राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी गोव्यातून केवळ तिघांची नोंदणी

0
132

>> देशातून ३४ हजार २७९ जणांची नोंदणी

केंद्र सरकारने व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगार व्यक्तींना वृद्धापकाळात संरक्षण देण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी मागील पाच महिन्यात गोव्यातील केवळ तिघांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर या निवृत्ती वेतन योजनेसाठी ३४ हजार २७९ जणांनी नोंदणी केली आहे.
केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार यांनी ही माहिती लोकसभेत लेखी स्वरूपात सोमवारी दिली. केंद्र सरकारने देशातील व्यापारी, दुकानदार, स्वयंरोजगार व्यक्तींना वृद्धापकाळात आर्थिक मदत करण्यासाठी गेल्या १२ सप्टेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे.

गेल्या २६ फेब्रुवारी २०२० पर्यत या योजनेसाठी नोंदणी केलेल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या निवृत्ती वेतन योजनेसाठी उत्तर प्रदेशातून सर्वाधिक १० हजार ३० जणांनी नोंदणी केली आहे. तर, मिझोराम, लक्षद्वीप, सिक्कीम या राज्यातून एकाही व्यक्तीने नोंदणी केलेली नाही.

या केंद्रीय निवृत्ती योजनेसाठी आंध्रप्रदेश – ५२३०, अरुणाचल प्रदेश – ६९, आसाम – ५१७, बिहार – ७७८, छत्तीसगड – ४७५३, गुजरात – ३०९४, हरयाणा – १३५४, हिमाचल प्रदेश – ७७, जम्मू काश्मीर लडाख – ७३, झारखंड – ३७१, कर्नाटक – ७९८, केरळ – ७५, मध्यप्रदेश – ४२७, महाराष्ट्र – ८०७, मणिपूर – ३२, मेघालय – २६, नागालॅण्ड – ११, ओडिशा – ४२९, पंजाब – १९३, राजस्थान – ६७५, तामिळनाडू – ३७७, तेलंगणा – ४०७, त्रिपुरा – ३१२, उत्तराखंड – ७४२, पश्‍चिम बंगाल – ४४६, अंदमान निकोबार – १२२, चंदीगड – १८१३, दादरा नगर हवेली – ६, दमण दीव – ६, दिल्ली – १०५ आणि पुड्डचेरीतून – १२१ जणांनी नोंदणी केली आहे.