन आणि सहअस्तित्व यांच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून आपली राष्ट्रीय अस्मिता घडली आहे. संस्कृती, श्रद्धा आणि भाषा यांची बहुविधता भारताला विशेष बनविते. आपण आपले सामर्थ्य सहिष्णुतेतून मिळवले आहे. आपण आपला बहुवाद स्वीकारला आहे आणि त्याचा आदर करतो. आपण आपली विविधता साजरी करतो. शतकानुशतके हे आपल्या समूह जाणिवेचा भाग राहिले आहे. धर्माची शिकवण आणि अस्मिता, प्रदेश, द्वेष आणि असहिष्णुता याद्वारे आपल्या राष्ट्रीयत्वाची व्याख्या करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर केवळ आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे विघटनच करील. जे काही भेद दिसतील, ते केवळ वरवरचे आहेत, परंतु समान इतिहास, समान वाङ्‌मय आणि समान संस्कृती असलेली आपण एक आगळीवेगळी सांस्कृतिक एकजूट राहिलो आहोत.

ख्यातनाम इतिहासकार विन्सेंट स्मिथ यांच्या शब्दांत, ‘सर्व शंकांपलीकडे भारतामध्ये एक सखोल अंतर्गत मूलभूत एकता आहे, भौगोलिक अलगता किंवा राजकीय वर्चस्वातून येते त्याहूनही अधिक गहन. ही एकता रक्त, वर्ण, भाषा, वेश, पद्धती आणि पंथ या अमर्याद वैविध्यांना बाजूला सारते.

इतिहासाकडे आपण जर एक धावती नजर टाकली तर भारतीय राष्ट्राची उत्पत्ती ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात मुख्यत्वे उत्तर भारतात पसरलेल्या सोळा महाजनपदांमध्ये शोधता येते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांना पराभूत करून वायव्य आणि उत्तर भारत मिळून एक सामर्थ्यशाली साम्राज्य उभारले. सम्राट अशोक हा ह्या घराण्याचा पहिला सर्वांत नामांकित शासक होता. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या राज्यांमध्ये ख्रिस्तपूर्व १८५ मध्ये विखुरले गेले. गुप्त घराण्याने पुन्हा एकदा एक मोठे साम्राज्य उभारले जे ख्रिस्तोत्तर ५५० मध्ये लयाला गेले. बाराव्या शतकापर्यंत अनेक घराण्यांनी राज्य केले व त्यानंतर मुघल आक्रमकांनी दिल्ली जिंकून त्यानंतरच्या राजवटींनी पुढील ३०० वर्षे येथे राज्य केले. बाबराने पानीपतच्या पहिल्या लढाईत १५२६ मध्ये शेवटच्या लोधी राजाला पराभूत केले आणि मुघल साम्राज्याचे पाय रोवले, जे तीनशे वर्षे सत्तारूढ राहिले.
ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीची लढाई १७५७ मध्ये जिंकून आणि अर्कोटची तीन युद्धे (१७४६ – ६३) जिंकून पूर्व आणि दक्षिण भारताचा फार मोठा भाग त्यांच्या आधिपत्याखाली आणला. पश्‍चिमेचा मोठा भागही कंपनीच्या प्रदेशाला जोडला गेला आणि ह्या प्रदेशांच्या प्रशासनासाठी आधुनिक पद्धतीचे सरकार १७७४ साली स्थापन करण्यात आले. ह्या प्रदेशांचे प्रशासन चालवण्यासाठी फोर्ट विल्यम्स, कोलकता येथील गव्हर्नरचे कार्यालय आणि मद्रास तसेच मुंबईत दोन उप – गव्हर्नर नेमण्यात आले. सुमारे १४० वर्षे कोलकता हे भारतातील ब्रिटीश सत्तेचे केंद्र होते. मात्र, प्रशासनाची जबाबदारी १८५८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आली व भारताचे प्रशासन हाताळण्यासाठी ब्रिटीश मंत्रिमंडळात सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाची नेमणूक झाली.

