राज्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण

0
153

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून नव्याने आणखी ९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गोव्यासाठी चिंतेची बाब बनून राहिली आहे. मडगाव येथील कोविड – १९ इस्पितळातील २२० खाटा भरल्याने आता कोविड रुग्णांसाठी आणखी इस्पितळ उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १९०३ वर पोहोचली असून सध्या राज्यात ऍक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ७३९ असल्याची माहिती काल आरोग्य खात्याने दिली.

कोविडमुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आठ झाली असून त्यात राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. सुरेश आमोणकर तसेच मुरगाव पालिकेचे नगरसेवक पास्कोल डिसोझा यांचा समावेश आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले ९० नवे रुग्ण सापडले तर ९५ रुग्ण बरे झाले, त्यांना घरी पाठविण्यात आले.

कोरोना संसर्ग झालेले
आमदार निरीक्षणाखाली
दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या भाजप आमदाराची प्रकृती स्थिर आहे. काल त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

तळावलीत एकाच कुटुंबातील तिघांना कोरोना
शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात रुग्णांना जागा उपलब्ध नसल्याने आता फर्मागुडीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात निगा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीची पाहणीही करण्यात आली आहे. वाडी – तळावली येथे एकाच कुटुंबातील पती, पत्नी व सासरा असे तिघेजण कोरोना बाधीत सापडले असून या भागातील पन्नासपेक्षा जास्त लोकांची चाचणी करण्यात आली असता सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.

शिरोडा कोविड निगा
केंद्रात जागाच नाही
शिरोडा निगा केंद्रात सध्या जागाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय रुग्णवाहिकांचीही कमी आहे. त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. वाडी-तळावलीत कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर माजी उपसरपंचांसह सरपंच तसेच पंच व स्थानिकांनी लोकांत जागृती केली व आवश्यक साहित्य पुरवले.

डिचोली तालुक्यात मंगळवारी पाच नवे रुग्ण सापडले आहेत. केरी, पाळी, चावडी, व सर्वण येथे प्रत्येकी एक तर विर्डी येथे २ नवे रुग्ण सापडल्याची माहिती डॉ. उत्तम देसाई व डॉ. मेधा साळकर यांनी दिली. साखळीत काल ११४ तपासण्या केल्या. त्यातील ४ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.