रामपालला २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी

0
100

न्यायालयाच्या अटक वॉरंटला न जुमानता समर्थकांच्या जोरावर कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण केलेल्या स्वयंघोषित अध्यात्मक गुरु रामपाल याला काल पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील सुनावणी आता २८ रोजीच होणार आहे.रामपाल याच्या आश्रमात शस्त्रसाठा व खंदक होते काय असे सवाल करून या संदर्भातील अहवाल पाच दिवसांच्या आत सादर करावा असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. तसेच रामपाल याच्या मालमत्तेची माहितीही सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
रामपाल याच्या विरोधात हत्याप्रकरणी वॉरंट जारी झाले होते. त्याला त्याने चारवेळी हुलकावणी दिली. तसेच गेल्या दोन आठवड्यांपासून समर्थकांना पुढे करून तो आश्रमात लपून राहिला होता. बुधवारी रात्री त्याला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
काल न्यायालयात रामपालने आपल्यातील आरोप फेटाळले. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रामपालची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.