राज्यात भाज्यांचे दर गगनाला

0
142

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची झळ गोव्यालाही काही प्रमाणात बसली असून पणजीसह राज्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये काही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
गाजर, कोथंबीर, मिरची, फरसबी, वालपापडी, फ्रेंच बीन या भाज्यांचे दर भडकले असून अन्य प्रकारच्या भाज्यांचे दरही वाढण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या पणजी बाजारपेठेत प्रती किलो गाजरची किंमत ६० ते ८० रुपयांवरून १२० रुपये झाली आहे. तसेच दहा रूपयांना उपलब्ध होत असलेली कोथंबिर ‘जुडी’साठी ग्राहकांना ३० ते ४० रुपये मोजावे लागत अहेत. हिरवी मिरची ४० रुपयांवरून ८० रुपयांवर पोचली आहे. फरसबी व वालपापडीचे दर ४० रुपयांवरून १२० रुपयेपर्यंत गेले आहेत. फ्रेंच बीनचा दर सद्या ८० रुपये प्रती किलो असून यापूर्वी तो ४० रुपये होता. सद्या महाराष्ट्राच्या भागातून भाजीची आवक पूर्णपणे बंद झाल्याने बेळगावहून येणार्‍या भाजीवरच विक्रेते अवलंबून आहेत.
गेल्या दि. १ पासून राज्यात मच्छीमारी बंदी सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर वरील जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने त्याचा गृहिणींना बराच त्रास झाला आहे.