राज्यात सरकारी नोकर्‍यांचा सौदा ः कॉंग्रेस

0
103

पणजी (न. प्र.)
सरकारने मांद्रे मतदारसंघातील १०५ जणांना सरकारी नोकर्‍या दिल्यानेच आपण आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दयानंद सोपटे यांनी केलेले विधान ही गंभीर बाब असून सरकारी नोकर्‍यांचा सौदा चालू आहे हे यावरून स्पष्ट होत असल्याचा दावा काल विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रश्‍नी कॉंग्रेस उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने सरकारी पदे विक्रीवर काढली आहेत काय. पदे भरण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण न करता वशिलेबाजी व घोटाळे करून नोकर्‍यांची विक्री करण्यात येत आहे की काय असा संशय सोपटे यांनी नोकर्‍यांसंबंधी केलेल्या विधानामुळे आम्हाला येऊ लागला आहे, असे कवळेकर तसेच आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे म्हणाले.
राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना भाजप परत परत भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करीत असे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वारंवार आंदोलने केली जात असत. एकदा धरणे धरण्यासाठी योग गुरू रामदेवबाबा यांनाही आणण्यात आले होते. याची रेजिनाल्ड यांनी यावेळी आठवण करून दिली. विश्‍वजित राणे हे कॉंग्रेस पक्षात असताना त्यांनी नोकर्‍यांचा घोटाळा केल्याचा आरोप करत त्यावेळचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारही केली होती, असे रेजिनाल्ड म्हणाले.
कॉंग्रेस सोडण्याचा
प्रश्‍नच नाही ः प्रतापसिंह
आपल्याविषयी वृत्तपत्रांद्वारे नको असलेल्या अफवा पसरविल्या जात आहेत, असे काल पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपण कॉंग्रेस पक्षात असून पक्ष सोडून जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले. लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रशासन ठप्प झाले असल्याचा जो आरोप होऊ लागलेला आहे त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता राज्यात प्रशासन आहे कुठे, असा सवाल त्यांनी केला.
पर्रीकरांविना बैठकीत प्रकल्पांना
मान्यतेची चौकशी व्हावी
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे (आयपीबी) चेअरमन असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे संचालक मंडळाच्या बैठकीला हजर नसतानाच मंडळाने १७ नव्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप काल कॉंग्रेस पक्षाने केला. मनोहर पर्रीकर हे या बैठकीला हजर नसताना कशी काय मंजुरी देण्यात आली त्याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.