रान मोकळे

0
92

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून गेले कित्येक दिवस चाललेली नौटंकी अखेर संपली. एकीकडे शिवसेना – भाजप आणि दुसरीकडे राष्ट्रवादी – कॉंग्रेस यांनी काडीमोड घेतला. आता प्रत्येकजण ‘स्वबळा’ वर निवडणूक लढवायला म्हणजे खरे तर एकमेकांच्या पायांत पाय अडकवण्यास मोकळा झाला आहे. विद्यमान परिस्थितीत होणार असलेल्या बहुरंगी लढतींतून येणारे निकाल कसे असतील हे सांगणे कठीण ठरेल. बहुतेक ठिकाणी मतविभाजन आता अटळ असल्याने मतांचे पारडे कुठल्याकुठे जाऊ शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेनेने एकत्र निवडणूक लढली, त्याचा भरघोस फायदा मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची दाणादाण उडाली. त्यामुळे यावेळीही महायुतीद्वारे ही निवडणूक लढली गेली असती, तर २८८ जागांपैकी बहुसंख्य जागा हस्तगत करण्याची मोठी संधी या पक्षांना होती, जी त्यांनी आता गमावली आहे. गेल्या पंचवीस वर्षांची सेना – भाजपाची युती का तुटली? ती केवळ एकमेकांसाठी सोडलेल्या जागांच्या संख्येमुळे तुटलेली नाही. दोन्ही पक्षांनी एकीकडे एकत्र लढण्याची बात करीत असतानाच, दुसरीकडे पडद्याआडून एकमेकांचा घोडा कह्यात ठेवण्याचा जो प्रयत्न चालवला होता आणि त्याचे जे डावपेच लढवले जात होते, त्यामुळेच खरे तर ही युती तुटली. भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास गेल्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना मोडीत काढून स्वतःचे भगवे साम्राज्य देशभर पसरवण्याची स्वप्ने भाजप पाहू लागला आहे. गोव्यामध्ये भाजपाने मगोला कसे संपवले तो इतिहास गोवेकरांना ज्ञात आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेची स्थिती बाळासाहेबांच्या निधनानंतर पूर्वीसारखी उरलेली नाही हे दिसत असल्याने तिचा मतदार आपल्याकडे खेचण्यात भाजपला विलक्षण रस आहे. उद्धव ठाकरेंनाही हे पुरेपूर ठाऊक आहे. त्यामुळे भाजपाला त्यांच्या अपेक्षेएवढ्या जागा नाकारण्यापासून मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःची म्हणजे शिवसेनेची दावेदारी जाहीर करण्यापर्यंत अनेक प्रकारे भाजपाला नमवण्याचा प्रयत्न शिवसेनेने सतत केला. दुसरीकडे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांचा आत्मविश्वास तर गेल्या काही निवडणुकांतील चढत्या भाजणीच्या यशामुळे वाढलेलाच आहे. त्यात सेनाही पूर्वीची उरलेली नसल्याने आपण शिरजोर होण्यासाठी कमालीची आग्रही भूमिका भाजपने यावेळी धरली. त्याची परिणती अर्थातच युती तुटण्यात झाली. मात्र, ही युती तोडत असताना महायुतीतील इतर छोट्या घटक पक्षांशी आपले संबंध बिघडणार नाहीत याची पुरेपूर दक्षता भाजपने घेतली आहे. त्याचा या निवडणुकीत त्यांना कितपत फायदा मिळतो हे पाहावे लागले. सेना – भाजपा युती तुटण्याचे संकेत मिळू लागताच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही चतुरपणे कॉंग्रेसशी फारकत घेतली आहे. कॉंग्रेसशी बेबनाव होता हे खरे असले, तरी निवडणुकोत्तर संधी हेरूनच राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले आहे यात शंकाच नाही. भाजपाच्या आक्रमक भूमिकेमागेही राष्ट्रवादी कॉंग्रेसची चाणक्यनीती नसेलच असे सांगता येत नाही. देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत कोण कोणाला कशी नेत्रपल्लवी करील हे सांगणे अवघड बनलेले आहे. बुडत्या जहाजासोबत स्वतःही बुडण्याऐवजी त्यापासून फारकत घेण्याकडे कोणाचाही कल असतो. त्यामुळे राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी संबंध तोडून निवडणुकोत्तर संधींची चाचपणी सुरू केलेली आहे असे म्हणणेही चूक ठरणार नाही. चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढणार हे आता स्पष्ट झाल्याने राज ठाकरेंच्या मनसेलाही लुडबूड करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रात पंचरंगी लढती झाल्या, तर त्यातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, यावर पुढची समिकरणे अर्थातच ठरणार आहेत. आज सेना – भाजप विलग झाले आहेत म्हणजे निवडणुकीनंतर ते एकत्र येणारच नाहीत असे नव्हे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर सर्वच पर्याय खुले आहेत. भाजपाच्या विदर्भापलीकडील खर्‍या बळाचा या निवडणुकीत कस लागणार आहे. सेनेच्या गडांना ते कितपत खिंडार पाडतात तेही दिसेल. मोदींच्या लाटेचा प्रभाव, कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारबाबतची अँटी इन्कम्बन्सी, सिंचन घोटाळ्यासारखे मुद्दे, विद्यमान केंद्र सरकारची कामगिरी अशा अनेक गोष्टींचा या निवडणुकीच्या निकालावर परिणाम संभवतो.