रामरक्षा ः एक अद्वितीय स्तवन

0
1369

भाग्यश्री केदार कुलकर्णी (पर्वरी गोवा)

रामरक्षा हे स्तोत्र आहे की मंत्र? असा प्रश्न बर्‍याच लोकांना पडतो. तर सर्वप्रथम रामरक्षा हे अद्वितीय स्तुती/स्तोत्र/स्तवन आहे. अभेद्य कवच आणि महामंत्रदेखील आहे. कारण ते सगळ्याच दृष्टीने आपले रक्षण
करते. म्हणून त्याला गर्भकल्याणमंत्रदेखील संबोधतात.

तसं पाहिलं तर याचक आणि दानी यांचं नातं फार दुर्मिळ असे आहे. असं म्हणतात याचक हा चातकासारखा असावा आणि दानी हा मेघासारखा असावा. परंतु दान करतानादेखील सत्पात्री दान करण्याला विशेष महत्व आहे. त्यात सर्व प्रथम पाने, फुले, झाडे हे येतात नंतर पशुपक्षी आणि मग प्राणिमात्र येतात. म्हणजे मनुष्याचा क्रमांक सर्वात शेवटी येतो. त्यामुळे या चातकापरी जर काही अनुभूती मिळवण्यासाठी आपण आर्तता बाळगली तर रामराय रामरक्षारूपी मेघातून नक्कीच मनोकामनेचा वर्षाव करतात. म्हणून जाज्वल्य असे रामरक्षेचे महत्व आज आपण पाहणार आहोत.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्तोत्रे, मंत्रोच्चार या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या लहानपणापासून वडिलधारांकडून या स्तोत्रांचे बाळकडू नेहमीच प्रत्येकाला मिळत असते. त्यात रामरक्षा हे स्तोत्र अग्रस्थानी आहे. ढोबळमानाने रामरक्षेचे महत्व आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण काहीवेळेला आपण, आपले आईवडील म्हणतात म्हणून किंवा पूर्वीच्या लोकांनी घालून दिलेली सवय/नित्यनियम म्हणून हे म्हणायचे असे भासते. केवळ भीतीपोटी हे म्हणायचे वा भगवंताला भजायचे हे काही बरोबर वाटत नाही.

पण या स्तोत्रांचा मथितार्थ फार उदात्त आहे हे अभ्यास केल्यावर कळते. कारण काहीवेळेला मुलं म्हणतात आम्ही रोज म्हणतो पण परिणाम तर दिसत नाही अथवा का हे म्हणावयाचे? ही जिज्ञासा जेव्हा जन्म घेते तेव्हा याची सखोल परिपूर्ती करणं मला आवश्यक वाटते. कारण आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगात याची कारणं, गरज जाणून घेणे हे कायम फायद्याचेच ठरेल.
आज हा रामरक्षेच्या अभ्यास, विचारांचे अफाट तत्वज्ञान किंवा पसारा तुमच्यासमोर मांडायचा मी जो काही घाट घातला आहे तो निश्चितच काही प्रवचने, काही अध्यात्मिक ग्रंथाचा आधार घेऊनच घातला आहे. एवढंच की त्यात, प्रत्येक पैलू दाखवण्याचा उद्देश आहे. रामरक्षेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास आहे आणि हे महत्कार्य माझ्याकडून घडविण्याची भगवंताची उदात्त इच्छा व माझी प्रामाणिक सेवा या पाठीमागील पार्श्वभूमी आहे आणि मी फक्त निमित्तमात्र आहे असे मला वाटते.
रामरक्षा हे स्तोत्र आहे की मंत्र? असा प्रश्न बर्‍याच लोकांना पडतो. तर सर्वप्रथम रामरक्षा हे अद्वितीय स्तुती/स्तोत्र/स्तवन आहे. अभेद्य कवच आणि महामंत्रदेखील आहे. कारण ते सगळ्याच दृष्टीने आपले रक्षण
करते. म्हणून त्याला गर्भकल्याणमंत्रदेखील संबोधतात. सर्वसामान्यपणे या स्तोत्रात ‘र’ चा उच्चार खूप वेळा येतो त्यामुळे लहान मुलांना वाणी शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी याचा लाभ होतो. तिन्ही सांजेच्यावेळी जर हे स्तोत्र म्हटले तर सकारात्मक उर्जेच्या लहरी घराभोवती एक कुंपण किंवा कवच निर्माण करतात जेणेकरून बाहेरील नकारात्मक ऊर्जा, विघ्न, बाधा याला आळा बसतो. कारण संध्याकाळच्या वेळी सात्विक वृत्ती कमी होऊन तामस वृत्तींचा प्रभाव व दुष्ट शक्तींचा प्रभाव वाढू लागतो. म्हणून ही आराधना संध्याकाळी करावी. यशस्वी, प्रभावी जीवन जगायचे असेल तर सळसळते चैतन्य, शक्तीचा स्त्रोत असलेली ही रामरक्षा अर्थ लक्षात घेऊन म्हटली तर आरोग्यसंपन्न, ऐश्वर्यसंपन्न व आत्मविश्वास पूर्ण आयुष्याचा लाभ होतो.

