राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय

0
117

मागील काही दिवसांपासून कमजोर बनलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवनावर परिणाम झाला. आजही राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात आत्तापर्यंत ८९.०७ इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद १५ टक्के कमी आहे. हवामान खात्याच्या सरासरीनुसार आत्तापर्यंत सुमारे १०४ इंच पावसाची नोंद व्हायला हवी होती. मागील चोवीस तासात साधारण १ इंच पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक १.५७ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा, पेडणे, साखळी, वाळपई येथे साधारण १ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी, ओल्ड गोवा, काणकोण, मुरगाव येथेही पावसाची नोंद झाली आहे.
वाळपई आणि सांगे येथे पावसाने इंचाचे शतक ओलांडले आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत १३१ इंच आणि सांगे येथे १०५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

फोंडा आणि पेडणे भागात पाऊस इंचाचे शतक गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. फोंडा येथे ९८.६० इंच आणि पेडणे येथे ९७.२३ इंच पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद मुरगाव येथे ७२.५१ इंच एवढी झाली आहे.

रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे
वाहनचालकांची तारांबळ
दरम्यान, रस्त्यावरील खड्‌ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्‌ड्यांचा अंदाज येत नसल्याने बराच त्रास सहन करावा लागत आहे. राजधानीतील काही भागातील रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले होते. परंतु, मागील दोन दिवस पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार झाले आहेत.