रात्र फुगडीची…

0
200

सौ. पौर्णिमा केरकर

ज्या गीताच्या शब्दावर मी उत्साहाने पदन्यास करीत फुगडी घालायचे, ती तर सतत ठिबकणारी स्त्रीमनाची वेदनाच होती. ती वास्तव जगण्यात सारे काही सोसत जगत राहिली. जगण्यासाठी गात राहिली…. गात गात… लवचीक, कणखर बनली.

नया सवळा गे, नया वस्तूरा
नया सवळ्याची गे झोळी शिवली
हाती घेतला पाग गे, काखे लायली झोळी
हिंडता फिरता गेले चांगून वाड्यार
घरात कोण गे नारी, आम्हा धरम वाडा
पाच मुठी साळी गे, पाच मुठी दाळी, घातले सुपावरी
नार गे गेली ती धरम वाडूक
तसला धरम आम्हा नको नारी
चिल्लया बाळाक दी भोजनाक…

चवथ जवळ यायला लागली की ‘आये’ चिल्लया बाळाची ही फुगडी-झिनोळी तोंडातल्या तोंडात सतत घोळवत राहायची. जटाधारी भगवान शिवशंकर आपली भक्त चांगुणा हिच्या भक्तीची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी म्हणून फकिराचा वेश धारण करून ‘धरम’ मागण्यासाठी चांगुणेच्या घरी जातो. दारावरच्या फकिराचा योग्य प्रकारे आदरसत्कार करणे हा तिचा धर्मच, म्हणून ती मोठ्या आनंदाने सुपातून पाच मुठी साळी, पाच मुठी दाळी आणते. परंतु हा फकीर मात्र विचित्रच मागणी करतो. ती म्हणजे, तिच्या एकुलत्या एका बाळाला मारून त्याचे मांस शिजवून त्याला हवे असते. फकिराच्या असल्या धरमाचे मागणे ऐकून ती अंतःर्बाह्य हादरते. हृदय पिळवटून टाकणारी ही फुगडी आये म्हणजेच माझ्या आजीच्या तोंडून ऐकताना बालवय ढळढळा रडायचे. आयेच्या त्या गायनात एक समरसता होती. शब्द काळजाला स्पर्शून जायचे. असली कसली ही परीक्षा? खरे तर देव तारणारा, संकटांचे निवारण करणारा; पण इथे तर साक्षात देवच मुलाचे तुकडे आईलाच करायला लावून तिलाच त्याचे मांस शिजवायला सांगतो. पण श्रद्धेचे, भक्तीचे एक गडद वलय आमच्याभोवती होते. त्यामुळे देवाला उघड उघड काही बोलण्याचे धाडस नव्हतेच. आणि धाडस केले असते तर मोठ्यांकडून बोलणी खावी लागली असती. त्यामुळे त्या नसत्या भानगडीत कधी पडण्याचा प्रयत्न केला नाही.
चिल्लया बाळाची कहाणी सांगणारी ही झिनोळी फुगडी खूपच लांबलचक, संपता न संपणारी. आये बसून गायची आणि बाकी सगळ्याजणी त्या गायनावर संथ लयीत ओणव्याने फुगडी घालायच्या. चवथीचा उत्सव खूप कडक शिस्तीत, जुन्याजाणत्यांच्या देखरेखीखाली पार पाडला जायचा. मोठमोठ्याने बोलणे, ज्या जागेत गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली असायची तिच्यासमोर झाडू मारणे वर्ज्य असायचे. त्याच्यासाठीचा प्रसादसुद्धा तेवढाच निर्मळपणे करायचा. समूहाने चवथ साजरी केली जायची. कामे खूप तशीच माणसेही खूप. जाणतीच कामाची विभागणी करायची. त्यामुळे महिलांचे कार्यक्षेत्र वेगळे, पुरुषांचे वेगळे. आम्हा मुलांना तर सगळे रानच मोकळे असायचे. त्यावेळी आये सांगायची, गणपतीला सकाळी सकाळी दवली-माणीचे वादन करून