राज्यात ईडीसीने तयार केले सहा हजार उद्योजक ः कुंकळयेकर

0
101

मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली आर्थिक विकास महामंडळाने आतापर्यंत गोव्यात सहा हजार उद्योजक तयार केले असून ६३ कोटी रु. एवढे कर्ज २ टक्के व्याजदराने वितरित केले आहे, अशी माहिती ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ईडीसीच्या कर्जाच्या वसुलीची टक्केवारीही चांगली असून ती ९३ टक्के एवढी असल्याची माहितीही कुंकळ्येकर यांनी यावेळी दिली.

ईडीसीने जास्तीत जास्त कर्ज हे गोव्यातील पारंपरिक उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना दिले. त्यात भुसारी दुकान उघडणे, नारळ व्यवसाय, कपडे विक्रीचे दुकान सुरू करणे आदीसाठी दिल्याचे कुंकळयेकर यांनी यावेळी सांगितले. ईडीसी फक्त कर्जाचेच वितरण करीत नाही तर उद्योग सुरू करणार्‍यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे कामही करीत असल्याचे कुंकळ्येकर म्हणाले. उद्योजकता प्रशिक्षण, सॉफ्टवेअर प्रशिक्षण आदी प्रशिक्षण ईडीसी देते.

सीएसआरवर १ कोटी
३४ लाख रु. खर्च
कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलीटीखाली ईडीसीने १ कोटी ३४ लाख रु. खर्च केल्याची माहितीही कुंकळयेकर यांनी यावेळी दिली. यावर्षी ईडीसी सीएसआरखाली ४ कोटी रु. खर्च करणार असल्याचे ते म्हणाले.

रोजगार निर्मितीसाठी ईडीसीच्या
कृती दलाची स्थापना

आर्थिक विकास महामंडळाने रोजगार निर्मिती कृती दलाची स्थापना केली असल्याची माहिती ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. आपण कृती दलाचा अध्यक्ष असून राज्यात रोजगाराला चालना देणे हा हे कृती दल स्थापन करण्यामागील उद्देश असल्याचे ते म्हणाले.

राज्यात चांगली रोजगार निर्मिती कशी करता येईल यासंबंधीच्या नाविन्यपूर्ण अशा कल्पना कृती दलाने जनतेकडून मागवण्याचा निर्णय घेतलेला आहे. चांगल्या तीन कल्पना निवडण्यात येणार असून त्या सुचवणार्‍यांना बक्षिसे देण्याबरोबरच कृती दलासमोर त्यांना आपली कल्पना व्यवस्थितपणे मांडण्याची सूचना करण्यात येईल. या तीन उत्कृष्ट कल्पना नंतर प्रत्यक्ष कृतीत आणता याव्यात यासाठी त्या सरकार दरबारी पाठवण्यात येणार असल्याचे कुंकळयेकर यांनी यावेळी सांगितले.

संबंधितांना आपल्या कल्पना शवलश्रींव.सेरऽसारळश्र.लेा वर पाठवाव्या लागतील. ३१ जानेवारी २०१८ ही या कल्पना पाठवण्याची अंतिम तारीख आहे.
सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या अध्यक्षतेखालील या कृती दलात सीआयआयचे चेअरमन अत्रेय सावंत, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संदीप भंडारे, गोवा स्टेट इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, ईडीसीचे उपाध्यक्ष संतोष केंकरे व ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. वेर्णेकर यांचा समावेश आहे.