राज्यात पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

0
73

>> १८६ पंचायतींसाठी उद्या मतदान : तीन दिवस मद्यविक्री बंदी : मंगळवारी मतमोजणी

राज्यातील १८६ पंचायतींसाठी उद्या रविवारी होणार्‍या निवडणुकीचा जाहीर प्रचार काल संपला. असे असले तरी आज संध्याकाळपर्यंत निवडणूक रिंगणातील उमेदवार मतदारांच्या भेटी गाठी घेण्याचे सत्र चालूच ठेवतील. दि. १३ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोग व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

या निवडणुकीसाठी सामाजिक माध्यमांचा उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी चांगला वापर केला आहे. उद्या निवडणूक असल्याने काल शुक्रवारी संध्याकाळपासून पंचायत क्षेत्रात दारूबंदी लागू केली आहे. ही दारूबंदी आज दि. १०,११ व १३ रोजी लागू राहील. त्यासाठी अबकारी निरीक्षकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसली तरी प्रत्येक आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी यांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून राजकारण्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तसेच वेगवेगळ्या माध्यमातून आदेश देवून निवडणुकीतील सहभाग दाखविला आहे. निवडणूका पक्षाच्या चिन्हावर होत नाही, इतकाच फरक आहे. आज संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदानाचे साहित्य घेवून संबंधित मतदान केंद्रावर दाखल होतील.
मतदान प्रमाण पावसावर अवलंबून
राज्यात गुरूवारी मान्सून दाखल झाला असून पावसाच्या जोरदार सरी अधुनमधून कोसळत असल्याने मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या स्थितीचा विचार करून निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी प्रथमच वॉटरप्रूफ मांडव उभारले आहेत.
संवेदनशील प्रभाग
दरम्यान, प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार काणकोण तालुक्यातील संपूर्ण लोलये पंचायत तसेच आगोंद पंचायतीतील प्रभाग क्र. ६ व ७ आणि गावडोंगरी पंचायतीतील प्रभाग क्र. ५ संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे. राज्यात विविध पंचायतींमधील मिळून एकूण ५५ जणांची बिनविरोध निवड झाली आहे.

मतमोजणी केंद्रे
राज्य निवडणूक आयोगाने दोन व तीन टप्प्यांत केल्या जाणार्‍या मतमोजणींसाठी १२ तालुक्यातील १२ मतमोजणी केंद्रांची ठिकाणे जाहीर केली आहेत. ही केंद्रे पुढीलप्रमाणेः-
पेडणे – सेंट जोसेङ्ग हायस्कूल, ग्रामपंचायत हॉल, तुये. डिचोली – (२ टप्प्यात) नारायण झांटये सभागृह. सत्तरी – ङ्गॉरेस्ट ट्रेनिंग स्कूल हॉल. बार्देश – (३ टप्प्यांत) सरकारी सभागृह, पेडे-म्हापसा. तिसवाडी – गोवा क्रीडा प्राधिकरण, कांपाल पणजी. ङ्गोंडा – सरकारी सभागृह, कुर्टी. धारबांदोडा – सरकारी प्राथमिक विद्यालय, तामसडो. सांगे – सरकारी सभागृह, खैरी काते. सासष्टी – (३ टप्प्यांत) द. गोवा जिल्हाधिकारी कार्यालय. मुरगाव – दक्षिण गोवा जिल्हाधिकारी सभागृह. केपे – क्रीडा सभागृह बोरीमळ. काणकोण – मामलेदार कार्यालय.