उठवावे लागते, अन्यथा तो झोपूनच राहणार. असे म्हणून ती माण उपडी ठेवून, त्यावर थोडीशी चुलीतली राख टाकून दोन दवले दोन्ही हातांत धरून त्या मागे-पुढे करीत वादन करायची. त्या दवले-माणीला घरातील जाणकाराव्यतिरिक्त मुलांना हात लावायची परवानगी नसे. गणपतीची मूर्ती जेवढे दिवस असायची तेवढे दिवस सकाळी आणि तिन्हीसांजेला दवले-माणीचे वादन न चुकता केले जायचे. संध्याकाळचे वादन झाले की पूजा, आरती, भजन संपन्न व्हायचे. उरलेला बाकी सगळा वेळ मग फुगडीसाठीच असायचा.
बालपणात आमच्या घरी चार कुटुंबांचा मिळून एक गणपती. एरव्ही प्रत्येकजण आपापल्यापुरतेच घरात शिजवाचे, खायचे. पण या उत्सवाच्या दिवसांत मात्र आपापल्या चुलीकडे जरी जेवण रांधले गेले तरी प्रत्येक कुटुंब आपण रांधलेले पदार्थ पानावर वाढायचे. पाचही दिवस एकत्रित जेवणाचा तो आनंद मोठा होता. कोणाचे पदार्थ किती चांगले झाले याची चर्चा व्हायची, पण एखाद्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेऊनच! जेवणाव्यतिरिक्त गणपतीच्या सजावटीसाठीची सारी कामे सामूहिकच व्हायची. मूर्ती ज्या ठिकाणी ठेवली जाणार त्याच्या मागे बरोबर गोलाकार आकारातील कमळाचे चित्र काढणे हे भाईचे वर्षानुवर्षांचे काम. एखाद्या वर्षी घरात कुणाचा मृत्यू झाला आणि चतुर्थी येईपर्यंत जर त्या व्यक्तीला वर्ष होत नसेल तर मग कमळाच्या जागेवर मयत व्यक्ती पुरुष असेल तर वडाचे झाड, स्त्री असेल तर मग तुळशी वृंदावन चितारले जायचे. नागपंचमीला नागोबाचे भिंतीवर चित्र, चवथीला कमळ व इतर चित्रे काढण्याची जबाबदारी भाईचीच होती.
संपूर्ण वाड्यावर आमच्याच घरी ध्वनिक्षेपक होता, ही आम्हा मुलांसाठी त्यावेळी मोठी अभिमानाची गोष्ट वाटायची. दादाने तुळशीदासाला उपजीविकेसाठी म्हणून हा ध्वनिक्षेपक घेऊन दिला होता, जेणेकरून कोणत्याही कार्यक्रमाला भाड्याने तो त्याला देता येईल. घरचीच वस्तू असल्याने पहाटेच गणपतीच्या आरती लावून ध्वनिक्षेपक चालूच ठेवायचा. शेजारच्या घरात लहानसहान टेपरेकॉर्डर होते. त्यांचा आवाजही त्या-त्या खोलीपुरता मर्यादित असायचा, पण आमच्या ध्वनिक्षेपकाचा आवाज कसा संपूर्ण वाड्यावर यायचा. सोबत माईक होतेच. त्यामुळे आम्ही मुले मोठमोठ्या आवाजात गाणी म्हणायचो. त्या आवाजाने आजूबाजूची मुले घरी यायची. माईकवर गाणे म्हटले की आपला आवाज सर्वांपर्यंत पोहोचणार ही सर्वांसाठी आनंदाची बाब असायची. गणपतीसमोरची आरती उत्साहाने पार पडायची. त्यानंतर माईक मध्ये ठेवून फुगडी घालायला मिळणार म्हणून तर मुलांची गर्दी वाढायची. आम्हा मुलांची फुगडी ऐकून ताईबाय, बाईबाय, वहिनीला राहवत नसे. पटापट आपली सारी कामे आटोपून मोठ्या उत्साहाने त्या आमच्या घरी यायच्या.