आता हे स्तोत्र कोणी, कसे आणि का रचले ? याचे निरूपण खालील श्लोकात स्पष्ट होते.

चरितं रघुनाथस्य शतकोटीप्रविस्तरं
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं
श्रीगणेशाय नमः अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य
बुधकौशिकऋषीः श्री सीतारामचंन्द्रो देवता
वरील दोन श्लोकांचा अर्थ गोष्टरूपी आहे. वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र किंवा रामसार हे सहस्त्र कोटी श्लोकांमधे बद्ध केले. तेव्हा देव, दानव आणि माणूस यांना ते अद्वितीय वैभव असलेले श्लोक प्राप्त करण्यासाठी मोह झाला व त्या श्लोकांचे समान वाटप व्हावे अशी मनीषा त्यांनी देवता श्रीशंकर यांना बोलून दाखवली. तेव्हा ते सर्व श्लोकांचे समान वाटप झाले.आता अगदी एक श्लोक उरला तो ३२ शब्दांमधे म्हणजे अनुष्टुप छंदामधे होता.

त्यामुळे परत ३० अक्षरं वाटली गेली. आता फक्त दोनंच शब्द उरले तो म्हणजे ’राम’ आणि तो त्यांनी स्वतःजवळ ठेवला आणि बाकी सगळे निघून गेले. परंतु बुधकौशिक ऋषींना मात्र चैन पडेना. त्यांना कळाले की, मूळ गाभा, आत्मा, चैतन्य शंकरांजवळ राहिले आहे. त्यांना या वैभवाची, चैतन्याची अनुभूती हवीच होती. त्यामुळे ते ध्यानस्थ बसले. ती आर्तता भगवान शंकराला जाणवली व त्यांनी रामरक्षा स्वप्नात येऊन सांगितली आणि बुधकौशिक ऋषींनी ती रामरक्षा रूपात लिहून काढली.
असे हे कोटी श्लोकातील एक एक अक्षर मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करते.

अनुष्टुप छन्दः सीताशक्तीः श्रीमद्भनुमान किलकम्
श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः
हनुमान ज्याचा प्रत्येक श्वास हे ’श्रीराम’ आहेत. त्यामुळे त्या हनुमंताचे स्मरण केल्याशिवाय तो राम प्राप्त करणे अशक्य आहे. म्हणूनच त्याला रामचंद्ररूपी खजिन्याची किल्ली असे संबोधले आहे. आदीशक्ती सीता म्हणजे प्रकृती आणि राम म्हणजे पुरूष असा ’प्रकृतीपुरूषा’चा मिलाप झाल्याशिवाय कुठलंच कार्य पार पडू शकत नाही म्हणून सीताशक्तीः