बदलती राजकीय भाग्ये आणि विजय यांच्या ह्या २५०० वर्षांच्या कालावधीत ५००० वर्षांची सांस्कृतिक सलगता अतूट राहिली. खरे तर प्रत्येक आक्रमक आणि प्रत्येक विदेशी घटकाला नवे संस्लेशण आणि एकतेसाठी सामावून घेतले गेले. टागोरांनी आपल्या ‘भारत तीर्थ’ ह्या कवितेत म्हटले आहे, ‘‘…. कोणालाही ठाऊक नाही की कोणाच्या हाकेसरशी मानवतेचे किती झरे जगभरातून अदम्य लाटांच्या रूपात, शतकांच्या कालखंडात आले आणि नद्यांसारखे ह्या विशाल सागरामध्ये समर्पित झाले. त्यांनी एक आत्मा धारण केला, ज्याला ‘भारत’ म्हणतात.’’
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आधुनिक भारतीय संघराज्याची संकल्पना इंडियन नॅशनल कॉंग्रेससहित विविध भारतीय संघटनांनी आपल्या परीने मांडली. पुण्यात श्री. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी तिचा १८९५ साली उद्घोष केला. सर्व कॉंग्रेस अध्यक्षांनी ब्रिटीश भारताच्या प्रदेशाचे व ५६५ संस्थानांचे मिळून भारतीय राष्ट्र बनवण्याची हाक दिली. बाळ गंगाधर टिळकांनी बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा यांची ‘स्वराज्य’ संकल्पना ‘हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ची हाक दिली, तेव्हा त्यांना स्वराज्यात ब्रिटीश भारत आणि संस्थाने यांतील विविध जाती, वंश आणि धर्म अभिप्रेत होते. हे राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांना भूगोल, भाषा, धर्म किंवा वंश यांच्या सीमा नव्हत्या. गांधीजींनी स्पष्ट केल्यानुसार भारतीय राष्ट्रवाद हा अ-समावेशक, आक्रमक किंवा विद्ध्वंसक नव्हता. हा राष्ट्रवाद पं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या ‘भारताचा शोध’ मध्ये विस्तृतपणे वर्णिला आहे. ते म्हणतात, ‘‘माझा विश्वास आहे की, राष्ट्रवाद हा भारतात केवळ हिंदू, मुसलमान, शिख आणि भारतातील इतर समूहांच्या विचारधारांच्या संयोगातून उत्पन्न होऊ शकतो. त्याचा अर्थ कोणत्याही समूहाची खरी संस्कृती नष्ट होणे असा नव्हे, परंतु त्याचा अर्थ एक समान राष्ट्रीय दृष्टी, जिच्यासाठी इतर सर्व बाबी दुय्यम असतील.’’
ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या आपल्या चळवळीच्या प्रक्रियेत देशभरातील विविध वसाहत-विरोधी, ब्रिटीश विरोधी आणि बहुधा प्रागतिक चळवळी स्वातंत्र्यासाठीच्या समावेशक राष्ट्रीय संघर्षात एकत्र आल्या होत्या, ज्यांनी आपल्या वैयक्तिक, वैचारिक आणि राजकीय कलांपेक्षा देशभक्तीची भावना वर ठेवली.
आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी संस्थाने विलीन होऊन भारताचे एकत्रीकरण झाले. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य निर्मिती होताच प्रांतिक आणि संस्थानी एकात्मता निर्माण झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी, भारतीय संविधान अस्तित्वात आले. आदर्शवाद आणि धैर्य यांचे लक्षणीय दर्शन घडवीत, आपण भारतीय जनतेने स्वतःला एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बहाल केले, ज्या अन्वये त्याच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समता यांची ग्वाही मिळाली. आपल्या सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता यांचा पुरस्कार करण्याचे कार्य आपण हाती घेतले. ही मूल्ये आधुनिक भारतीय राष्ट्राचा ध्रुवतारा ठरली.

