राज्यात कोरोनाचे आणखी दोन बळी

0
129

>> एकूण बळींची संख्या १४, नवीन ८५ पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले. मागील ४८ तासांत कोरोना पॉझिटिव्ह ५ जणांचा मृत्य्ू झाल्याने खळबळ उडाली असून राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह मृताची संख्या आता १४ झाली आहे. दरम्यान, काल राज्यात नवीन ८५ रूग्ण आढळून आले आहेत.

मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या पाळोळे काणकोण येथील एका ४९ वर्षीय व्यक्तीचे रविवारी सकाळी निधन झाले. सदर व्यक्तीला २८ जूनला एका खासगी इस्पितळामधून कोविड इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. तर, चिखली वास्को येथील ८० वर्षी वृद्ध महिलेचे दुपारी निधन झाले. या वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वृद्धेच्या कुटुंबातील इतर व्यक्ती बरे झाले आहेत. या दोन्ही रूग्णांना कोरोनाबरोबरच इतर आजार होते, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील खास कोरोना वॉर्डात आत्तापर्यंत ९२७ कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

देशभरातील कोरोना विषाणूच्या यादीमध्ये गोवा हरित विभागात होता. तथापि, मुरगाव तालुक्यातील मांगूर हिल या भागातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यास प्रारंभ झाला. मांगूर हिलमधून कोरोना विषाणूचा राज्यातील इतर भागांत फैलाव होण्यास सुरुवात झाली. राज्यात दरदिवशी नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. बाराही तालुक्यांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. मुरगाव तालुक्याला कोरोना विषाणूची जास्त झळ बसली असून आठ जणांचा बळी गेला आहे. राज्यात अठरा ठिकाणी आयसोलेटेड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

बेतकी, नेरूल मायक्रो कंटेनमेंट झोन
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी फोंडा तालुक्यातील बेतकी खांडोळा पंचायत क्षेत्रातील प्रभाग ५ मधील हळदणवाडा हा भागात मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. या भागात ३४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी नेरूल गावातील प्रभाग क्रमांक १ (फट्टावाडा) मधील काही भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. नेरूल येथे २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

५९ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ९५२ झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ५९ रुग्ण बरे झाले आहे.

नेरूल, पर्वरी येथे नवीन रुग्ण
नेरून येथे नवीन १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे. पर्वरी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ५ झाली आहे.

भाटी, नेवरा येथे कोरोना रुग्ण
भाटी येथे नवीन ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच नेवरा येथे नवीन ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

मांगूर हिलमध्ये नवीन रुग्ण
मांगूर हिलमध्ये नवीन ९ रुग्ण आढळून आले आहेत. बायणा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ११० झाली आहे. जुवारीनगर येथे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १४६ झाली आहे.

बेतकी येथे नवीन ८ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या ४२ झाली आहे. फोंडा येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या ४० झाली आहे.

काणकोण येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्ण संख्या ९ झाली आहे. लोटली येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्ण संख्या ३१ झाली आहे.

सफाई कर्मचारी पॉझिटिव्ह
पणजी पोलीस स्थानकावर काम करणारी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून सर्व पोलीस कर्मचार्‍यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. पणजी पोलीस स्थानकातील सुमारे ५० पोलीस कर्मचार्‍यांचे तसेच पणजी वाहतूक विभागातील काही कर्मचार्‍यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

बारा दिवसांत ११३५ पॉझिटिव्ह
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. मागील १२ दिवसांत ११३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेआहेत. ८ ते ११ जुलै या काळात रोज शंभराच्यावर रुग्ण आढळून आलेले आहेत. मागील बारा दिवसांच्या काळात सरासरी दरदिवशी ९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.

बारा दिवसांत ८९१ कोरोनामुक्त
आरोग्य खात्याने मागील १२ दिवसांच्या काळात राज्यात सुमारे ८९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याचे जाहीर केले आहे. राज्यात आत्तापर्यंत ८९ हजार ५९६ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यात २४५३ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

बारा दिवसांत ११ जणांचा मृत्यू
राज्यात १ जुलैपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. दि. १ ते १२ जुलै या बारा दिवसांच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात माजी मंत्री सुरेश आमोणकर तसेच मुरगाव पालिकेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.