राज्यात १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0
297

>> कोविड व्यवस्थापनासाठी खाजगी इस्पितळांकडून अल्प प्रतिसाद : आरोग्य सचिव नीला मोहनन यांची माहिती

राज्यात नवीन १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळले असून ऍक्टीव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६४६ झाली आहे. तसेच, कोरोना पॉझिटिव्ह २१० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५४० झाली असून त्यातील २८६५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणूने २९ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने स्वॅबच्या चाचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दरदिवशी मोठ्या प्रमाणात स्वॅबचे नमुने तपासणीविना राहतात. राज्यात स्वॅबच्या तपासणीला गती देण्यासाठी नवीन मशीन बसविण्यावर विचार केला जात आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

राज्यातील आयसीयू सुविधा असलेल्या खासगी इस्पितळांनी कोविड व्यवस्थापनासाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या आदेशाला खासगी इस्पितळांंकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील केवळ एकाच खासगी इस्पितळाने आयसीयूतील खाटा राखीवतेबाबत आपला प्रस्ताव सादर केला आहे. आरोग्य खात्याला कोविड व्यवस्थापनासंबंधी खासगी इस्पितळांबाबत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

राज्यात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यासाठी आवश्यक मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बांबोळी येथील इस्पितळामध्ये आत्तापर्यंत १५ ते २० जणांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी संपर्क साधलेला आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

राज्यात कोविडची ऍन्टीजन टेस्ट करण्यासाठी दोन खाजगी इस्पितळांना मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच ऍन्टीजन चाचणीसाठी ४ ते ५ खाजगी लॅबनी संपर्क साधलेला आहे. राज्यात खाजगी लॅबमध्ये आरटीपीसीआर पद्धतीने नमुन्यांची तपासणी केली जात नाही. काही लॅब स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबई येथील मान्यताप्राप्त लॅबमध्ये पाठवितात, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्ण आढळून येणार्‍या ठिकाणाची माहिती देण्यासाठी जीआयए मॅपिंगचा वापर करून आराखडा तयार केला जात आहे. छोटा मांगूरमध्ये नागरिकांची ऍन्टी बॉडी टेस्ट केली जात आहे. त्यासंबंधीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

लक्षणविरहित कोरोना बाधित रुग्णांकडून घरीच क्वारंटाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करण्यास सुरुवात केली असून आत्तापर्यंत दोन जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली.

मडगावात पुरेशा खाटांची सोय
कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी कोविड इस्पितळांची गरज नाही. भविष्यकाळासाठी नवीन कोविड इस्पितळ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळात कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत. या इस्पितळाच्या आयसीयूमध्ये २ रुग्ण आणि आयटीयू विभागामध्ये ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही मोहनन यांनी सांगितले.