लोकशाही ही आपली शतकानुशतकांच्या वसाहतवादी राजवटीतून निर्माण झालेल्या गरिबीच्या कलंकापासून बाहेर पडण्यासाठी आणि शांततेसाठीची सर्वांत मौल्यवान मार्गदर्शक बाब ठरली. आपल्यासाठी लोकशाही ही भेट नव्हे, परंतु तो एक पवित्र विश्वास आहे. ३८५ कलमे आणि १२ परिशिष्टे असलेले भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर कागदपत्र नव्हे, तर देशाच्या सामाजिक – आर्थिक रुपांतराचे ‘मॅग्ना कार्टा’ आहे. अब्जावधी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षांचे ते प्रतिनिधित्व करते. आपल्या संविधानातून आपला राष्ट्रवाद प्रवाहित होतो आहे. भारतीय राष्ट्रवादाची बांधणी ही ‘संवैधानिक राष्ट्रवाद’ अशी आहे, ज्यात आपल्या वारश्याने मिळालेल्या आणि विभागल्या गेलेल्या विविधतेविषयीचे कौतुक; एखाद्याचे नागरिकत्व विविध पातळ्यांवर सज्ज करण्याची तयारी, स्वतःच्या चुका सुधारण्याची आणि इतरांकडून शिकण्याची क्षमता सामावलेली आहे.

प्रतिनिधी, स्त्री पुरुषहो,
मी आपल्याला माझ्या संसदपटू आणि प्रशासक म्हणून पन्नासहून अधिक वर्षांच्या सार्वजनिक जीवनात उमगलेले काही सत्य सांगू इच्छितो. भारताचा आत्मा हा त्याच्या विविधतेमध्ये आणि सहिष्णुतेमध्ये आहे. आपल्या समाजाची ही विविधता शतकानुशतकांच्या कल्पनांच्या सम्मीलनातून घडलेली आहे. निधर्मवाद आणि समावेशकता हा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. ही आपली संमिश्र संस्कृती आहे, जी आपल्याला एक राष्ट्र बनविते.

भारताचे राष्ट्रीयत्व हे एक भाषा, एक धर्म, एक शत्रू नव्हे. १.३ अब्ज लोकांचा तो ‘चिरकालिक वैश्विकतावाद’ आहे, जे १२२ हून अधिक भाषा आणि १६०० हून अधिक बोलीभाषा त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरतात, सात प्रमुख धर्मांची उपासना करतात आणि एका ध्वजाखाली, व ‘भारतीय’ ह्या एका अस्मितेखाली राहणार्‍या आणि ‘शत्रू नसलेल्या’ तीन प्रमुख वांशिक गटांचे – आर्य, मोंगोलाईड व द्रविड यांचे प्रतिनिधित्व करतात. ही गोष्ट भारताला वैविध्यपूर्ण आणि संघटित राष्ट्र बनवते.
लोकशाहीमध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व प्रश्नांवर माहितीपूर्ण व तर्कसंगत सार्वजनिक सहभाग गरजेचा असतो. स्पर्धात्मक रुचींचा समतोल साधण्यासाठीच संवाद गरजेचा असतो असे नव्हे, तर त्यांचा समेट घडवण्यासाठीही तो हवा असतो. सार्वजनिक प्रबोधनातील भिन्न गोष्टी ओळखल्या गेल्या पाहिजेत. आपण वाद घालू शकतो, आपण सहमत होऊ शकतो वा असहमत असू शकतो, परंतु आपण मतभिन्नतेचे अत्यावश्यक अस्तित्व नाकारू शकत नाही. आपल्या राजकारणातील अहितकारक संघर्ष टाळून गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठीची समज केवळ संवादाद्वारे आपण विकसित करू शकतो.

