राष्ट्रपतींचा कानमंत्र

0
144

सत्तरी पार केलेल्या राष्ट्राकडून प्रगल्भतेची अपेक्षा व्यक्त करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संघर्षातही शांती आणि अहिंसेचा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन देशाला उद्देशून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केले. सध्या नागरिकत्व कायदा दुरुस्तीवरून देशभरामध्ये जो आगडोंब उसळलेला आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरील राष्ट्रपतींचा हा संदेश निश्‍चितपणे मननीय आहे. राष्ट्रपतींनी संघर्षाचे महत्त्व कुठेही नाकारलेले नाही. जेथे एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असेल, मनाला पटणारी नसेल तर त्याला विरोध प्रकट करण्याचे स्वातंत्र्य हेच तर खरे स्वातंत्र्य असते. हा देश स्वतंत्र आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या संविधानामध्ये अनुस्युत असलेले व्यक्तिस्वातंत्र्य हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीला विरोध करण्याचा हक्क राष्ट्रपतींनी मुळीच नाकारलेला नाही. परंतु त्याचा मार्ग मात्र संवैधानिक चौकटीतला, शांततामय असावा आणि राष्ट्रीय संपत्तीची हानी करणारा नसावा असे त्यांना अपेक्षित आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अनुषंगाने देशाच्या अनेक भागांत हिंसाचार घडवला गेला. काही राज्यांनी खमकेपणाने त्याला तोंड दिले. दंगलग्रस्तांच्या मालमत्ता गोठवून, जप्त करून आयुष्यभर लक्षात राहील अशी सजा दिली गेली. आंदोलन आणि अराजक याच्यातील सीमारेषा पुसली जाऊ नये याचे भान अनेकदा आंदोलकांना राहात नाही आणि त्याची परिणती मग रक्तरंजित संघर्षामध्ये होत असते. अशा आंदोलनाच्या केंद्रस्थानी हिंसा असते आणि आंदोलनाच्या मूळ उद्देशांशी दुरूनही संंबंध नसलेले समाजकंटक या संधीचा गैरफायदा घेत वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेत असतात. सध्या चाललेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनातही असाच प्रकार बव्हंशी दिसून आला. या कायद्याचे स्वरूप समजून न घेता नेत्यांच्या चिथावणीवरून हिंसक निदर्शने होत राहिली. अजूनही होत आहेत. त्याचा फायदा समाजकंटकांनी घेतला आणि राष्ट्रीय संपत्तीची अपरिमित हानी केली. त्यामुळे या सार्‍या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दिलेला संदेश मननीय आहे. राष्ट्रपतींच्या संदेशात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांचा उल्लेख कुठेही आलेला नाही आणि तसा तो येणारही नाही, परंतु त्यांचे संबोधन हे विद्यमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आहे हे विसरून चालणार नाही. महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशाचे अनुसरण आजही देशाला किती आवश्यक आहे त्यावर राष्ट्रपतींच्या भाषणात भर होता. सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना घटनात्मक पद्धतींना चिकटून राहावे असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे. कोविंद यांच्या भाषणातील मुद्दे सरकारलाही कानपिचक्या देणारे आहेत. विशेषतः विरोधी पक्षांचे महत्त्व आणि गरज त्यांनी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केली आहे. लोकशाहीत सरकार आणि विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असते आणि राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबरच देशाचा समग्र विकास आणि देशवासीयांचे कल्याण यासाठी दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम करणे अपेक्षित आहे असे राष्ट्रपती म्हणाले आहेत. सध्याचे देशातील वातावरण पाहता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये न सांधली जाणारी दरी निर्माण झाल्याचे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे प्रत्ययास येते आहे. सत्ताधारी भाजपची कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा, त्यानंतर समस्त विरोधकांची भाजपविरोधी एकजूट या सार्‍यामधून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संवादाचे जे धागे असायला हवेत आणि जे देशाच्या विकासाच्या, प्रगतीच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाचे असतात, तेच तुटून गेलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी विरोधी पक्ष आणि सरकारमधील समन्वयाची जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती मौलिक आहे. देशाच्या नव्या पिढीबाबतचा आशावादही राष्ट्रपतींच्या संदेशात प्रकटलेला दिसून आला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसरशी आजची तरुण पिढी माहिती आणि आत्मविश्वासाने युक्त आहे. तिची देशाच्या मूलभूत मूल्यांशी बांधिलकी कायम आहे असा विश्वास राष्ट्रपतींनी ठामपणे व्यक्त केला आहे. सत्य आणि अहिंसा ही मूल्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भागच बनली पाहिजेत हे राष्ट्रपतींचे म्हणणे अत्यंत सयुक्तिक आहे. विधिमंडळ, प्रशासन आणि न्यायपालिका एकमेकांशी जोडलेले व निगडित आहेत, परंतु नागरिक हे प्रजासत्ताकाचे खरे संचालक असतात असेही राष्ट्रपती म्हणाले आहेत. भारतीय संविधानाने नागरिकांना अधिकार बहाल केले आहेत, त्याच बरोबर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांशी कायम जोडून राहण्यासाठी कर्तव्ये आणि जबाबदार्‍याही सांगितलेल्या आहेत. गांधींचे जीवन व मूल्ये ध्यानात ठेवली तर या घटनात्मक जबाबदार्‍यांचे निर्वहन करणे सोपे होईल असेही राष्ट्रपती म्हणाले आहेत. गांधीजींची दीडशेवी जयंती देश यंदा साजरी करीत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या भाषणामधून वारंवार आलेले त्यांचे संदर्भ पाहता आजही या देशाला राष्ट्रपित्याने दाखवून दिलेली दिशाच नवभारतासाठीची योग्य दिशा आहे हेच अधोरेखित होते आहे असे म्हणावे लागेल.