राज्याला आज चक्रीवादळाचा धोका

0
131

अरबी समुद्र व लक्ष्यद्वीप येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून आज मंगळवारपर्यंत त्याचे रूपांत्तर चक्रीवादळात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. आज २ जूनपर्यंत हे चक्रीवादळ पुढे पुढे सरकत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात किनारपट्टी असे करीत हरिहरेश्वर (रायगड- महाराष्ट्र) व ३ जूनपर्यंत दमणपर्यंत सरकणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
या चक्रीवादळामुळे २ जून रोजी अरबी समुद्र व किनारपट्टीवरून ताशी ४५-५५ ते ६५ कि. मी. एवढ्या वेगाने वारे वाहणार आहेत. आज दि. २ जून रोजी ताशी ६० ते ७० व ८० कि. मी. एवढ्या वेगाने तर ३ जून रोजी ताशी ९० ते १०० कि. मी. एवढ्या वेगाने वारे वाहणार आहे.

कमी दाबाच्या पट्ट्याचे २ रोजी चक्रीवादळात रूपांतर होईल. तर ३ व ४ जून रोजी हे चक्रीवादळ उग्र रूप धारण करील. या चक्रीवादळामुळे गोवा व कोकणच्या बहुतेक भागांत २ व ३ जून रोजी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मच्छिमारांनी ३ जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

केरळात मान्सूनचे आगमन
केरळ किनारपट्टीवर काल दि. १ जून रोजी मान्सूनने धडक दिली आहे. हवामान खात्याने भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, काल गोव्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने गोव्याला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.