रामशास्त्री

0
123

अखेर सोमनाथदा गेले. ठायी ठायी तत्त्वांना तिलांजली देत चाललेल्या आजच्या स्वार्थी, सोईस्कर, संधिसाधू राजकारणात मुळीच न शोभणारे, आपल्या विचारधारेशी अविचल निष्ठा राखणारे, पदाची प्रतिष्ठा यत्किंचितही डागाळू नये यासाठी जागरूक राहिलेले आणि भारतीय संसदेच्या सार्वभौमत्वाचा कोणत्याही बाह्य शक्तीकडून अधिक्षेप होऊ नये यासाठी प्रसंग येताच कणखरपणे उभे राहिलेले एक आधुनिक रामशास्त्री म्हणूनच सोमनाथ चटर्जी हे नाव स्वतंत्र भारताच्या सांसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये कायम सुवर्णाक्षरांनी कोरलेले राहील. माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या तत्त्वनिष्ठेची कसोटी पाहणारा एखादा प्रसंग येत असतो. त्या कसोटीच्या प्रसंगी ती व्यक्ती कशी वागते त्यावर तिची महत्ता ठरत असते. सोमनाथ चटर्जींच्या जीवनामध्येही असे कसोटीचे क्षण आले. त्या त्या वेळी त्यांनी घेतलेली ठाम भूमिकाच या व्यक्तिमत्त्वाची उंची दाखविण्यास पुरेशी आहे. मनमोहनसिंग सरकारने अमेरिकेशी अणुकरार केला तेव्हा त्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेल्या डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेताना सरकारवर अविश्वास ठराव आणला. लोकसभेच्या सभापतीपदी असलेल्या चटर्जींनीही त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विरोधी पक्षांना साथ देत सरकारच्या विरुद्ध मतदान करावे, असा प्रचंड दबाव त्यांची संपूर्ण राजकीय वाटचाल ज्या राजकीय पक्षाच्या सावलीत झाली, त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आणला. पण आपले सभापतीपद हे पक्षातीत पद आहे आणि त्यामुळे पक्षाच्या भूमिकेशी आपण बांधिल नाही अशी ठाम भूमिका चटर्जींनी घेतली आणि पक्षादेश धुडकावला. सभापती असूनही आपल्या राजकीय पक्षासाठी उचापती करणार्‍या आजकालच्या मंडळींच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भूमिका निश्‍चित उजळून निघते. त्याची जबर किंमत त्यांना अर्थातच चुकवावी लागली. ज्या पक्षासाठी चाळीस वर्षे जिवाचे रान केले होते, त्या पक्षाच्या पॉलीट ब्यूरोने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. परंतु हा घाव सोमनाथदांनी निमूट सोसला. त्याच्या आधी २००७ च्या राष्ट्रपती निवडणुकीवेळी त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करण्याचे कॉंग्रेसने ठरवले होते. प्रत्यक्ष सोनिया गांधींचा तसा निरोप घेऊन जेडीयूचे नेते शरद यादव त्यांना भेटले होते. विशेष म्हणजे त्या प्रस्तावाला द्रमुक, बीजू जनता दल, शिरोमणी अकाली दल वगैरेंचाही पाठिंबा होता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाजपाने तोवर आपला उमेदवार जाहीरही केला नव्हता. परंतु सच्चे कॉम्रेड असलेल्या सोमनाथ चटर्जींनी यादवांना आपल्या पक्षाचे मत आजमावायला सांगितले आणि माकपच्या नव्या नेतृत्वाने त्यात खोडा घातला. अन्यथा देशाला त्यांच्या रूपाने एक उत्तम नीतिमान राष्ट्रपती लाभला असता. ज्या प्रकारे लोकसभेच्या सभापतीपदी त्यांची सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने ऐतिहासिक निवड झाली होती, त्याच प्रकारे हे राष्ट्रपतीपद त्यांना सन्मानाने मिळाले असते. सोमनाथ चटर्जी लोकसभेचे सभापती झाले तेव्हा ते स्वतः एक तत्त्वनिष्ठ डाव्या विचारसरणीचे नेते असूनही त्यांच्यासाठी एकीकडे कॉंग्रेस, दुसरीकडे भाजपा, अशा सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. एखाद्या सांसदपटूच्या आयुष्यात याहून गौरवाची बाब ती काय असेल? सभापतीपदाचा त्यांचा कार्यकाळ हा त्या सदनाची प्रतिष्ठा वाढवणारा काळ ठरला. हसतखेळत, कधी चिडत, संतापत, परंतु विलक्षण निष्पक्षतेने सोमनाथ चटर्जींनी तो काळ गाजवला. त्यांचा तो गुबगुबीत चेहरा आजही नजरेसमोरून हटता हटत नाही. संसदेचे कामकाज पारदर्शीपणे व्हावे यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय असो, सदस्यांना मिळणार्‍या अनावश्यक सवलती काढून घेणारे पाऊल असो, विदेश दौर्‍यांमध्ये कुटुंबियांचा खर्च सदस्यांनी स्वतःच्या खिशातूनच केला पाहिजे याबाबतचा त्यांचा आग्रह असो, अनेक धाडसी निर्णय त्यांनी या कार्यकाळात घेतले. छोट्या छोट्या पक्षांच्या सदस्यांना त्यांनी सदनात त्यांचे विचार मांडण्याची संधी दिली. झारखंड विधानसभेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हस्तक्षेप केला, तेव्हा त्यांनी घेतलेली भूमिका ही सांसदीय लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे आणि न्यायव्यवस्था त्यावर कुरघोडी करू शकत नाही, या त्यांच्या भूमिकेचाच परिपाक होती. भाजपाने त्यांच्याविरुद्ध तेव्हा रान उठवले, परंतु त्यामुळे त्यांच्याविषयीचा त्या पक्षाच्या नेत्यांचा आदर तीळमात्र कमी झाला नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे. अटलबिहारी वाजपेयींपासून सर्वांना त्यांच्याविषयी ममत्व होते, प्रेमच होते. त्यांच्याप्रतीची सर्वपक्षीय नेत्यांमधील आदराची भावना ही केवळ ते दहा वेळा खासदार झाले या ज्येष्ठतेपोटी नव्हती. तो त्यांच्या साध्या, निष्पक्ष, निःस्वार्थ, मोकळ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होता. पक्षाने हकालपट्टी करूनही त्याविषयी चकार अनुद्गार न काढणार्‍या सोमनाथदांच्या मनामध्ये मात्र ते शल्य शेवटपर्यंत होते. क्वचित त्यांनी ते बोलूनही दाखवले. हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या निर्मलकुमार चटर्जी ह्या हिंदुत्ववादी पित्याच्या पोटी जन्मलेला, परंतु मार्क्सवादाच्या वाटेवरून आयुष्यभर चाललेला मोडेन पण वाकणार नाही बाण्याचा हा आधुनिक रामशास्त्री आता आपल्यात नाही. त्यांच्या उंचीची, तोलामोलाची माणसेही आज दुर्मीळ झाली आहेत.