अथ ध्यानम्
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
पीतंवासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम
वामाड्कारूढसीतामुखकमलमिल्ललोचनं नीरदाभं
नानालड्कारदिप्तं दधतमुरजटामंण्डनं रामचंद्रम
या श्लोकात चार ध्यानावस्था सांगितल्या आहेत.
ज्यांना युद्धात विजय प्राप्त करायचाय म्हणजे रोजच्या जीवनातील मोठ्या संकटांवर मात करायचीय, त्यांनी ज्याचे अजानुबाहु आहेत ज्याच्या हातात धनुष्यबाण आहे. असं रूप डोळ्यासमोर आणून ध्यान करावं व पुढील रामरक्षा म्हणावी. नंतर जो पद्मासन घालून पितांबर नेसला आहे. ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे पाणिदार आहेत. ज्याला योगसामर्थ्यवान व्हायचे आहे त्याने हे रूप ध्यानात ठेवून ध्यान करावे. ज्याच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे. जे सीतेकडे डोळे लावून बसले आहेत. ज्यांची कांती गडद श्यामवर्ण आहे. विवाहेच्छुकांनी किंवा आपला संसार सुरळितपणे चालावा यासाठी असे हे ध्यान डोळ्यात साठवून उर्वरित श्लोक म्हणावेत. ज्याने जटा बांधून संन्यासी वृत्ती अवलंबविली आहे असे ध्यान साठवून ज्यांना नाना अलंकार, धनलक्ष्मी यांची आवश्यकता आहे त्यांनी उर्वरित रामरक्षा म्हणावी.

सर्वप्रथम तर हे एक गर्भकल्याणमंत्र आहे कारण जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तीच्या मनात आपल्या येणार्‍या अपत्याविषयी असंख्य प्रकारच्या कल्पना असतात. तेव्हा ते मूल कसं जन्माला यावं आणि या मुलाबाळांनी भरलेल्या घराचं संरक्षण कसं करायचं तर हे पाच श्लोक हे संरक्षण दर्शवतात. ह्या पाच श्लोकातील शब्द शरीरातील अवयवांशी निगडित आहेत. आपण जर एक एक अवयवाला हात लावून अतिशय श्रद्धेने हे श्लोक म्हटले तर निश्चितच त्याचा प्रत्यय येतो.

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्भजः
कौसल्येयौ दृशौ पातु विश्वमित्रः प्रियःश्रृती
घ्राणंपातुमखंत्राता मुखं सौमित्र वत्सलः
जिड्वांनिधिपातु कंण्ठं भरतवंन्दितः
स्कन्धौदिव्यायुधः पातु भुजौभग्नेशकार्मुकः
करौ सीतापतीः पातु ह्रदयं जामदग्न्‌यजित
मध्यं पातु खरंध्वंसी नाभीं जाम्बवदाश्रयः
सुग्रीवेशःकटिपातु सक्थिनी हनुम्तप्रभुः
उरूरघुत्तमः पातु जङ्‌गेदशमुखान्तकः
पादौबिभिषणश्रीदः पातुरामोखिलं वपुः
याचे निरूपण पुढीलप्रमाणे आहे. प्राचीन योगशास्त्रात आपल्या शरीरात कमरेपासून डोक्यापर्यंत सात चक्रे सांगितली आहेत. १) मुलाधार २) स्वाधिष्ठान ३) मणिपूर ४) अनाहत ५) विशुद्ध ६) आज्ञा व ७) सहस्त्रार. या सात चक्रांवर आपली शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. तर आता रामरक्षेचा याच्याशी कसा संबंध येतो ते आपण पाहूया.

आता आधुनिक वैद्यक शास्त्रात काही नलिकाविरहित ग्रंथी आहेत. त्यांना अंतःस्त्रावी ग्रंथी म्हणजे, एपवेलीळपश ॠश्ररपवी म्हणतात. त्या अशा १) पिनिअल २) पिट्युटरी ३) थायरॉईड व हायपोथायरॉईड ४) थायमस ५) पॅनक्रियाज ६) ऍड्रेनल व ७) गोनाड्स. त्यांच्यात तयार होणारी संप्रेरके अथवा हार्मोन्स ही सरळ रक्तात मिसळतात. म्हणून या ग्रंथी जर अकार्यक्षम झाल्या तर त्याचे फार वाईट परिणाम होतात हे वैद्यकशास्त्रालाही माहीत आहे. वैद्यकीय शास्त्रातील या नलिकाविरहित ग्रंथींचा आणि योग शास्त्रातील चक्रे यांच्या शरीरातील स्थानात साधर्म्य कसे आहे शिवाय बुधकौशिक ऋषींची रामरक्षा कशी या सर्वांशी निगडित आहे ते आपण बघूयात.
रामरक्षेच्या ३८ श्लोकांपैकी वरील ५ श्लोक म्हणजे ५-९ विशेष आहेत. ‘रामरक्षां पठेत….पासून पादौ बिभीषण श्रीदः’ पर्यंतच्या श्लोकांना ‘रामरक्षा कवच’ असे संबोधतात. कवच म्हणजे जी आपले सर्व संकटांपासून आणि शारीरिक मानसिक भीतीपासून रक्षण करते. या कवचाचे पठण नलिकाविरहित ग्रंथी आणि षटचक्रे जागृत करून व अधिक कार्यक्षम बनवतात. हे पाच श्लोक शरीरातील अवयवांना हात लाऊन म्हणावे. याच्याशिवाय प्रत्येक श्लोकात श्रीरामचंद्रांच्या जीवनातील प्रसंग व व्यक्ती सूचित होतात. त्यामुळे हे कवच वाचतांना प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवनचरित्रच डोळ्यासमोर उभे राहते. जेणेकरून रामायणातील ठळक विषयांचे चिंतन आपोआपच घडते.