एरव्ही आमच्या घरात आये सोडली तर आणखी कोणीच फुगडी म्हणत नसत किंवा नृत्य करण्यासाठी कुणी येत नसत. गोलाकार सतत फेरे घेऊन फुगडी घातली की आयेलासुद्धा भोवळ यायची. त्यामुळे ती बसूनच चिल्लया, तसेच श्रावण बाळाची फुगडी म्हणायची. एरव्ही तिचा आवाज एकट्या-दुकट्याला ऐकण्यासाठी गोड होता, परंतु समूहात मात्र तो पोहोचत नसे. त्यासाठी तिला माईकची गरज भासायची. आणि माईक तर घरी चोवीस तास दिमतीला असल्याने आमच्या घरची फुगडी दमदार व्हायची. आवाज आयेचा आणि फुगडीवर फेर धरायचा आम्ही मुलांनी. त्यामुळे ही फुगडी बाळबोध असायची. मोठा आवाज बाहेरच्यांना येत असल्याने तीसुद्धा या फुगडीकडे आकर्षित व्हायची. बाईबाय, ताईबायचे सहकार्य मिळाले की फुगडीला रंगत यायची. चढत्या क्रमाने तिला उंची प्राप्त व्हायची.
बुजीकाकाचे लग्न होऊन ताईबाय जेव्हा घरात आली तेव्हापासून माझा तर फुगडीचा उत्साहच दुणावला. बाकी कोण मुली येवो न येवो, मी मात्र त्या सगळ्या महिलांसोबतीने रात्र जागवायची. भजन-आरतीचे मेळ जसे पाचही दिवस घराघरांत फिरायचे, तसाच आमचा फुगडीचा मेळ फिरायचा. आम्हीही मग अट घालून ठेवली, कोणाच्या घरात फुगडी घालायला हवी असे वाटत असेल तर त्या घरातील एखादी तरी महिला किंवा मुलगी आमच्याबरोबरीने फुगडीसाठी यायला हवी. या अटीचा बराच फायदा झाला. फुगडी कधीही घालण्यासाठी मी तयारच असायचे. ताईबायने म्हटलेल्या गीतांची सोबत असायची, त्यामुळे रात्री झिंगून जायच्या. लहानपणापासून आये म्हणत असलेली फुगडीगीते मी ऐकत आले होते. ती लांबलचक झिनोळी गीते देवावरील श्रद्धाभाव अधिक दृढ करीत राहिली. चांगुणेची भक्ती, तिची दृढता, आपल्या रक्ताच्या गोळ्यापेक्षाही देवावरील प्रगाढ विश्‍वास, श्रावणबाळाचे मात्या-पित्यावरील प्रेम, त्यांच्यासाठी त्याने केलेला त्याग, राम-सीतेची आदर्श जोडी, श्रीकृष्णाने केलेला कंसवध, रावणाची शंकरभक्ती, गणपतीच्या जन्माची कहाणी, कृष्णाच्या बाललीला, हरिश्‍चंद्र-तारामती या व इतर अनेक गीतांतून सुष्ट आणि दुष्ट शक्तीचा झगडा, त्यात शेवटी सुष्टांचा विजय म्हणजेच सत्य नेहमीच टिकून राहते, हे संस्कार कळत-नकळत बिंबले. परंतु ताईबायने ज्या तर्‍हेच्या फुगड्या गायला सुरुवात केली त्यातून मात्र स्त्रीमनाची सांसारिक जीवनात होत असलेली प्रचंड घुसमटच अनुभवता आली. ‘उडती उडती चाल माका चुडतेचो मार, माका चुडतेचो मार…’ असे म्हणत सासूरवाशिणीला दारुड्या सासर्‍याकडून चुडतेचा मार, किरकिर्‍या सासूकडून शब्दांचा मार, नणंदेकडून कळींचा मार, तर नवर्‍याकडून चाबकाचा मार… हा सगळाच अन्याय गीतातून शब्दबद्ध करीत जणू काही या मालिनीनी स्वतःला अभिव्यक्त करीत मनच हलके केले. ज्या गीताच्या शब्दावर मी उत्साहाने पदन्यास करीत फुगडी घालायचे, ती तर सतत ठिबकणारी स्त्रीमनाची वेदनाच होती. ती वास्तव जगण्यात सारे काही सोसत जगत राहिली. जगण्यासाठी गात राहिली…. गात गात… लवचीक, कणखर बनली.