शांतीपूर्ण सह – अस्तित्व, दयाभाव, जीवनाविषयीचा आदर आणि निसर्गाशी तादात्म्य हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. दरवेळी जेव्हा एखाद्या बालकावर वा महिलेवर अत्याचार होतो, भारताचा आत्मा जखमी होत असतो. क्रोधाचे प्रकटीकरण आपली सामाजिक रचना विदीर्ण करीत असते. रोज आपण आपल्या भोवती वाढता हिंसाचार पाहतो. ह्या हिंसाचाराच्या केंद्रस्थानी काळोख, भीती आणि अविश्वास आहे. आपली सार्वजनिक चर्चा आपण सर्व प्रकारचा हिंसाचार, शारीरिक अथवा मौखिक, यापासून मुक्त केली पाहिजे. केवळ अहिंसक समाज हा लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्व घटकांच्या, विशेषतः उपेक्षित आणि वंचितांच्या सहभागाची खात्री देऊ शकतो. आपण क्रोध, हिंसाचार आणि संघर्षाकडून शांती, सौहार्द आणि समाधान याकडे वळले पाहिजे.

आपण दीर्घ काळ वेदना आणि संघर्षाचे जीवन जगलो. आपण तरुण आहात, शिस्तशीर आहात, सुप्रशिक्षित आहात आणि उच्च शिक्षित आहात. कृपया शांती, सौहार्द आणि समाधानाची कामना करा. आपल्या मातृभूमीची ती हाक आहे. आपल्या मातृभूमीला त्याची गरज आहे.

मानवी जीवनामध्ये समाधान हे मूलभूत आहे. आरोग्यपूर्ण, आनंदी आणि उत्पादक जीवन जगणे हा आपल्या नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. आपण आपल्या आर्थिक विकासाच्या निर्देशांकांच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे, परंतु जागतिक समाधान निर्देशांकाच्या बाबतीत आपण मागे आहोत. २०१८ च्या जागतिक समाधान अहवालामध्ये १५६ देशांच्या क्रमवारीत आपण १३३ क्रमांकावर आहोत. संसद भवनाच्या सहाव्या लिफ्टपाशी कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील एक श्‍लोक कोरलेला आहे. तो सांगतो,
प्रजासुखे सुखं राज्ञः
प्रजानां च हिते हितम्‌‌ |
नात्मप्रियं हितं राज्ञं |
प्रजानां तु प्रियं हितम् ॥
जनतेच्या समाधानामध्ये राजाचे समाधान सामावलेले असते. त्यांचे कल्याण हे त्याचे कल्याण असते. त्याने केवळ त्याला आवडते तेच चांगले असे मानू नये तर सर्व जनतेला ज्याने समाधान प्राप्त होते ते स्वतःसाठी लाभदायी मानावे. ह्या श्लोकामध्ये कौटिल्य नमूद करतो की राष्ट्र हे लोकांसाठी असते. राष्ट्राच्या सर्व कृतींच्या केंद्रस्थानी लोक आहेत आणि लोकांमध्ये फूट पडेल आणि शत्रुत्व निर्माण होईल असे काहीही करता कामा नये. गरीबी, व्याधी आमि उपेक्षा यांच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी त्यांना संघटित करणे आणि आर्थिक विकास खर्‍या विकासात रुपांतरित करणे हे राष्ट्राचे उद्दिष्ट असायला हवे. शांती, सौहार्द आणि आनंद पसरवण्याचे उद्दिष्ट आपल्या सार्वजनिक जीवनाचा भाग होऊ द्यात आणि राष्ट्राच्या आणि जनतेच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या सर्व कृतींना मार्गदर्शन करू द्यात. केवळ ह्या आणि ह्याद्वारेच आनंदी राष्ट्र निर्माण होऊ शकेल, जेथे राष्ट्रीयत्व आपसूक प्रवाहित होईल.
धन्यवाद.
जय हिंद!
वंदे मातरम!