सहस्त्रार – टाळू – पिनिअल – शिरो मे राघवः पातु
आज्ञा – भ्रूमध्य – पिट्यूटरी – कौसल्येयो दृशौ पातु
विशुद्ध – गळा – थायरॉईड – कण्ठं भरतवन्दितः
अनाहत – ह्रदय – थायमस – ह्रदयं जामदग्नजित्
मणिपूर – छाती व पोटाचा मध्यभाग – पॅनक्रियाज – मध्यं पातु खरध्वंसी
स्वाधिष्ठान – बेंबी – ऍड्रेनल – नाभिं जाम्बवदाश्रयः
मूलाधार – कंबर – गोनाड्स – सुग्रीवेशः कटी पातु

‘शिरो मे राघवः पातु’ म्हणताना हात डोक्यावर ठेवून राघव शब्दाने आज्ञाचक्र उद्दीपित करत आहोत असे समजावे. आता राघव म्हणजे रघुवंशातील या राजाने कौत्स्य नावाच्या ब्राह्मण पुत्राची गुरूदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केलेला खटाटोप. कुठल्याही याचकाला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही हे त्याचे व्रत.
कौत्स्य पुत्राला आपले गुरूजी नाही म्हणत असले तरी त्यांना तेरा कोटी सुवर्णमुद्रांची गुरूदक्षिणा द्यायचीच होती त्यामुळे तो राघव राजाकडे गेला पण खूप यज्ञयागामुळे त्याचा खजिना संपत आला होता. त्यामुळे तो तिथून तसाच परत निघाला असता त्याला राघवाने रोखले आणि आता कुबेरावर स्वारी करायचे असे ठरवले. ही बातमी कुबेराला कळताच त्याने सकाळी राघवाच्या दारात सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. व अशाप्रकारे त्याची इच्छा पूर्ण झाली. अशा पूर्वजांच्या सद्विचारांचे चिंतन करून प्रभूश्रीरामचंद्र वर्तन करीत असत. म्हणून शिरो मे राघवः पातु…असे शीर मला प्रदान कर ही प्रार्थना.

आता ‘भालं दशरथात्मजः’ म्हणताना कपाळावर हात ठेवावा. दशरथ म्हणजे दहा कर्मेंद्रिये व दहा ज्ञानेंद्रियांचा रथ त्याचा आत्मज म्हणजे श्रीरामचंद्र माझ्या कपाळाचे रक्षण करोत.
’कौसल्येयो दृशौ पातु’ म्हणतांना डोळ्यावर हात ठेवावा. रामचंद्रांना सीता सोडल्याखेरीज सगळ्या स्त्रीया कौसल्या मातेप्रमाणे दिसत. आणि कौसल्या मातेचे दोन चक्षू बुद्धी व आत्मबल यांनी युक्त आपल्या पुत्रांकडे बघत असत. रामायणातील एक गोष्ट इथे सांगते. एकदा मंदोदरी रावणाला म्हणाली तुम्हाला सर्व मायावी सिद्धी प्राप्त आहेत मग तुम्ही रामाचे रूप घेऊन सीतेला का नाही पळवत? त्यावर रावण म्हणाला रामाचे रूप मी घेईन पण एकदा का मी रामराय झालो तर मला तुझ्याशिवाय सगळ्या स्त्रीया या कौसल्येप्रमाणे दिसतील. अशी ती रामाची दृष्टी मज प्राप्त होवो.

