राज्यात ३३ नवे कोरोना रुग्ण; सध्याची रुग्णसंख्या २३५

0
268

>> लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी शिरोडा आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय : मोहनन

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवे ३३ रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २३५ एवढी झाली आहे. या नवीन ३३ पैकी निम्मे रुग्ण मांगूर हिल भागातील आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३०० झाली आहे. त्यातील ६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोना पॉझिटिव्ह २३५ जणांवर मडगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जीेएमसीच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित १५ जणांना दाखल करण्यात आले आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
मागील चोवीस तासात २३३७ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीत आलेले १८५४ नमुने निगेटिव्ह आहेत. तर ३३ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तसेच १३०१ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मडगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढ असल्याने कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

या सेंटरमध्ये आरोग्य खात्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार आणि देखरेख ठेवली जाणार आहे. या ठिकाणी ६० खाटांची सोय उपलब्ध आहे. गरज भासल्यास आणखीन खाटा वाढविण्याची सोय आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.

शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद करण्यात आला असून ही ओपीडी कामाक्षी आयुर्वेदिक हॉस्पिटल – शिरोडा येथे स्थलांतरित करण्यात आली आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले. आरोग्य खात्याच्या मांगूर हिल वास्को येथे कार्यरत ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य खात्याचे काही कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यापूर्वी मांगूर हिलमध्ये कार्यरत होते. तसेच, नागरिकांच्या कोविड चाचणीसाठी स्वॅब घेताना काही जणांनी कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे एक दिवस स्वॅब घेण्याचे काम बंद ठेवून आरोग्य कर्मचार्‍यांना स्वॅब घेण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. मांगूर हिल येथे ओपीडी सुरू करण्यात आली आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले. बांबोळी येथील जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत बसविण्यात येत असलेले नवीन कोविड चाचणी यंत्र येत्या मंगळवारपासून कार्यान्वित होणार आहे. या यंत्रामध्ये दिवसा ४५६ चाचण्या करण्याची क्षमता आहे. सदर यंत्र कार्यान्वित केल्यानंतर प्रयोगशाळेची चाचण्यांची क्षमता आणखी वाढणार आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांचे कोविड चाचणीसाठी घेण्यात येणार्‍या स्वॅबची तपासणी केली जात आहे. दर दिवशी हजारो नमुन्यांची तपासणी केली जात असल्याने संबंधित नागरिकांना एसएमएस संदेशाद्वारे अहवालाची माहिती पाठविण्यास थोडा उशीर होत आहे, अशी कबुली आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली. कोविड प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने अहवालाची चाचणी केली जात असल्याने अहवाल मिळविण्यास थोडा उशीर होत असल्यास नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. एखाद्या नागरिकाचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य खाते त्वरेने संबंधित नागरिकाला ताब्यात घेते. त्यामुळे अहवालाला उशीर झाल्यास काळजी करण्याचे कारण नाही, असेही मोहनन यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांनी कोरोना विषाणूची भीती बाळगू नये. सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता, सॅनिटायझर्स आदी सुरक्षा उपाय योजनांचे पालन केल्यास कोरोना विषाणूची बाधा होऊ शकत नाही, असेही डॉ. डिसा यांनी सांगितले.

कळंगुटमधील ‘त्या’
वृध्देची प्रकृती स्थिर
कळंगुट येथील कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेची प्रकृती स्थिर आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

५ टक्के पॉजिटिव्ह
रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे
राज्यात आढळून येणार्‍या केवळ ५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. राज्यातील ९५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

आज सर्वपक्षीय बैठक
कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता सर्वपक्षिय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

वास्कोच्या शांतीनगरात
सापडला कोरोना रुग्ण

वास्कोत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून काल शांतीनगर येथे एक रुग्ण सापडला. दरम्यान वास्कोत वाढत्या कोरोना संसर्गाची धास्ती घेऊन आज भाजी मार्केटमधील दुकानदारांनी संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली. तर वास्को पोलिसांकडून काल दुपारपासून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली.

दरम्यान वाढत्या कोरोना संसर्गाची धास्ती घेऊन भाजी मार्केट मधील दुकानदारांनी भाजी दुकाने व इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. लोकांच्या आरोग्याचे हित सांभाळण्यास दुकानदारांनी सदर निर्णय घेण्यात आला. वास्कोत लॉक डाऊन करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वास्कोत लॉकडाऊनची गरज नसल्याचे वारंवार सांगितले आहे. वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा व नगरसेवक यांनी लॉकडाऊन करण्यासाठी वारंवार मागणी करीत आहेत.

दरम्यान काल सकाळपासून वास्कोत आयओसी जंक्शनजवळ चिखली नाक्यावर वास्को पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. अचानक केलेल्या नाकाबंदीमुळे वाहनचालक गडबडून गेले.