राफेल येत आहेत!

0
172

देशाचे माजी संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी अत्यंत घासाघिशीच्या वाटाघाटींद्वारे देशाचा पैसा न् पैसा वाचविण्याचा ज्या व्यवहारात आटोकाट प्रयत्न केला, ती भारतीय हवाई दलाची शान ठरणार असलेली राफेल विमाने आज भारतात येत आहेत. तब्बल सात हजार मैलांवरून फ्रान्समधून ती भारतात यायला निघाली आहेत. वाटेत अबुधाबीत विसावली आहेत आणि आज ती पाच अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतामध्ये दिमाखात उतरणार आहेत.
राफेलचे आगमन हा भारताच्या सार्वभौमत्वावरचा एक नवा शिरपेच आहे. दक्षिण आशियामधील भारताची लष्करी ताकद कैक पटींनी वाढवणारी तर ही ऐतिहासिक घटना आहेच, परंतु सध्या लडाखमध्ये अकारण कुरापती काढत बसलेल्या चीनला यापुढे पूर्व सीमेवर कुरापत काढताना दहावेळा विचार करायला ती भाग पाडणार आहेत. बालाकोटच्या कारवाईने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले होतेच, आता राफेलच्या आगमनानंतर पाकिस्तानजवळच्या अमेरिकी एफ – १६ चा तोराही उतरेल. दक्षिण आशियातील संरक्षणविषयक समीकरणे उलटीपालटी करून टाकत राफेल भारतात येत आहेत.
राफेलवरून केवढे राजकारण देशात रंगले! राहुल गांधींची ‘चौकीदार चोर है’ मोहीम तर राफेल व्यवहारावरच पूर्णतः बेतलेली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्या व्यवहाराला क्लीन चिट दिली आणि राहुल यांच्या या मोहिमेचेही ओम् फस्‌‌ झाले. पुन्हा त्यांनी ती घोषणा कधी उच्चारलेलीही दिसली नाही. उलट आता राफेल विमाने भारतात येत आहेत म्हटल्यावर कॉंग्रेसचे नेतृत्व त्याचे स्वागत करायला पुढे सरसावल्याचे दिसते आहे. राफेलचा खरेदी व्यवहार मुळात आमच्या यूपीए सरकारने सुरू केला होता असे आता पी. चिदंबरादी कॉंग्रेसी धुरीण सांगू लागले आहेत. श्रेय उपटण्यासाठी ही धडपड आहे. बोफोर्स तोफा भारताच्या हाती आल्या तेव्हाही त्याच्या खरेदी व्यवहारासंदर्भामध्ये मोठा गदारोळ झाला होता, परंतु शेवटी कारगिलच्या युद्धामध्ये त्यांनी बजावलेली निर्णायक कामगिरी लक्षात घेऊन, संरक्षणमंत्री बनलेल्या पर्रीकरांनी, खरेदी व्यवहाराबाबतचे सत्य काहीही असो, बोफोर्स तोफा मात्र लाजवाब आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती, त्याची येथे आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
पर्रीकर यांच्या आजारपणात ख्यालीखुशाली विचारण्यासाठी आकस्मिकरीत्या गेलेल्या राहुल गांधींनी दुसर्‍याच दिवशी कर्नाटकातील बळ्ळारीच्या प्रचारसभेमध्ये राफेलची गुपिते पर्रीकरांच्या शयनकक्षात असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे विधान करून अशिष्टपणाची परिसीमा गाठली होती. त्या कटु स्मृतीही राफेल भारताच्या वाटेवर असताना आज जाग्या झाल्या आहेत. कारगिलच्या वेळी आपल्याकडे राफेल असती तर कारगिलचे युद्ध सहा दिवसांत संपवता आले असते असे मध्यंतरी भाजपचे एक नेते उद्गारले होते.
पर्रीकर यांच्या निधनानंतरच्या बदललेल्या व्यवहाराचा तपशील देशाला ज्ञात नाही, परंतु पर्रीकरांनी स्वतःच्या हयातीत फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांशी वाटाघाटी करताना त्यामध्ये कमालीची घासाघीस करून अनेक नवी कलमे घालण्यास फ्रान्सला भाग पाडले होते हे सर्वविदित आहे. तेव्हा या वाटाघाटी एवढ्या कसोशीने चालल्या होत्या की एक क्षण असाही आला की आता हा व्यवहार पुढे सरकणार नाही इथपर्यंत येऊन ठेपला होता. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौर्‍यावर गेले असता ३६ राफेल विमानांचा हा खरेदी व्यवहार थेट दोन सरकारांदरम्यान करायचे ठरले आणि हे अडलेले घोडे पुढे सरकले होते.
३६ राफेल विमाने म्हणजे भारतीय हवाई दलाच्या प्रत्येकी अठरा विमानांच्या दोन स्क्वॉड्रन त्यांनी सुसज्ज होणार आहेत. यातील केवळ पाच विमाने पहिल्या टप्प्यात दाखल होत असली, तरी एका अर्थी भारताची ती स्वप्नपूर्ती आहे. गेली पंधरा वर्षे देश या अत्याधुनिक लढाऊ विमानांची वाट पाहतो आहे. २०२२ पर्यंत ही सर्वच्या सर्व विमाने भारताच्या हवाली होणार आहेत आणि सध्या कोरोनाचा कहर जगभरात असला तरीही ही विमाने करारानुसार ‘फ्लाय अवे कंडिशन’ मध्ये भारतात दाखल होत आहेत. कोणे एके काळी ‘मिग’ ची जागा ‘सुखोई ३०’ विमानांनी घेतली होती तेव्हा भारतीय हवाई दलाची ताकद जशी अनेक पटींनी वाढली, तशीच अत्याधुनिक राफेलमुळे ही ताकद शतपटीने वाढणार आहे. त्यातील क्षेपणास्त्रे शत्रूच्या उरात निश्‍चितच धडकी भरवणार आहेत!