राज्यातील ५४ खाण लीजधारकांना नोटिसा

0
188

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अटींच्या उल्लंघन प्रकरणी ५४ खाण लिजधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. खाण कंपन्यांनी अटींचे उल्लंघन केल्याने त्यांची बँक हमी का जप्त केली जाऊ नये? अशी विचारणा मंडळाने केली आहे. संबंधित खाण कंपन्यांना पंधरा दिवसांत उत्तर देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मंडळाने खाण कंपन्यांना खाण सुरू करण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण व इतर बाबतीत अनेक अटी घातल्या होत्या. मंडळाकडून खाणी सुरू करण्यासाठी मान्यता देताना अटींची पूर्ती व्हावी या उद्देशाने खाण कंपन्यांकडून बँक हमी घेतली जाते. खाण कंपन्यांकडून अटींची पूर्तता न झाल्यास बँक हमी जप्त केली जाते.

मंडळाच्या पथकाने ५४ खाणींच्या केलेल्या पाहणीत सूचित अनेक अटींचे पालन करण्यात आलेले नाही, असे आढळून आले आहे. खाण कंपन्या धूळ प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. मंडळाच्या बैठकीत खाणींच्या तपासणी अहवालावर चर्चा करून अटींचे उल्लंघन करणार्‍या खाण कंपन्यांची बँक हमी जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंडळाने संबंधित खाण मालकांना नोटिसा पाठवून स्पष्टीकरण करण्याचा आदेश दिला आहे. खाण मालकांच्या उत्तरानंतर बँक हमी गोठविण्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.