राज्यात आज आंतरराष्ट्रीय योगदिन

0
118

राज्यभरात पाचवा आंतरराष्ट्रीय् योग दिन आज शुक्रवारी उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योग दिनाच्या कार्यक्रमातून हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाणार असून हृदयरोग टाळण्यासाठी उपयुक्त आसनांची माहिती व प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे.

राज्य पातळीवरील प्रमुख योग दिन कार्यक्रम सकाळी ७ वाजता ताळगाव येथे कॉम्युनिटी हॉलमध्ये होणार असून या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मंत्री, आमदार सहभागी होणार आहेत. सरकारी कार्यालयांना योग दिन साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांना सुध्दा योग दिन कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना योग दिन कार्यक्रम साजरा केल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल आणि छायाचित्रे सादर करण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे.

मिरामार पणजी येथील गोवा विज्ञान केंद्र आणि वर्ल्ड ऑफ योग या संस्थेच्या सहकार्याने सकाळी ८.३० वाजता केंद्राच्या सभागृहात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम कर्मचारी आणि नागरिकांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, आयएएस अधिकारी नीला मोहनन उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारच्या इंडिया टुरिझम गोवा, गोवा राज्य योग अकादमी आणि पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० वाजता पाटो पणजी येथील कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात योग दिन साजरा केला जाणार आहे.