राज्यात आचारसंहिता काळात सव्वातीन कोटींचा ऐवज जप्त

0
123

लोकसभा आणि विधानसभा पोट निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध अंमलबजावणी पथकांनी आत्तापर्यंत सुमारे ३ कोटी ८४ लाख २० हजार ८९८ रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या सामग्रीत ७५.१८ लाखांची रोख, २८६.७० लाखांची दारू आणि २२.१७ लाखाच्या अमलीपदार्थांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदुकांच्या वापरावर बंदी घातली आहे. दोन बंदुका आणि १२ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर, ४३२२ जणांनी आपल्या बंदुका पोलीस स्टेशनवर जमा केल्या आहेत. आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर २६७२ बॅनर्स हटविण्यात आले आहेत. निवडणूक आचारसंहिता भंगाच्या ३० तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील १३ तक्रारी सी-व्हीजिल ऍपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ७ सर्वसाधारण देखरेख निरीक्षक, ३ खर्च निरीक्षक आणि एक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. सर्व निरीक्षकांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. निवडणुकीसंबंधी तक्रारी या निरीक्षकांकडे केल्या जाऊ शकतात.

एकूण १६५२ मतदान केंद्रे
राज्यात ११३१६१८ मतदार असून १६५२ मतदान केंद्रे आहेत. दक्षिण गोव्यात ८१० आणि उत्तर गोव्यात ८४२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांगासाठी रॅम्प व इतर सुविधांची उपलब्ध करण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनच्या सोबत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक प्रमाणात मशीन उपलब्ध करण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.