‘विश्वमित्रः प्रियः श्रुती’ म्हणताना कानाला हात लावून म्हणावे. एकदा दशरथ राजाकडून यज्ञाचे संरक्षण करण्यासाठी विश्वामित्र रामलक्ष्मणांना आपल्याबरोबर घेऊन गेले असता विश्वामित्रांनी जे काही वेदशास्त्राचे ज्ञान दिले ते सर्व कानांनी श्रवण करून आत्मसात केले. असे श्रवणशक्ती मला प्रदान करोत.
‘घ्राणं पातु मखत्राता’ म्हणतांना नाकावर हात ठेवावा. घ्राण म्हणजे नाक, मख त्राता म्हणजे यज्ञाचे रक्षण करणारा प्रभुरामचंद्र. यज्ञात दिलेल्या तुपाच्या, चंदनाच्या आहुतीने वातावरण शुद्ध होते यासाठी मी यज्ञ करीन. गणेशयाग, दत्तयाग करीन जेणेकरून मला शुद्ध हवा मिळेल याचे भान रहावे म्हणून हा श्लोक.
‘मुखं सौमित्रिवत्सलः’ म्हणताना तोंडावर हात ठेवावा. ‘जिव्हां विद्यानिधीः पातु’ म्हणतांना जीभेवर हात आहे अशी कल्पना करावी. ‘कण्ठंभरतवंदितः’ म्हणताना गळ्यावर, ’स्कन्धौ दिव्यायुधः पातु’ म्हणताना खांद्यावर हात ठेवावा.

‘भुजौभग्नेश कार्मुकः’ म्हणताना भुज म्हणजे दंडांवर लक्ष द्यावे. कार्मुक म्हणजे धनुष्य आणि भग्नेश म्हणजे भंग पावणे. ज्या रामरायाने शिवधनुष्य स्वतःच्या बाहुंमधील बलाने, आत्मबलाने नुसते उचललेच नाही तर कडकड मोडलेदेखील. असे बल असणारा रामराय माझ्या बाहुंचे रक्षण करो व ‘करौसीतापतीः पातु ’ म्हणताना हातांकडे लक्ष द्यावे. एकदा लग्न झाल्यावर श्रीरामांनी सीतेला कधीही अंतर दिले नाही. जी सीता त्यांच्यापासून दूर गेली ती सूक्ष्मरूपाने गेली खरी सीता त्यांच्या समवेतच होती आणि जी अग्नीत विलीन झाली तो अग्नी म्हणजेच प्रभुश्रीराम होत. त्यामुळे असे कर ज्याचे आहेत तो माझ्या हातांचे रक्षण करोत.

‘ह्रदयं जामदग्न्‌यजित’ म्हणताना ह्रदय म्हणजे अनाहत चक्राचे संरक्षण करण्याची प्रार्थना करावी. ‘मध्यं पातु खरंध्वंसी’ म्हणताना छाती व पोट यांच्या मध्यभागी हात ठेवावा. ‘नाभीं जाम्बवदाश्रयः’ म्हणताना बेंबीवर तर ‘सुग्रीवेशः कटी पातु ’ म्हणताना कंबरेवर हात ठेवावा. ‘जानुनी सेतकृत् पातु’ म्हणताना गुडघ्यांवर, ‘जड्घे दशमुखान्तकः’ म्हणतांना पोटर्‍यांवर व ‘पादौ बिभिषणःश्रीदः’ म्हणताना पावलांवर हात ठेवावा. ‘पातु रामोखिलंवपुः’ म्हणताना सर्व शरीराचे राम रक्षण करो अशी प्रार्थना करावी.
अशाप्रकारे प्रत्येक अवयवांचे श्रीरामचंद्रांच्या आयुष्यात
आलेले प्रसंग व गुणवर्णनाकडे लक्ष देऊन ते माझ्याकडे संक्रमित होताहेत. असा विचार करून ही रामरक्षा म्हणावी.

