राज्यात पावसाच्या प्रमाणात ५% घट

0
123

>> एकूण पाऊस ७६.४२ इंच; सर्वाधिक पाऊस वाळपईत

राज्यात मागील आठ दिवसांपासून मोसमी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सरासरी पावसाचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत ७२.२५ इंच पावसाची नोंद झाली आहे. अंदाजानुसार आत्तापर्यंत सरासरी पाऊस ७६.४२ इंच एवढा पडायला हवा होता.

राज्यात दक्षिण – पश्‍चिम मोसमी पाऊस कमजोर झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी पावसाच्या तूरळक सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील चोवीस तासात वाळपई येथे सर्वांधिक ०.७१ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. इतर भागात किरकोळ पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात यावर्षी सुरुवातीपासून मोसमी पावसाने जोर धरला होता. मागील जून महिन्यात चांगला पाऊस पडला. त्यानंतर २१ जुलैपर्यंत चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सरासरी पावसाचे प्रमाण जास्त होते. मात्र, २२ जुलैपासून पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. मागील आठ दिवसातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. मागील चार पाच दिवसात किरकोळ पावसाची नोंद झाली आहे.

वाळपईत सर्वाधिक ९६ इंच
आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद वाळपई येथे ९६.८८ इंच एवढी झाली आहे. तर सर्वांत कमी पावसाची नोंद मुरगाव येथे ६२ इंच एवढी झाली आहे. राज्यात सुरुवातीला काणकोण भागात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पेडणे आणि म्हापसा भागात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. आता वाळपई येथे मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे साळावली, अंजुणे, पंचवाडी, आमठणे आणि चापोली ही प्रमुख धरणे भरली आहेत.

म्हापसा – ६७.१ इंच, पेडणे -८३.०५ इंच, पणजी -६६.६६ इंच, ओल्ड गोवा – ७८.७८ इंच, साखळी – ७६.१९ इंच, काणकोण – ६३.१८ इंच, दाबोली – ६५.१२ इंच, केपे – ६७.२५ इंच, सांगे ७९.९५ इंच पावसाची नोंद झाली आहे.