राज्यात पडझडीमुळे कोट्यवधींचे नुकसान

0
139

राज्यभरात गेले चार दिवस जोरदार कोसळणार्‍या पावसाने रविवारी थोडी उसंत घेतली. मागील चार दिवसात १३ ते १४ इंच पावसाची नोंद झाल्याने मोसमी पावसाच्या तुटीचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे. आत्तापर्यंत ३०.३४ इंच पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यात १४ दिवसांच्या उशिराने अखेर २० जूनला मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. गोव्याच्या मागील २० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच खूपच उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या आगमनानंतर पावसाचे प्रमाण कमीच होते. या महिन्याच्या अखेरीस पावसाने जोर धरला. जून महिन्यात साधारण १० दिवस सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. शेवटच्या टप्प्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे मोसमी पावसाची तूट कमी होण्यास मदत झाली आहे.
राज्यात २६ जूनपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. २८ जूनला सर्वाधिक ४.३३ इंच पावसाची नोंद झाली. मागील चोवीस तासात २.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंड्यात सर्वाधिक ४.३४ इंच आणि सांगे येथे ४.२१ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे ३.३३ इंच, पणजी येथे २.५० इंच, ओल्ड गोवा येथे २.५४ इंच, साखळी येथे ३.८७ इंच, काणकोण येथे १.४० इंच, दाबोली येथे १.८८ इंच, मुरगाव येथे १.४९ इंच आणि केपे येथे २.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा, वाळपई आणि मडगाव येथील पावसाची माहिती मिळू शकली नाही.

अग्निशामक दलाकडे मागील चार दिवसात पडझडीच्या २४७ कॉल्सची नोंद झाली आहे. २८ जूनला सर्वाधिक ८३ कॉल्सची नोंद झाली असून २९ जूनला ७८ कॉल्स, २७ जूनला ३९ कॉल्स आणि २६ जूनला ४७ कॉल्सची नोंद झाली आहे.
जोरदार पाऊस व वार्‍यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांची धावपळ करावी लागली. २२ ते २५ जून या काळात पडझडीच्या ७१ कॉल्सची नोंद झालेली आहे.

राज्यातील प्रमुख धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. साळावली धरणातील कमी झालेली पाण्याची पातळी २० टक्क्यावर पोहोचली आहे. तर, अंजुणे धरणातील पाण्याची पातळी १० टक्क्यावर पोहोचली आहे. आमठणे, पंचवाडी आणि चापोली येथील धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.