राभरक्षा हा मंत्रांचा संग्रह
राभरक्षा हा मंत्रांचा संग्रह आहे. त्यातल्या काहींचा बोध आपण आता पुढे घेऊया.
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्
लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयोनमाम्यहं
आता या श्लोकाचे फार अलौकिक असे महत्व आहे.
अर्थ- माझी सर्व संकटे दूर होऊ देत व मला सुखसंपदा लाभू दे. अशा सर्व आपत्तींचा नाश करणार्‍या श्रीरामाला मी पुनःपुन्हा वंदन करतो. एक डॉक्टर होते. त्यांची शुगर लेव्हल काही केल्या कमी होईना. खूप उपचार केले शेवटी त्यांनी हे रामरायावर सोपवून दिले व रोज तीन लिटर पाणी याप्रमाणे ५/७ पाण्याने भरलेल्या प्रत्येक ग्लासावर हात ठेवून हा श्लोक म्हणायचे आणि प्यायचे. अशाप्रकारे कुठल्याही वैद्यकीय उपचाराने नाही तर रामरायाच्या या श्लोकामुळे त्यांचा डायाबिटीस पूर्ण बरा झाला. म्हणजे रामरक्षा ही शारीरिक, मानसिक दृष्ट्‌या कसे तत्क्षणी रक्षण करते. खरोखर हा अदभुत अनुभव आहे. प्रत्येक घरातल्या गृहिणीने जर मनापासून श्रद्धेने हा श्लोक जर १३ वेळा सकाळ संध्याकाळ म्हटला तर निश्चितच घरातील सगळ्याप्रकारचे विकार दूर होतील यात शंकाच नाही.

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्
तर्जनं यमदुतानां राम रामेती गर्जनम्
भर्जनं, अर्जनं, तर्जनं, गर्जनं ही गेयता असलेला हा श्लोक आहे. सगळी कर्मबीजे रामनामाच्या भट्टीमध्ये भाजून टाका म्हणजे त्याचे शेपूट भविष्यात वळवळत राहणार नाही आणि सुखसंपदा आपोआप आपल्याजवळ येईल व यमदूतांचा नाश होईल. जेव्हा आपण गर्जना करून रामरामेति म्हणतो, म्हणजे जसं जळालेलं बीज परत जमिनीत रोवलं तर त्याला अंकुर फुटत नाहीत तसंच प्रत्येक कर्म हे रामाच्या स्मरणात करून त्यालाच अर्पण करून हा प्रारब्धाचा किंवा जन्ममरणाचा फेराच संपवायचाय. म्हणून कुठल्याही धार्मिक स्थळी आपल्याला नेहमी भाजलेल्या गोष्टींचाच प्रसाद मिळतो. उदा. लाह्या, फुटाणे किंवा रक्षा हीदेखील त्याचेच प्रतीक आहे. केवढा मोठा व्यापक असा आशय आणि तत्वज्ञान सांगितले आहे या श्लोकात.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां
अभिरामस्त्रीलोकानां रामःश्रीमानसःनौभौ
कल्पवृक्ष म्हणजे मनोकामना पूर्ण करणारे वृक्ष. आणि प्रभू श्रीरामचंद्र हे कल्पवृक्षाचा बगीचा आहेत. तिन्ही लोकांमधे सुंदर, रूपसंपन्न असा स्वामी माझे रामराय आहेत.

तरूणौरूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ
पुण्डरिकविशिलाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ
फलमूलाशिनौदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ
पुत्रौदशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ
या दोन श्लोकांमध्ये वनवासी रामलक्ष्मणाचे वर्णन केले आहे. हे तरूण, रूपवान आणि तपश्चर्या म्हणजे तापस वृत्तीने जगताहेत. त्यांच्या रूपाचे इतके अलौकिक सौंदर्य आहे की, वाटेत भेटणारे अनेक वर्षांपासून तप करणारे, उच्चतम अवस्था असणारे योगीदेखील त्यांच्या रूपावर भाळले आहेत व आमचा प्रेयसी म्हणून स्वीकार कर असा आग्रह धरत आहेत. तेव्हा रामचंद्र त्यांचे सांत्वन करतात की, मी मर्यादा पुरूषोत्तम आहे. तरीही मी तुमची ही इच्छा नक्कीच वेळ आल्यावर पूर्ण करीन. म्हणूनच तर पुढच्या युगात श्रीकृष्णाच्या गोपींच्या रूपात या योग्यांना स्थान मिळाले व त्यांना कैवल्यपद प्राप्त झाले.

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषड्गसड्गिनौ
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम
आतः म्हणजे घेतलेले, सज्ज म्हणजे सज्ज असलेले, धनुष-इषुः-स्पर्षौ म्हणजे ज्याचे बाण धनुष्याला स्पर्श करून तयार आहेत. अक्षया म्हणजे कधीही न संपणारे, आषुग म्हणजे तीव्र वेगाने, निषंग म्हणजे भात्यात, संगिनौ म्हणजे सतत जवळ असणारे. भात्यातील कधीही न संपणारे.. सतत जवळ असणारे..तीव्र असे बाण ज्यांच्याजवळ आहेत असे रामलक्ष्मण सदा माझे मार्गदर्शक राहोत…अशा लडिवाळ हक्काने म्हणणे म्हणजे याला सख्यभक्ती असे म्हणतात.

सन्नध्दः कवची खड्गी चापबाणधरो युवा
गच्छन् मनोरथस्माकं रामः पातु सलक्ष्मणः
सन्नद्ध म्हणजे सज्ज, खड्ग म्हणजे धारदार असा कोदंडरूपी बाण कधीच विफल जात नाही. आपलं मन कधी स्वधर्माचरण करण्यासाठी सज्जच नसतं असं ते मन षड्रिपूंवर ताबा आणण्याचा मनोनिग्रह होऊ दे ..मन घट्ट होऊ दे अशी प्रार्थनाच जणू या श्लोकात आहे. अयोध्या ते लंकेपर्यंतचा प्रवास रामचंद्रांनी पायी केला …इंद्र देवाने देऊ केलेल्या रथाला सभार वापस पाठवत अरथ राहून असे पुढे चालत राहिले. रामः पातु सलक्ष्मणः याचा व्यावहारीक अर्थ लक्ष्मणासह पण गूढार्थ बघितला तर लक्ष्मण म्हणजे सुचिन्हयुक्त, दैवशाली, ऐश्वर्याचे प्रतीक असा आहे. त्यामुळे ईश्वर व ऐश्वर्याचे प्रतीक अशा या जोडीचे स्मरण माझा मनोनिग्रह बळकट होण्यासाठी करतो अशी प्रार्थना.

वेदान्त वेद्यो यज्ञेशः पुराणपुरूषोत्तमः
जानकीवल्लभ श्रीमानप्रमेयपयाक्रमः
पुराण म्हणजे प्राचीन… पुरूषांमधला सर्वश्रेष्ठ पुरूषोत्तम असा प्रभुरामचंद्र. जानकीचा (वल्लभ) पती. श्रीमान म्हणजे विष्णू. अप्रमेय म्हणजे ज्याला परिमाणंच नाही, सीमाच नाही असा.

रामंदुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः
दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा, कमलनेत्र आणि पितांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नामांनी जो मनुष्य स्तुती करेल त्याला जन्म मरणाच्या संसारातून सुटका मिळेल. तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला एका योगीसाठी जेवण बनवून त्याला द्यायला सांगितले. तो योगी इंद्रायणीच्या दुसर्‍या तटावर होता. पण ती दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी काही तिला पार करता येईना. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात. तू तिला वंदन करून तिची ओटी भर आणि सांग की, माझा नवरा ब्रह्मचारी असेल तर मला वाट करून दे आणि खरोखर असेच घडले. किती अलिप्तपणा होता तुकाराम महाराजांचा हे कळते. अशारितीने त्या राघवाचे स्मरण करताना मला भान राहत नाही. असे हा श्लोक सूचित करतो.

रामो राजमणिः सदा विजयते रामंरमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मैनमः
रामान्नास्ति परायणंपरतरं रामस्यदास्योम्यहं
रामे चित्तलयाभवतु मे भोराममामुद्धर
संपूर्ण व्याकरणातील राम या शब्दाची रूपे या श्लोकात पाहायला मिळतात. हे आलंकारिक सौंदर्य या श्लोकाचे आहे. ‘मी’ नाही ‘रामकर्ता’..‘माझं’ नाही ‘रामाचं’…‘मला’ नाही ‘रामाला’..‘माझ्यासाठी’ नाही ‘रामासाठी ’….असे म्हणत राममय..रामात विलिन होऊन जाऊया.

अशाप्रकारे ही रामरक्षा आधी आजी, आजोबा, वडिल आणि मग आईला कळली पाहिजे. मगच एक पुढची पिढी आत्मनिर्भर अशी बनणार आहे. अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथे पूर्णविराम घेते.